दंड की दांडी? 
संपादकीय

दंड की दांडी?

backup backup

आजोबा, हे घ्या औषध.
बापरे! एवढ्यात आलाससुद्धा औषध घेऊन? काय हेलिकॉप्टरने गेला होतास की काय?
नायबा! मी नेहमीसारखा माझ्या बाईकवरून गेलेलो.
कसा? रस्ता कापत की हवेतून उडत?
हं, जरा जास्तच पळवली असेल गाडी; पण तुमची कंबर भयंकर धरली म्हणत होतात ना? अगदी हलवतही नव्हतं..
खरंय, खूप दुखत होतं. लवकर औषध हवं होतं; पण तू बंदुकीतून गोळी सुटावी असं वाहन सोडावंस, स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालावास असं नव्हतं रे माझं म्हणणं!
आता माझ्यावर सोपवलेलं काम नीट केलंय ना मी? मग ही उलटतपासणी घ्यायलाच हवी का आजोबा?
सोन्या, आधीच आपले रस्ते किती दिव्य, ट्रॅफिक किती भयंकर, त्यात जवानीच्या जोशात तू अशी सर्कशीतल्यासारखी वाहनं चालवतोस म्हटल्यावर माझं ब्लडप्रेशर वाढणारच ना?
लगेच जाऊन ब्लडप्रेशरचं औषध आणू? अस्सा जातो आणि अस्सा येतो. सध्या रस्त्यात पोलिसही नसतात फारसे.
पोलिस नसतात? वाहतुकीवर देखरेख करतं कोण मग?
कोणीच नाही. आजोबा, अनेक मोठ्या रस्त्यांच्या चौकांमध्ये पोलिसच नसतात सध्या.
का म्हणे?
आता पहिल्यासारखी वाहनचालकांना उगाच दंड ठोठावायची, वाहनं टो करून न्यायची परवानगी नाही त्यांना.
का म्हणे? आणि कधीपासून?
अहो, पुण्यात पोलिसांनी वाहनं फरफटत म्हणजे टो करत नेण्यावर, वाहतूक गुन्ह्यांसाठी दंड करण्यावर मध्यंतरी बंदी आली होती ना?
कोणी घातली बंदी?
पोलिस आयुक्त, पोलिस सहआयुक्त वगैरेंनी. काय होतं बर्का आजोबा, वाहतूक नियंत्रण करण्यापेक्षा दंड करण्यावरच पोलिस जास्त भर देताहेत, अशी सारखी नागरिकांची तक्रार येत होती. याला उत्तर म्हणून पोलिस अधिकार्‍यांनी आदेश काढला की बुवा, पुढील आदेश येईपर्यंत ड्युटीवरच्या पोलिसांनी दंडात्मक कारवाई करू नये.
है शाबाश! ऊठसूठ दंड करणं चुकीचंच आहे नाही तरी.
खरंय; पण दंड करता आला नाही तर पोलिसाची नोकरी करण्याचा फायदा काय? असं वाटलं बहुतेक काही पोलिसांना. मग, त्यांनी बहुधा ठरवलं, दंड नको? मग, दांडी मारूया.
काय सांगतोस?
मला थेट कोणी सांगितलं नाहीये हे, एक आपला अंदाज आहे आम्हा लोकांचा.
लोकांचा जीव रस्तोरस्ती नाहक धोक्यात नाही का येणार याने?
तो लोकांचा प्रश्न आहे. आपला जीव आपण वाचवावा.
पण, दुसर्‍यांनी तो धोक्यात आणला तर? उगाच वेडीवाकडी चालवत वाहनं आपल्या अंगावर घातली तर?
आपल्याला ते काही माहीत नाही. सध्या आपण चैन करतोय. रस्त्यात पोलिसच नाहीत. 'हवा के साथसाथ, घटा के संगसंग..' असं भुंगाट जाताना कोणी अडवत नाही.
अशाने कसा सावळा गोंधळ माजेल याचा विचार केलायस का कधी?
मी कशाला करू?
मग कोणी करायचा? तू रस्त्यावर चालतोस, वाहनं चालवतोस, वाहनं बाळगतोस, आधी नियमन आणि नंतर दंड, हा तर पहिला दंडक असतो रे!
असू दे की! मला नाही कळत एवढं.
आपल्या पोलिसांनाही हे कळू नये हे भयंकर आहे. दंड करता येतो, चिरीमिरी काढता येते, हात ओला होतो, तेव्हा यांना नोकरी प्रिय. दंड मिळणार नसले की, दांडी मारायला हे मोकळे. हे कसले जनतेचे रक्षक? परमेश्वरा, अशा विचारसरणीच्या पोलिसांना तूच दणदणीत दंड कर बाबा!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT