संपादकीय

तळागाळातला देश

अमृता चौगुले

अहो, बाहेर जाताच आहात तर एवढा दळणाचा डबा गिरणीत टाकता का?
दरवेळी मी बाहेर जायला लागलो की, माझ्या मागे काही ना काही काम लावलंच पाहिजे का?
नाही तरी हात हलवत तर जाताय.

ठीक आहे. याच्यापुढे हात पुतळ्याच्या हातासारखे ताठ, अंगाला घट्ट चिकटवून जायला लागतो.
अहो, असं काय करता? कामवाल्या बाईला न्यायला सांगावं तर ती डबा दहा ठिकाणी ठेवते. पोरांना सांगावं, तर ती सांडलवंड करतात. गिरणीवाला तरी काय कोणाच्या धान्यावर कोणाचं धान्य ओतेल, काय मिसळेल, कसं जाडबारीक दळेल, काही नेम नाही.
अगं, साधं रोजचं दळण देतांना किती शंका काढतेस? तुझा कोणावरच विश्वास राहिला नाही असं समजायचं का?
कसा राहील? मागच्या खेपेला निम्मी ज्वारी दळून होतेय तेवढ्यात वीज गेली. दीड तास सगळे कंटाळले.
तिथे तू असतीस तर निदान तक्रारी सांगून, बोलून बोलून करमणूक तरी केली असतीस; पण अशी सदैव शंका, तक्रारी सांगणारी माणसं अप्रिय ठरतात पुढे. देशाचं नाव बाहेर खराब करतात.
कोण म्हणतं?

वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट म्हणतो. संयुक्त राष्ट्रांचा आनंदी देशांबाबतचा अहवाल. जगात सर्वात आनंदी देश ठरलाय फिनलंड. ओळीने पाचव्यांदा तो पहिला आलाय बरं.
येऊ दे की! आपल्या देशाने काय उजेड पाडलाय तेवढं सांगा.
बघ, तुझी भाषा. किती कडवटपणा, नकारात्मकता..
मग काय नाचू? पेढे वाटू?

146 देशांच्या यादीत 136 व्या नंबरावर आहोत आपण. आता बोल!
धड काढले नसतील नंबर, परीक्षा म्हटल्या की घोटाळे आलेच.
बघ, पुन्हा संशय, तक्रार. फिनलंड, डेन्मार्क, आईसलँड, स्वित्झर्लंड, नेदरलँड हे पहिल्या पाच नंबरांवर आहेत. सर्वात तळागाळातला देश आहे अफगाणिस्तान.
हे नंबर लावले कुठल्या निकषांवर?

नागरिकांचं दरडोई उत्पन्न, आरोग्य, स्वातंत्र्य, दातृत्व, भ्रष्टाचाराला आळा असे बरेच निकष आहेत वाटतं त्यासाठी!
मग, आपला कुठला नंबर लागायला बसलाय?
बघ, पुन्हा संशय. पुन्हा कुरकुर. त्या अहवालात हीच कारणं दाखवली आहेत आपल्या मागे पडण्याची. आपल्यात कोणाचा कोणावर विश्वासच नाही उरलेला.

जळ्ळं त्या पोस्टातलं पेनसुद्धा दोरीने बांधून टांगतात आपल्याकडे.
होना! रेल्वे डब्यातल्या स्वच्छता गृहातले साबण आणि टमरेलंसुद्धा बांधून ठेवलेली.
असं करावं लागतं म्हणजे पोलिस, कायदा, सरकार, यंत्रणा, सुरक्षा व्यवस्था कशावरच विश्वास नाही म्हणायचा!
असं झालं की, माणसं आनंदी राहत नाहीत. विश्वास टाकला की, विश्वास मिळतो, विश्वास वाढतो. मला वाटतं आपण सगळ्यांनी ठरवून यातून बाहेर यायला पाहिजे.

बघा हं! उगाच मोठमोठ्या गोष्टी सांगून दळणाचं काम टाळू नका.
करतो ग बाई काम. पण, आपण सगळेच थोडेथोडे सकारात्मक होऊ या! एकमेकांवर, व्यवस्थांवर विश्वास टाकू या! म्हणजे बघ, तळागाळातले लोक वर येतील आणि आपला देशही जगाच्या द़ृष्टीने तळागाळात जाणार नाही.

– झटका

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT