संपादकीय

कोविंद यांना निरोप

मोहन कारंडे

भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी पार पडला आणि देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर आदिवासी समाजातील एक महिला विराजमान झाली. द्रौपदी मुर्मू यांच्या आधी चौदावे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांची निवड झाली होती. दलित समाजातील कोविंद यांच्यानंतर झालेल्या मुर्मू यांच्या निवडीमुळे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार्‍या भारताने सामाजिक क्षेत्रातही एक दमदार पाऊल पुढे टाकलेे. द्रौपदी मुर्मू निवडून आल्या, त्यावेळी या स्तंभातून त्यांच्या कर्तृत्वाचा मागोवा घेण्यात आला होता. मुर्मू यांच्या शपथविधीच्या आदल्या दिवशी मावळते राष्ट्रपती कोविंद यांचा शानदार निरोप समारंभ झाला. देशाचे घटनात्मक प्रमुख म्हणून त्यांनी पाच वर्षे बजावलेल्या कामगिरीबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली, त्यांचा गौरव करण्यात आला. कोविंद यांनी समारोपाच्या भाषणात मांडलेले लोकशाहीबद्दलचे चिंतन समर्पक म्हणावे लागेल. देशातील प्रत्येक नागरिकाची असलेली लोकशाहीवरील कमालीची निष्ठा हे आमच्या जिवंत लोकशाहीचे द्योतक असल्याचे त्यांचे म्हणणे लोकशाही मूल्यांचा जागर करणारे आहे. कोविंद यांनी त्यांचा कार्यकाळ ज्या सन्मानाने पूर्ण केला त्याने त्यांची निवड किती सार्थ होती, हे दाखवून दिले. राजकीय पक्षांच्या समर्थनाने या पदावरील व्यक्तीची निवड होत असली तरी निवड झाल्यानंतर हे पद पक्षनिरपेक्ष असते. त्यामुळे या पदावरील व्यक्तीने राजकीय भूमिका बाजूला ठेवून निर्णय घेण्याची अपेक्षा केली जात असते. त्या अपेक्षेला त्यांनी तडा जाऊ दिला नाही. राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या राजकीय भूमिका वेगवेगळ्या असल्या की, अनेकदा संघर्षाचे प्रसंगही निर्माण होऊ शकतात. प्रणव मुखर्जी राष्ट्रपतिपदावर असताना नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार केंद्रात सत्तेवर आले; परंतु मुखर्जी यांनी कोणताही राजकीय संघर्ष निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली. राजेंद्र प्रसाद यांच्यापासूनची आपली राष्ट्रपतिपदाची उज्ज्वल परंपरा आहे. पंडित जवाहरलाल नेहरू आणि राजेंद्र प्रसाद एकाच वैचारिक प्रवाहातील असले तरी हिंदू कोड बिलावरील त्यांच्यातील मतभिन्नता चर्चेची ठरली होती. राजेंद्र प्रसाद सोमनाथ मंदिराच्या उद्घाटनाला गेले तेव्हा, नेहरूंनी त्याबाबत नापसंती व्यक्त करताना राष्ट्रपतींनी कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाला जाणे योग्य नसल्याचे म्हटले होते. रामनाथ कोविंद यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील भूमिका वेगळ्या असल्या तरी त्यांनी राष्ट्रपतिपदावरून काम करताना धर्मनिरपेक्षतेशी बांधिलकी मानली होती. राष्ट्रपती भवनात होणारी दिवाळी आणि इफ्तार पार्टी हे दोन्ही बंद करून करदात्यांच्या पैशातून राष्ट्रपती भवनात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होणार नाही, हे स्पष्ट केले होते.

रामनाथ कोविंद यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत ऋजू आणि सौजन्यशील होते. पक्षामध्ये संघटनात्मक पातळीवर त्यांनी विविध जबाबदार्‍या पार पाडल्या होत्याच; शिवाय संसदेत असताना अनुसूचित जाती, जमाती कल्याण, गृह, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण, कायदा आणि न्याय अशा विविध समित्यांवर काम केले होते. बिहारच्या राज्यपालपदी असताना त्यांची राष्ट्रपतिपदावर नियुक्ती झाली, त्याअर्थाने एका घटनात्मक पदावरून त्यांना अधिक मोठ्या घटनात्मक पदावर बढती मिळाली होती. राजकारणात काम करताना समाजकारणात सक्रिय असलेले कोविंद प्रत्यक्षात राजकीय पटलावर कधी आक्रमकपणे पुढे आले नव्हते. ज्या सभ्यतेने आणि सुसंस्कृतपणे ते राजकारणात वावरले, त्याच सुसंस्कृततेचे दर्शन त्यांनी राष्ट्रपतिपदावरूनही देशाला घडविले. आपल्या कृतीमुळे पदाच्या प्रतिष्ठेला धक्का लागणार नाही, याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली. कोविंद यांनी मे 2018 मध्ये तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख म्हणून सियाचीनमधील जगातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या कुमार पोस्टला भेट दिली होती. आपल्याला पाच लाख रुपये पगार मिळतो; परंतु त्यातील पावणेतीन लाख रुपये कर भरण्यातच जातात, असे विधान करून त्यांनी देशभरातील करदात्या नोकरदारवर्गाच्या भावनाच व्यक्त केल्या होत्या. राष्ट्रपतिपदाची जी थोर परंपरा आहे, त्या परंपरेला साजेसे काम कोविंद यांनी केले. राष्ट्रपतिपदाच्या राजशिष्टाचाराचे अवडंबर न माजवता काहीवेळा सहज व्यवहार केला. कानपूरजवळच्या परौख या त्यांच्या मूळ गावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा होता. आपल्या जन्मगावी येणार्‍या देशाच्या पंतप्रधानांच्या स्वागतासाठी तेव्हा कोविंद स्वतः उपस्थित होते. त्यांच्या या कृतीमुळे पंतप्रधान मोदीही भारावून गेले होते. कोविंद यांनी राष्ट्रपतिपदाच्या कारकिर्दीत वेगवेगळ्या 33 देशांचे दौरे करून भारताचे मैत्र बळकट करण्याचा प्रयत्न केला. मादागास्कर, इक्वेटोरियल गिनी, एस्वातिनी, क्रोएशिया, बोलीविया आणि गिनी या देशांनी आपला सर्वोच्च सन्मान देऊन भारताच्या राष्ट्रपतींचा गौरव केला. 25 जुलै 2017 रोजी राष्ट्रपतिपदावर विराजमान होताना त्यांनी भारताच्या विविधतेतील एकतेच्या परंपरेचा गौरव केला. या भूमीमध्ये आपण राज्य आणि प्रदेश, धर्म, भाषा, संस्कृती, जीवनशैली आणि इतरही बर्‍याच गोष्टींचे मिश्रण पाहतो. आपण इतके भिन्न आहोत, तरीही इतके समान आणि एक आहोत, अशा शब्दांत त्यांनी भूमिका मांडली. तेच राष्ट्रपती कोविंद पाच वर्षांनी पदावरून पायउतार होताना म्हणाले, 'एका खेड्यातील सामान्य कुटुंबात वाढलेल्या, मातीच्या घरात राहिलेल्या एका तरुण मुलाला देशाच्या सर्वोच्च घटनात्मक कार्यालयाची कल्पनाही नव्हती. तो रामनाथ कोविंद आज तुम्हा सर्व देशवासीयांशी संवाद साधत आहे.' आपल्या देशाच्या चैतन्यमय लोकशाही व्यवस्थेचे सामर्थ्य त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले. द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीने त्या सामर्थ्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT