संपादकीय

नवे नियम आणि नियमावली : नववर्षाचे स्वागत करताना…

अमृता चौगुले

सरत्या वर्षाला निरोप देण्याची आणि नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सर्वत्र सुरू असताना त्यानिमित्त होणार्‍या गर्दीवर नियंत्रण आणायचे कसे, याची मोठी डोकेदुखी सरकार, आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनासमोर आहे. त्याचे पडसादही उमटताना दिसत असून त्यासाठीचे नवे नियम आणि नियमावली लागू करण्यास सुरुवात झाली आहे. येत्या काळात राज्यामध्ये काही महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. मार्चपर्यंत पाच राज्यांच्या निवडणुकाही होणार आहेत. त्याची जोरात तयारी सुरू आहे. विशेषतः उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात प्रचार सभा सुरू झाल्या आहेत. ते पाहून आधी अलाहाबाद न्यायालयाने आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने या राजकीय गर्दीवर चिंता व्यक्त केली. कोरोनाविषयक नियम कठोरपणे पाळायला हवेत, असा सल्लाही सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला. एखादी महामारी आली, तर ती आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांबरोबरच नागरिकांच्या सहकार्याचीदेखील तितकीच आवश्यकता असते; पण वास्तव निराळे आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काही निर्बंध लावण्याची सूचना राज्यांना केली. महाराष्ट्रातही त्याची अंमलबजावणी सुरू आहे, तरीही नववर्षाचे स्वागत करताना लोकांचे भान हरपते की काय, असा प्रश्न निर्माण होण्यासारखी स्थिती आहे. पर्यटनस्थळांवर पूर्वीसारखीच गर्दी उसळताना दिसत आहे. मोठ्या शहरांमध्ये मास्क न लावणार्‍या नागरिकांवर कारवाई सुरू असूनदेखील बहुतांश लोक दंड भरूनही मास्क न लावण्यातच धन्यता मानत आहेत. लस घेतली की, कोरोना आपले काही वाकडे करू शकत नाही, अशी भावना बळावत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण झाल्यानंतरही ही महामारी अनेकांना गाठत आहे, याचा सोयीस्करपणे विसर पडत आहे. जबाबदार लोकप्रतिनिधीदेखील मास्क न लावता फिरत आहेत. त्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. एक आमदार आणि विधिमंडळातील अधिकारी, कर्मचारी, पोलिस आणि पत्रकार यांचा समावेश असलेल्या 32 जणांनाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळले. यावरून कोरोनाला हलक्यात घेऊन चालणार नाही, याचा अंदाज आला आहे. मुलांच्या शाळा आताच कुठे सुरू झाल्या आहेत. दीड वर्षानंतर मुलांनी मोठ्या उत्साहाने शाळेत प्रवेश केला आहे. अशा वेळी तर अधिक खबरदारी घेणे भाग आहे. पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत उद्योगधंद्यांनी कसाबसा तग धरला. त्यानंतर आर्थिक स्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. देशाच्या विकासाचा दर समाधानकारकपणे वेग पकडत आहे. बाजारपेठांमध्येही आशेचे वातावरण दिसत आहे. किमान वर्षभर तरी कोरोनाविषयक नियम पाळावेच लागतील, अशी सूचना जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. तिला गांभीर्याने घ्यायला हवे. सर्वसामान्यांना कोरोनाची लागण परवडणारी नाही. उपचाराच्या काळात त्याचा व्यवसाय कोलमडतो, नोकरी जाऊ शकते आणि तो निष्कांचनदेखील होतो. कोरोनाची अशी किंमत मोजावी लागते, हे देशाला, राज्याला आणि नागरिकांनादेखील परवडणारे नाही. म्हणूनच कोरोनाला हरवण्यासाठी सरकारने ठरवून दिलेले नियम काटेकोरपणे पाळायलाच हवेत.

देशात कोरोनासोबत ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या अवताराने डोके वर काढले आहे. ओमायक्रॉनमुळे मृत्यूचा धोका कमी असला, तरी त्याचा फैलाव ज्या वेगाने होतो, तो निश्चितच धोकादायक आहे. आफ्रिकेतील गरीब देशांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे प्रमाण जेमतेमच आहे. तेथूनच ओमायक्रॉनचा संसर्ग जगभर होण्यास सुरुवात झाली आहे. सध्या सुमारे 90 देशांमध्ये ओमायक्रॉन पोहोचला आहे. भारतही त्याला अपवाद नाही. देशात सुमारे सहाशे रुग्ण ओमायक्रॉनने बाधित झाले. आपल्याकडे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग चांगला आहे; पण संपूर्ण लोकसंख्येचे दोन्ही डोस पूर्ण होण्यास किमान वर्ष तरी लागेल, असे वाटते. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरपर्यंत कोरोनाची लाट आटोक्यात आली, असे वाटत होते. त्यानंतर नागरिकांनी कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम धुडकावत लग्न समारंभ आणि इतर सार्वजनिक कार्यक्रम धूमधडाक्यात साजरे करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकांचा गुलालही मुक्तहस्ते उधळण्यात आला. देशात थोड्या-फार फरकाने अशीच स्थिती राहिली. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट आली आणि मार्चपर्यंत कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक झाला. पुन्हा कडक निर्बंध लादण्यात आले. मुंबईत अत्यावश्यक सेवेतील नागरिक वगळता इतर सर्वांच्या लोकल रेल्वे प्रवासावर बंदी घालण्यात आली. राज्या-राज्यांत प्रवास करायचा असेल, तर आरटी-पीसीआर चाचणी सक्तीची केली गेली. या निर्बंधांमुळे कोरोनाची दुसरी लाट बर्‍यापैकी आटोक्यात आली. मुंबईसारख्या शहरात जेथे 10 ते 12 हजार रुग्ण दरदिवशी आढळत होते, तेथे रुग्णसंख्या शंभराच्या आसपास आली. सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले; पण नागरिकांना मात्र कोरोनाविषयक नियमांचा विसर पडला. मुंबईत टप्प्याटप्प्याने लोकल रेल्वेसेवा सुरू करण्यात आली; पण लोकलमध्येही सर्व नियम धाब्यावर बसवले गेले. कोरोना हद्दपार झाला आणि तो आपले आता काही करू शकत नाही, अशा समजात गर्दीने प्रवास सुरू झाला. नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी करताना कोरोना आजही आपल्या मागावर आहे, याचे भान ठेवलेच पाहिजे. मास्क, सुरक्षित अंतर आणि हात धुण्याची सवय सोडून चालणार नाही. गर्दी तर टाळलीच पाहिजे. दुसरा डोस घेतलेल्यांची टक्केवारी अपेक्षित गतीने वाढताना दिसत नाही. हा सक्तीचा नव्हे, तर स्वयंआरोग्याचा त्यासोबत सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा आहे. त्याकडे त्या व्यापक भावना आणि भूमिकेतून बघणे गरजेचे आहे. या वर्षाला निरोप देताना कोरोनाने अनेकांच्या जीवनात कायमचा अंधार आणला, अनेक निष्पाप बळी घेतले, अनेक संसार उघड्यावर पडले आणि मनुष्यबळाची मोठी हानी झाली, हे विसरता येईल कसे?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT