संपादकीय

चीनचा फुगा फोडला!

backup backup

आकाशात फिरणार्‍या अनोळखी गोष्टींबद्दलचे गूढ जगभरात सगळीकडे सारखेच असते. तसाच एक विषय सध्या जागतिक पातळीवर गंभीरपणे चर्चेत आला आहे. दोन महासत्ता त्यावरून समोरासमोर उभ्या ठाकल्या आहेत. अमेरिकेच्या आकाशात फिरणार्‍या बलूनने (फुगा) गेले काही दिवस जगाचे लक्ष वेधून घेतले असून अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये त्यावरून कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. हा बलून हेरगिरी करणारा असल्याचा आरोप करून अमेरिकेने तो पाडला; मात्र हवामानासंबंधी माहिती गोळा करणारा हा बलून भरकटल्याचा दावा चीनने केला आहे. जागतिक पातळीवर रणकंदन माजले असताना अमेरिकन प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या एका अहवालाने भारताचीही काळजी वाढवली आहे.

अमेरिकेतील 'वॉशिंग्टन पोस्ट' या वृत्तपत्राने केलेल्या दाव्यानुसार हेरगिरी करणार्‍या बलूनच्या सहाय्याने चीनने अनेक देशांना लक्ष्य केले असून त्यात भारतासह जपान, फिलिपिन्स, व्हिएतनाम आदी देशांचा समावेश आहे. आधी अमेरिका आणि चीन या दोन देशांपुरत्या असलेल्या या मामल्यामध्ये थेट भारताचे नाव आल्यामुळे जागतिक वाटणारा प्रश्न भारताच्या निकट आला आहे. चीन भारताच्या हद्दीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने उपद्रव करीत असून भारतासाठी तो मोठी डोकेदुखी ठरला आहे. तशात हे हेरगिरीचे प्रकरण पुढे आल्यामुळे काळजी वाढणेही स्वाभाविक आहे. अमेरिकन अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार हेरगिरी करणारा बलून चीनच्या दक्षिण किनार्‍यावरील हानियान प्रांतातून काम करीत होता. याद्वारे चीनसाठी रणनीतीच्या द़ृष्टिकोनातून महत्त्वाच्या ठरणार्‍या देशांच्या सैन्याशी संबंधित माहिती गोळा करण्यात येत होती.

संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अभ्यासकांच्या हवाल्याने 'वॉशिंग्टन पोस्ट'ने यासंदर्भातली माहिती दिली आहे. बलूनच्या सहाय्याने हेरगिरी करण्याची अशी पद्धत जुन्या काळातील आहे. त्या अर्थाने ती नवी नाही; परंतु अशारितीने हेरगिरी करणारे बलून मानवरहीत असतात आणि त्याचा खर्चही तुलनेने कमी असतो. आकाशात अनेक संशयास्पद गोष्टी आढळत असतात. काही गोष्टी ठरावीक काळात दिसतात आणि लगेच नष्ट होतात. खगोल अभ्यासक अशा हालचालींवर लक्ष ठेवून असतात. त्यातून नवनवे निष्कर्ष मांडत असतात. विविध देशांच्या यंत्रणांचेही त्यावर लक्ष असते आणि काही संशयास्पद आढळले, तर तातडीने कार्यवाही केली जाते. अमेरिकेच्या आकाशात हा बलून अनेक दिवस दिसत होता. अमेरिकेने सुरुवातीपासून त्यावर लक्ष ठेवले आणि त्याचा प्रवास कसा कसा होतोय, याकडे नजर ठेवली. अमेरिकेने प्रारंभीच त्यासंदर्भातील आक्षेप नोंदवला होता; परंतु त्यावेळी संबंधित बाबीची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती देऊन चीनने अमेरिकेला कांगावा न करता शांत राहण्याचा सल्ला दिला होता. चर्चा, तक्रारी झाल्यानंतर चीनने संबंधित बलून आपलाच असल्याचे आणि तो हवामानविषयक माहिती गोळा करणारा असल्याचे जाहीर करून टाकले. चीनच्या या कबुलीनंतर काही काळातच अमेरिकन सैन्याने हा बलून पाडला.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री एंटोनी ब्लिंकन चीनच्या दौर्‍यावर जाणार असतानाच या सगळ्या घडामोडी घडत होत्या. त्यातूनच ब्लिंकन यांनी चीनचा दौराही रद्द केला. बलून आकाशात दिसला तेव्हापासूनच अमेरिकेकडून तो चीनचा असल्याचा दावा करण्यात येत होता. शिवाय तो अमेरिकेच्या अनेक संवेदनशील ठिकाणांच्या जवळून गेल्याचे सांगण्यात येत होते. खरे तर हा बलून पाडून टाकण्यासंदर्भात अगदी सुरुवातीच्या काळातच चर्चा झाली होती. परंतु, त्यासंदर्भात आवश्यक खबरदारी घेण्याची आवश्यकता होती. बलून नागरी वस्तीवर पडला, तर मोठे नुकसान होऊ शकते म्हणून त्यासंदर्भात घाई करण्याचे टाळण्यात आले. सुरक्षित ठिकाणी पडण्याची खात्री झाल्यानंतर त्यावर निशाणा साधण्यात आला. जेव्हा तो मोंटानाच्या आकाशात दिसला तेव्हा अमेरिकेचा त्यासंदर्भात संशय बळावला. त्याआधी अलास्काच्या अल्यूशन आयलँड, तसेच कॅनडाच्या आकाशातून त्याने भ—मंती केली. मोंटाना येथे मात्र अमेरिका अधिक सावध झाली आणि तो पाडण्यासाठी 'एफ-22'सह लढाऊ विमाने तयार ठेवण्यात आली. अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी लष्करातील वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत बैठक करून त्यासंदर्भात चर्चा केली. यावरून प्रकरण किती गंभीर पातळीवर पोहोचले होते, याची कल्पना येऊ शकते. बलूनचे मोंटाना येथील अस्तित्व अमेरिकेकडून गांभीर्याने घेण्याचे प्रमुख कारण म्हणजे मोंटाना हा विरळ लोकसंख्या असलेला प्रदेश असून अमेरिकेच्या तीन न्युक्लिअर मिसाईल क्षेत्रांपैकी एक आहे.

या संवेदनशील ठिकाणांची हेरगिरी करण्यासाठी हा बलून सोडल्याचा दावा अमेरिकन अधिकार्‍यांनी केला होता. अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी अमेरिकन काँग्रेसमध्ये दिलेल्या भाषणातही या बलूनच्या निमित्ताने चीनवर टीका केली. बलूनचे अवशेष परत देण्याची चीनची मागणी अमेरिकेने फेटाळली. उभय देशांदरम्यान या कथित हेरगिरीवरून नवा तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तैवान संघर्षाचा विषय ताजा असताना या विषयाने तोंड वर काढल्याने जगाचे लक्ष या घडामोडींकडे लागले आहे. अमेरिकेत इतके सगळे घडत असताना चीन मात्र स्थितप्रज्ञाप्रमाणे अमेरिकेलाच हल्लागुल्ला न करण्याचा सल्ला देत होता.

अर्थात, चीनच्या सरकारी माध्यमांनी याबाबत चकार शब्दही काढला नव्हता. सोशल मीडियावर मात्र चर्चा रंगलेली होती. इतकी सगळी अत्याधुनिक साधनसामग्री उपलब्ध असताना बलूनसारखी कालबाह्य झालेली पद्धत हेरगिरीसाठी कशाला वापरतील, अशा प्रतिक्रिया काही लोक व्यक्त करीत होते. चीनपासून अमेरिकेला खरा धोका असल्याचा दावा करण्याबरोबरच चीनने असले धंदे करू नयेत, अशा प्रकारच्या विविध प्रतिक्रिया यासंदर्भात व्यक्त झाल्या. बलून पाडून अमेरिकेने आपले काम केले आणि पुढचा धोका टाळला. अमेरिकेने चीनचा फुगा वेळीच फोडला बरे झाले; पण या बलूनने भारताची चिंता वाढवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT