प्रत्येकाच्याच आयुष्यात गुरूची भूमिका महत्त्वाची असते. रुढार्थाने शिक्षक हाच गुरू मानला जात असला तरी व्यवहारात पहिला गुरू आई असते. आयुष्यात असे अनेक गुरू वेळोवेळी मार्गदर्शन करतात. आज, गुरुपौर्णिमेनिमित्त अशा गुरूस्थानी असणार्यांचे स्मरण…
गुरू म्हणजे उंचबळणारा ज्ञानसागर, नम्रतेचा पहाड, संस्कार आणि सल्ला देणारा मौल्यवान मणी! गुरू हा तर कौन्सिलर, भावनिक, उलथापालथ व मानसिक उचंबळ व खळबळ याने ग्रासलेल्यावेळी मन व भावनांना काबूत, ठेवण्यातून आजच्या भाषेत 'चिलडाऊन' आणि 'बी. काम., क्वाएट' असा संदेश देत शांत करणारा. आजच्या तीव्र स्पर्धेत हेवेदावे, जगण्यासाठी सततचा संघर्ष करणे भाग पडत असलेल्या काळात व कोरोना, महापूर, वादळ अशा नैसर्गिक व मानवनिर्मित संकट काळात भांबावलेल्या, त्रस्त व नैराश्याने ग्रासलेल्या स्थितीत मन शांतावत नेणे, भावना आशावादी राखणे आणि सकारात्मक राहण्यासाठी गुरू हेच मार्गदर्शक ठरू शकतात.
गुरू म्हणजे दीपस्तंभ. गुरू म्हणजे समुपदेशक व सल्लागार. गुरूच शिकवण व संस्कार करणारा. गुरू म्हणजे वाटाड्या, मार्गदर्शक. भारतीय संस्कृतीतील गुरूभक्ती म्हणजे एक मधूर असे काव्य आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात गुरूभक्तीचा अपार महिमा सांगितला आहे. गुरू म्हणजे केवळ शिक्षक नव्हे वा आचार्य नव्हे, तर आजच्या काळात माणसाच्या आयुष्यात कोणतीही व्यक्ती गुरू स्थानी असू शकते. तिथे जात, धर्म, वय, लिंग, पेशा वगैरेसारखा भेद नसतो. आई ही तर आपली पहिली व परमोच्च स्थानी असलेली गुरू.
ऋषिमुनी, संत, महाराज, सर वा शिक्षक हे गुरूस्थानी असतातच. त्याचबरोबर जीवनास आकार देणारे, आयुष्य घडविणारे, व्यक्तिमत्त्व सर्वांगीण गुणवत्तेचे बनविण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे, दुराचारापासून परावृत्त करणारे, सदाचाराकडे वळविणारे, ज्यांचा सतत आधार व संकटकाळात त्राता अशा भूमिकेतून मार्गदर्शन करणारे हे गुरूच. सॉक्रेटिसचा शिष्य म्हणवून घेण्यात प्लेटोला धन्यता वाटे. प्लेटोचा शिष्य म्हणवून घेण्यात अॅरिस्टॉटलला कृतार्थ वाटे. इब्सेनचा अनुयायी म्हणवून घेण्यात शॉ याला मोठेपणा वाटे. तर कार्ल मार्क्सचा शिष्य म्हणवून घेण्यात लेनिनला गौरव वाटला. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती आई-बाबा किंवा नात्यातील समाजातील मान्यवर एवढेच नव्हे तर टेक्नोसॅव्ही टॅलेंटेड व भावनिक बुद्ध्यांक वाढलेल्या युवा पिढीतील मुलगा व मुलगीसुद्धा विशिष्ट क्षेत्रातील ज्ञान आमत्सात करण्यासाठी आपले गुरू ठरतात.
गुरू हेच आपल्या जीवनात मार्ग दाखवीत असतात. ज्ञानचातुर्य, कौशल्य आचरण, नीती, शासननीती शास्त्र, वर्तन अशासारखा गुणांमुळे जी व्यक्ती आदरणीय व वंदनीय ठरलेली गुरू. जिजामाता या छत्रपती शिवरायांच्या गुरू. त्यांनी होमस्कूलिंग करीत शिवरायांचे अतुल, अविस्मणीय, महापराक्रमी व्यक्तिमत्त्व घडविले. खरे तर आपल्या ऐतिहासिक, पौराणिक, विज्ञाननिष्ठ क्षेत्रात कितीतरी महान अशी व्यक्तिमत्त्वे त्यांच्या चिरस्मरणीय, कर्तृत्वातून गुरुस्थानी मानण्यासारखीच. जनकाचा याज्ञवल्क्य गुरू जनक शुक्राचार्याचा गुरू, निवृत्तीचा गुरू ज्ञानदेव रामनंदाचे शिष्य कबीर, असे हे संबंध शब्दांनी व्यक्त करण्यासारखे नाहीत.
एकदा एका शिष्याने श्रीरामकृष्ण परमहंसांना विचारले, 'महाराज गुरूचे कार्य शिष्याचा जीवनात काय असेल? कोणता लाभ?' रामकृष्ण म्हणाले, 'ती समोर होडी दिसते ना! ती कोलकात्याला पोहोचण्यास किती वेळ लागेल म्हणजे किती तास?' शिष्य म्हणाला, 'लागतील चार तास!' त्यावर रामकृष्ण म्हणाले की, 'पलीकडे जी बोट दिसते आहे, त्या बोटीला ही होडी लावली तर किती वेळात होडी जाईल?' शिष्याने विचार करून उत्तर दिले, 'अर्ध्या तासात.' त्यावर परमहंस म्हणाले, 'गुरूची महती अशीच आहे. जी प्रगती साधायला शिष्याला खडतर साधना करावी लागते. ती गुरूच्या सहाय्याने चटकन व सहज होते.' नेपोलियन युद्धशास्त्र शिकणार्यांचा गुरू आहे; परंतु स्वतःच्या जीवनातील काम क्रोधाच्या वेगाशी लढावयास शिकविणारा तो सद्गुरू होय.
गुरूभक्ती म्हणजे शेवटी ज्ञानभक्ती हे विसरता कामा नये. ज्ञानाबद्दल आदर आहे तोपर्यंत जगात गुरूभक्ती राहणार. गुरू म्हणजे विशिष्ट ज्ञानाचे प्रतीक. गुरूच्या विचारातील किंवा सिद्धांतातील काही चूक शिष्याला आढळली, तर ती चूक लपविणे नव्हे तर गुरूने दिलेले ज्ञान अधिक निर्दोष करणे म्हणजे गुरूपूजा. गुरूची आंधळी भक्ती गुरूला आवडत नाही.
गुरू म्हणजे मूर्तिमंत ज्ञानपिपासा. गुरू म्हणजे अनंत ज्ञानाची तळमळ. गुरू म्हणजे सत्याच्या प्रयोगाची उत्कटता. गुरूला आदी नाही, अंत नाही. गुरूला पूर्व नाही, पश्चिम नाही. माझा किंवा कोणाचाही गुरू म्हणजे परिपूर्णता. परफेक्शनिष्ट असाच. गुरूची पूजा ही आदरणीय वंदनीय पूजनीय व्यक्तिमत्त्वाची पूजा होय. तसे जगणाची परमोच्च उंची गाठणार्या व्यक्ती गुरू स्थानी आणि त्यांचे स्मरण-पूजन हे गुरुपैार्णिमा दिनी.
– डॉ. लीला पाटील