पैशांचा सट्टा लावला जाणारे हे कथित कौशल्य आधारित गेम हा खर्या अर्थाने जुगार आहे की नाही, हे न्यायालयांनी अद्याप ठरवायचे आहे. अनेक कंपन्या कौशल्यावर आधारित खेळांच्या नावाखाली शुद्ध जुगाराचे प्लॅटफॉर्म चालवीत आहेत आणि त्यांचा एकमेव उद्देश लोकांना जुगाराचे व्यसन लावणे हाच आहे. या अॅप्सची रचना व्यसन लागावे अशीच आहे. अलीकडच्या काळात आपल्याला अनेक अॅप्सच्या जाहिरातींमधून क्रीडा क्षेत्रातील काही प्रसिद्ध व्यक्ती ऑनलाईन गेम्सचा प्रचार करताना दिसतात. परंतु, हे गेम्स जपून खेळा. याचे व्यसन लागू शकते असे जोरदार इशारेही याच जाहिरातींमधून देण्यात येत आहेत.
खरे तर, आज अनेेक तरुण या सेलिब्रिटींनी सुचविलेल्या अॅप्सच्या माध्यमातून गेम खेळण्यात व्यग्र झालेले दिसत आहेत. देशात इंटरनेट आणि स्मार्ट फोनच्या विस्तारामुळे मनी गेमिंग उद्योगाचा लक्षणीय विस्तार झाला आहे. 2025 पर्यंत या उद्योगाचा व्यवसाय पाच अब्ज डॉलर्सच्या पुढे जाईल, असा अंदाज आहे. विविध प्रकारच्या ऑनलाईन आणि अॅप्स आधारित गेम्समध्ये व्हर्च्युअल गेम्सचा समावेश आहे. रमी, ल्युडो, शेअर ट्रेडिंगसंबंधीचे गेम्स, क्रिप्टो आधारित गेम्स आदींचा यात समावेश आहे. या खेळांना रिअल मनी गेम म्हणतात आणि हे खेळ पैशांसाठी किंवा बक्षिसांसाठी खेळले जातात. हा खेळ कौशल्यावर आधारित तसेच संधीवर आधारित आहे. परंतु, खेळ कोणताही असो, त्यांचा विस्तार होत चालला आहे आणि अनेक कंपन्यांनीही त्यांच्या अॅप्स आणि वेबसाईटस्च्या माध्यमातून त्यात सहभाग घेतला आहे. हे खेळ खेळायला सुरुवात केल्यापासून कर्जामुळे अनेक तरुणांना जीव गमवावा लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
खरे तर, या गेम्समध्ये जिंकण्याची शक्यताच कमी असते. अशा गेम्सशी संबंधित काही घटनांमध्ये या अॅप्समुळे जुगाराचे व्यसन लागून तरुणांनी मोठी कर्जे घेतली आहेत आणि त्यामुळे त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. या विश्वाशी संबंधित एका वृत्तांतात असे सूचित करण्यात आले आहे की, या अॅप्सद्वारे जुगाराचे व्यसन लागल्यामुळे ज्यांनी आत्महत्या केल्या, त्यातील बहुतांश व्यक्ती 19 ते 25 वयोगटातील तरुण आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांचा आणि स्थलांतरित मजुरांचा मोठ्या संख्येने समावेश आहे. हे खेळ म्हणजे जुगार नसून ते कौशल्याचे खेळ आहेत, असे सांगून अनेक न्यायालयांनी या काल्पनिक खेळांचे समर्थन केले आहे, तरीही या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सहा राज्य सरकारांनी आतापर्यंत फँटसी क्रिकेट प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे किंवा त्याला परवानगीच दिलेली नाही. याबाबतीत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी 132 अॅप्सवर बंदी घालण्यासाठी निवेदन दिले आहे.
काल्पनिक क्रिकेटच्या खेळात जिंकणे हा योगायोग नाही. त्यामुळे हा जुगार नाही, असे काही अभ्यासकांचे म्हणणे असले, तरी काही क्रीडा मानसशास्त्रज्ञ असे मानतात की, फँटसी क्रिकेट हा जुगारच आहे आणि जुगार खेळण्याच्या वर्तनाचा आजार यामुळे जडू शकतो. तसे पाहायला गेल्यास या उद्योगाशी संबंधित अनेक लोकांचा असा युक्तिवाद आहे की, काल्पनिक खेळांची सवय लागण्याची शक्यताच नाही. कारण, यामध्ये सरासरी तिकिटाची किंमत केवळ 35 रुपये आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचे आयुष्यभरात दहा हजार रुपयांपेक्षा अधिक नुकसान होऊ शकणार नाही. परंतु, अशा खेळांमध्ये लाखो रुपये गमावल्यामुळे आत्महत्या केल्याच्या ज्या बातम्या ऐकायला मिळतात, त्यामुळे हा युक्तिवाद खोटा ठरल्याचे स्पष्ट होते.
या आभासी खेळांमुळे लोक खूप पैसे गमावत आहेत आणि गेमच्या व्यसनामधून बाहेर पडू शकत नाहीत, हेच सत्य आहे. नवउदार आर्थिक सिद्धांतामध्ये जोखीम स्वीकारणे महत्त्वाचे मानले जाते, एवढेच नव्हे तर त्याचे उदात्तीकरण केले जाते. नवउदार धोरणांच्या युगात अनेक आर्थिक साधनांनी प्रवेश केला आहे आणि सट्टा हा आजच्या अर्थव्यवस्थेचा अविभाज्य भाग बनला आहे. शेअर बाजार, कमॉडिटी मार्केट आणि परकीय चलन मार्केटमधील सट्टेबाजीचे अनेक दुष्परिणाम असले, तरी त्यांना कायदेशीर मान्यता आहे. सामान्य जीवनात सट्टेबाजीचा प्रवेश झाल्यामुळे आभासी खेळ खेळण्यालाही सर्वामान्यता मिळाली आहे. परंतु, सट्टेबाजीमध्ये काही प्रमाणात योगायोग असला, तरी आभासी खेळांमध्ये तांत्रिकदृष्ट्या असा युक्तिवाद केला जाऊ शकतो, की हा संधींचा खेळ नाही. वास्तव असे आहे की, खेळाडू जाणीवपूर्वक गेममध्ये प्रवेश करत नाहीत आणि कौशल्यापेक्षा संधीवर अधिक अवलंबून असतात.
काही खेळाडू जिंकू शकतात आणि काही हरू शकतात; परंतु या गेमशी संबंधित अॅप्स कंपन्या सतत जिंकत आहेत आणि प्रचंड नफा कमावत आहेत, हे वास्तव आहे. त्यामुळेच बीसीसीआयसारख्या क्रिकेट संघटनांना भरघोस शुल्क भरून प्रायोजकत्वाचे हक्क विकत घेत आहेत. या कंपन्यांचा नफा अशा गरीब विद्यार्थी, मजूर, शेतकरी आणि सामान्य माणसाने केलेल्या खर्चामध्ये आहे, जे आपले सर्वस्व या खेळापायी गमावून बसतात. पैशांचा सट्टा लावला जाणार्या या तथाकथित कौशल्य आधारित गेम हा खर्या अर्थाने जुगार आहे की नाही, हे न्यायालयांना अद्याप ठरवायचे आहे. काही प्रमाणात हा योगायोग असेल, तर तो या देशाच्या कायद्यानुसार वैध असू शकत नाही. अनेक कंपन्या कौशल्यावर आधारित खेळांच्या नावाखाली शुद्ध जुगाराचे प्लॅटफॉर्म चालवीत आहेत.
सर्वांत महत्त्वाची गोष्ट अशी की, या अॅप्सनी परदेशी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक घेतली आहे आणि त्यांचा एकमेव उद्देश लोकांना जुगाराचे व्यसन लावणे हाच आहे. या अॅप्सची रचना व्यसन लागावे अशीच आहे. अशा स्थितीत भारत सरकार आणि संबंधित प्रशासकीय मंत्रालये हातावर हात ठेवून बसू शकणार नाहीत. तरुणांना जुगाराच्या विश्वात ढकलणार्या अॅप्सवर बंदी घालण्याची गरज आहे. याप्रश्नी अर्थ मंत्रालय, ग्राहक व्यवहार मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार आणि आयटी मंत्रालय तसेच गृह मंत्रालय या सर्व विभागांनी एकत्रितपणे निर्णय घेऊन जुगाराचे व्यसन लावणार्या या अॅप्सपासून विद्यार्थी, युवक, मजूर आणि सामान्य लोकांना मुक्ती मिळवून देणे अपेक्षित आहे.
– प्रा. डॉ. अश्वनी महाजन,
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ