संपादकीय

गंगाजळी उच्चांकी; पुढे काय?

अमृता चौगुले

10 डिसेंबरला भारताची परकीय चलनाची गंगाजळी 635 अब्ज डॉलरपेक्षा अधिक झाली. ही ऐतिहासिक उंची गाठल्यानंतर सरकार परकीय चलनाच्या धोरणात्मक वापरासाठी उपयुक्त आराखडा तयार करेल, अशी आशा आहे. देशात पायाभूत संरचना आणि वैद्यकीय सुविधांचे मजबुतीकरण, अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची खरेदी यासाठी यातील एक भाग खर्च करण्याचा निर्णय घेतला गेला पाहिजे.

संसदेत सादर झालेल्या अहवालानुसार, भारताजवळ जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वांत मोठी परकीय चलनाची गंगाजळी आहे. याबाबतीत चीन, जपान आणि स्वित्झर्लंड असे केवळ तीनच देश भारताच्या पुढे आहेत. दहा डिसेंबरला भारताची परकीय चलनाची गंगाजळी 635 अब्ज डॉलरपेक्षा अधिक झाली. अशा विशाल परकीय चलनाच्या गंगाजळीच्या पार्श्वभूमीवर देशाच्या आर्थिक आणि वित्तीय क्षेत्रात असा विचार केला जात आहे की, देशात पायाभूत संरचना आणि वैद्यकीय सुविधांचे मजबुतीकरण, चीन आणि पाकिस्तानकडून असलेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची उपयुक्त प्रमाणात खरेदी यासाठी परकीय चलनाच्या गंगाजळीतील एक भाग खर्च करण्याच्या दिशेने निर्णय घेतले गेले पाहिजेत. एवढ्या मोठ्या परकीय चलनाच्या साठ्यातून भारताची एक वर्षापर्यंतची आयात सहजगत्या केली जाऊ शकेल. देशातील मोठी परकीय चलनाची गंगाजळी हे देशाच्या चांगल्या आर्थिक स्थितीचे आणि आकर्षक आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीच्या परिस्थितीचे एक महत्त्वपूर्ण द्योतक बनले आहे.

1991 मध्ये आपल्या देशाची आर्थिक स्थिती खूपच खालावली होती. अर्थव्यवस्थेपुढे परदेशी देणी देण्याचे संकट उभे होते. त्यावेळी परकीय चलनाची गंगाजळी सुमारे दोन ते तीन आठवड्यांची आयात गरज पूर्ण करू शकेल एवढीच होती. त्या काळात रिझर्व्ह बँकेने सुमारे 47 टन सोने परदेशी बँकांकडे गहाण ठेवले आणि आयातीची गरज पूर्ण करण्यासाठी कर्ज घेतले होते.

सन 1991 मध्येच नवीन आर्थिक धोरण स्वीकारले. सन 1994 पासून देशाची परकीय चलनाची गंगाजळी वाढू लागली. 2002 नंतर या प्रक्रियेने तीव्र गती घेतली. सन 2004 मध्ये परकीय चलनाची गंगाजळी 100 अब्ज डॉलरपेक्षा अधिक झाली होती. त्यातही पुन्हा सातत्याने भर पडत राहिली आणि 5 जून 2020 रोजी परकीय चलनाची गंगाजळी 501 अब्ज डॉलरचा आकडा ओलांडून पुढे गेली. यावर्षी (2021) जानेवारीत परकीय चलनाच्या गंगाजळीचा आकार सुमारे 585 अब्ज डॉलरची मर्यादा ओलांडून पुढे गेला होता आणि वर्षाच्या अखेरपर्यंत तो सुमारे 635 अब्ज डॉलरच्या विक्रमी उंचीवर पोहोचला.

सध्या देशाची परकीय चलनाची गंगाजळी वाढती राहण्याची तीन महत्त्वाची कारणे आहेत. एक म्हणजे देशाची निर्यात वाढली. दुसरे कारण, प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक (एफडीआय) तसेच संस्थागत परदेशी गुंतवणूक (एफआयआय) वाढली. तिसरे कारण, अनिवासी भारतीयांनी मोठ्या प्रमाणात परकीय चलन भारतात पाठवले. सन 2021 मध्ये भारताचा एकूण परदेशी व्यापार आणि निर्यातही वाढली, ही अत्यंत उत्तम स्थिती म्हणता येईल.

देशाची परकीय चलनाची गंगाजळी एफडीआयच्या गतिमान प्रवाहामुळे झपाट्याने वाढली. गेल्या आर्थिक वर्षात म्हणजे 2020-21 मध्ये देशात एफडीआयने उच्चांक गाठला होता. 2020-21 या आर्थिक वर्षात एफडीआय 19 टक्क्यांनी वाढून ती 59.64 अब्ज डॉलरवर पोहोचली. गेल्या आर्थिक वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठी घसरण झाली. परंतु; तरीसुद्धा परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून भारताला प्राधान्य दिले गेले आणि त्याची अनेक कारणे आहेत. भारतात गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळतो. भारताच्या बाजारपेठेत मागणी सातत्याने चढीच असते. येथील एकाच शेअर बाजारात अनेक प्रकारच्या बाजारांची गुंतवणूक वैशिष्ट्ये आहेत. सन 2021 मध्ये अनिवासी भारतीयांनी 87 अब्ज डॉलरची रक्कम स्वदेशी पाठविली.

कोरोनामुळे उद्भवलेल्या भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरसुद्धा भारतीय रिझर्व्ह बँकेने परदेशी मुद्रा बाजारात पूर्णतः हस्तक्षेप करून वित्तीय अस्थिरता कमी करण्यासाठी आणि परदेशी बाजारांत रुपयाची स्पर्धाक्षमता वाढविण्यासाठी प्रभावी भूमिका निभावली आहे, ती वाढलेल्या परकीय चलनाच्या गंगाजळीमुळेच! महामारीच्या काळात बाजारात व्याजदर खाली आणण्यास यामुळे मदत मिळाली. आता भविष्यातही मोठ्या परकीय चलनाच्या गंगाजळीच्या बळावर रिझर्व्ह बँक मुद्रा बाजारात वित्तीय स्थैर्य आणण्यात यशस्वी होईल. सध्या भारताची परकीय चलनाची गंगाजळी ऐतिहासिक उंचीवर असताना सरकार परकीय चलनाच्या धोरणात्मक वापरासाठी उपयुक्त आराखडा तयार करेल, अशी आशा आहे.

– डॉ. जयंतीलाल भंडारी, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT