Pudhari Editorial
Pudhari Editorial Pudhari Editorial
संपादकीय

झटका : मनाची कालवाकालव

पुढारी वृत्तसेवा
- कलंदर

एवढ्या मोठ्या विशाल देशात सतत काही ना काही तरी घडत असतेच. कालपरवा भुशी डॅममध्ये वाहून गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यू सर्वांना चटका लावून गेला. त्यातून सावरेपर्यंत उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सत्संगावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत सव्वाशेपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि दीडशे लोक जखमी आहेत.

मृतांमध्ये मोठ्या प्रमाणात महिला आणि मुले आहेत असे वाचण्यात आल्यानंतर काळजात कालवाकालव झाल्याशिवाय राहिले नाही. कोणे एकेकाळी उत्तर प्रदेश सरकारमध्ये सरकारी कर्मचारी असणार्‍या एका गृहस्थाने नोकरी सोडली आणि तो पूर्णवेळ बाबा बनला. भोलेबाबा असे त्याचे नाव आहे. बाबा म्हटले की, दरबार आलाच आणि सत्संग ओघाओघानेच येत असतो. मृतांमध्ये महिला आणि मुले जास्त असण्याचे कारण म्हणजे ते साधे-भोळे भाविक असतात. कुणीतरी काहीतरी चमत्कार करेल आणि दुःख दूर करेल अशी बहुतांश भारतीयांची भावना असते. दारिद्य्र पाचवीला पुजलेले असते. अशा लोकांना कोणा बाबाच्या साधूच्या कृपेने लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल अशी उत्कट आशा असते. बाबाने केलेल्या चमत्कारांचा प्रचार आणि प्रसार त्यांनी नेमून दिलेले भक्तगण करत असतात.

हाथरस येथील घटनेमध्ये हजारो भाविक एकाच ठिकाणी जमा झाले होते. बाबाचे जे काय सत्संग, प्रवचन असेल ते संपल्यानंतर बाहेर पडण्यासाठी एकच धांदल उडाली आणि त्या चेंगराचेंगरीत शेकडो माणसे दगावली आणि तितक्याच प्रमाणात जखमीसुद्धा झाली. सत्संग संपल्यानंतर बाबाच्या भक्तांनी सगळे रस्ते रोखून धरले होते आणि आधी बाबा जातील आणि मग भक्तगण जातील असे नियोजन केले होते. सत्संग सुरू असलेल्या हॉलमध्ये प्रचंड गर्मी आणि उकाडा होता. बाबाने प्रस्थान ठेवल्याबरोबर त्याने जिथे पाय ठेवला तेथील धूळ म्हणजेच चरणरज आपल्या कपाळी लावण्यासाठी भक्तांनी एकच गर्दी केली. बाहेर पडण्यासाठी भक्तांची एकच गर्दी झाली आणि त्या गर्दीच्या तुडवण्यामुळे हे लोक मृत्युमुखी पडले.

हाथरसमध्ये घडलेली ही घटना काही पहिली नव्हे. यापूर्वीही उत्तर प्रदेशात आणि इतरत्रही अशाच पद्धतीने असंख्य लोक मृत्यू पावलेले आहेत. चार-पाच वर्षांपूर्वी एका प्रसिद्ध बाबाच्या सत्संगामध्ये साड्यांचे वाटप होत होते. त्याही वेळी अशीच झुंबड उडून असंख्य महिला दगावल्या होत्या. किती मृत्यू झाले म्हणजे हे प्रकार थांबतील, याविषयी कोणीही काहीही सांगू शकत नाही. या सत्संगाच्या आयोजकांवर पोलीस गुन्हे दाखल करतात; परंतु बाबा आणि साधू यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही. श्रद्धा-अंधश्रद्धा या वादात न पडता किमान अशा भक्तांच्या समुदायामध्ये चेंगराचेंगरीत शेकडो लोक मरण पावतात ही चिंताजनक घटना आहे.

संवेदनशील कर्मचारी जागोजागी कार्यरत असतात. एकाच वेळी 30 ते 40 महिलांचे मृतदेह पाहून त्या ठिकाणी एका कॉन्स्टेबलचे पण हृदयविकाराच्या तीव— धक्क्याने निधन झाले. कुणालाही धक्का बसवा अशीच ही घटना आहे. घटना घडते, लोक मरण पावतात, चर्चा होते, चार-पाच वर्षे जातात आणि पुन्हा अशाच प्रकारचे अपघात आपल्या देशात होत राहतात. भयावह मृत्यूचे हे चक्र कधी संपेल किंवा थांबेल यासाठी आपल्या हातात परमेश्वराची प्रार्थना करणे फक्त आहे. हे देवाधीदेवा, हे परमेश्वरा अशा अपघातांमध्ये भक्तगण बळी पडू नयेत, यासाठी आता तूच काहीतरी कर, एवढीच प्रार्थना आहे.

SCROLL FOR NEXT