संपादकीय

खच्चीकरण नको !

अमृता चौगुले

पालक आणि मुला-मुलींमध्ये अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवतात; पण त्यातून समोरचा दुखावला जाऊ नये, याची काळजी ज्येष्ठांनी घेतली पाहिजे. पालकांकडून खच्चीकरण होण्याने मुलांवर दीर्घकालीन परिणाम होतात. हे सर्व नात्यांवर परिणाम करणारे ठरते.

बर्‍याचदा 24 ते 30 वयादरम्यानच्या तरुण-तरुणींची नोकरी गेली वा पगारात कपात झाली, या कारणाने किंवा गुण कमी, लग्‍न जमण्यातील अडचण, वाढते वय इत्यादी कारणांवरून पालकांकडून ऐकून घ्यावे लागते; पण यातून मुलांचे मानसिक खच्चीकरण तर होत नाही ना, हे गांभीर्याने पाहिले पाहिजे. अनेक घरांत दिसून येणारे हे निरीक्षण आहे. पूर्वी त्याचे इतके काही वाटत नव्हते; पण आता काळाच्या ओघात ही समस्या दिवसेंदिवस प्रखत होत चालल्याचे वाटते. पालक, कुटुंबाकडूनच असे खच्चीकरण होणे खचितच अयोग्य आहे.

कोरोना काळात अनेक तरुण मुला-मुलींचे 'वर्क फ्रॉम होम' सुरू आहे. अनेकांच्या नोकरीवर पाणी फिरले वा पगारात तरी कपात झाली. त्यामुळे घरखर्च परवडेना. आर्थिक तंगी. घरातून बाहेर पडणार नसलो, तरी पोट घरात बसून भरावे लागतच आहे. अशा मुलांना पालक व कुटुंबाकडून, समाजाकडून जी बोलणी खावी लागतात, यातून त्यांचे मानसिक खच्चीकरण होते. विवाहित असल्यास पत्नी व अपत्यांच्या गरजांची पूर्तताही आली. त्यामुळे तो खर्चही असतो. गरजा कमी करता येऊ शकतात; पण गरजा संपत नाहीत. ऑनलाईन शिकणार्‍यांना तर 'शिकतोय तर घरातूनच, मग जरा काम-धंदा करायला काय झाले' असे शब्द कानावर पडत असतात; पण यातून मुले खचतात. 16 ते 22 वयोगटातील अनेकजण जसे मिळेल तसे शिक्षण घेऊन पुढील शिक्षणासाठी पैसा जमा करतात व कुटुंबास हातभारही लावतात; पण प्रश्‍न पडतो त्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष तर होत नाही ना? सर्वच उद्योग-व्यवसाय, संस्था ओसाड झाल्या असे नाही. काहींचा पगारवाढ, बदल्या, बढती झाल्या. अशा व्यक्‍तींशी आपल्या मुलांची तुलना करून आपल्याच मुलात कमी आहे म्हणून त्यांना दोष देणे थांबवले पाहिजे. कदाचित सध्याचा काळ स्थिरतेचा/पठारावस्थेचा वा अधोगतीचा असेल, याचा विचार न करता तुलना करण्यातून मन दुखावले जाते. नोकरीवर सगळे अवलंबून असणार्‍यांनी तरी काय करावे? मग, शेती तीही थोडी-फार असेल, त्यावर तरी सगळे कसे चालायचे?

शालेय मुलांची हीच स्थिती कमी गुण मिळाले म्हणून दिसते. निकाल विशिष्ट निकषांद्वारे दिला. त्यातही कमी-जास्त गुण मिळाले; पण पालकांची घरात बसून शिकतोस तरी गुण कमी कसे, असा संवाद होतो. ज्यांनी मुलांना नवीन मोबाईल, लॅपटॉप दिले व त्यानंतर गुण कमी असतील, तर अनेकांना धक्‍काच बसतो; पण सर्व काही मुलांच्या हातात असेलच असे नाही. याचा विचार न करता कमी गुणांवरून जास्त गुण असणार्‍या मुलांशी तुलना करून आपल्या पाल्याला दुय्यम का लेखावे? सगळ्यांचे कथित योग्य वयातच लग्‍न जमेल असे नाही; पण पारंपरिक लग्‍न आणि वयाची पालकांकडून सुरू असलेली चर्चा संपत नाही. याने मुले स्वत:त दोष शोधू लागतात.नकारात्मकतेमुळे आत्महत्येचे पाऊल उचलले जाऊ शकते. अतिताणामुळे मुले व्यसनाच्या आहारी जातात. मुले-मुली घरापासून, समाजापासून, आपल्या माणसांपासून मनाने दूर जातात. सतत टोमणे, बोलणी, नकार देणारी माणसे भेटतील; पण यातून सावरेल तो टीकेल. नाही सावरणार तो भटकेल. पालकांनी मुलांची मने जाणून घ्यावीत. कारण, ही वेळ अनेकांवर आलेली असू शकते. काय दिलेस तू, काय केलेस तू, काय करशील आता, कसे होईल तुझं अशा निगेटिव्ह बाबी नकोतच.

आज नाही, तर उद्या लागेल नोकरी, होईल पगार वाढ, सुरळीत होईल सर्वकाही, हे सांगून प्रेरणा द्यायला हवी. युवकांच्या आधारे देश प्रगती करत असतो. त्यामुळे त्या आधाराला आधार द्यायला हवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT