संपादकीय

कार विकू, पीएमटीमध्ये बसू

backup backup

त्या दिवशी पुण्यातले सगळेच रस्ते खूपच जाम होते. खरंतर रोजच असतात; पण त्या दिवसाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी असे बोलण्याची पुण्यात प्रथा आहे. सगळेच पुणेकर पोलिस ग्राऊंडच्या दिशेने चालले होते, तेही स्वतः विकत घेतलेल्या कारने. कारण तिथे भव्य'कार विको' मेळाव्याचे आयोजन केले होते. सर्वांसमोर एकच प्रश्न होता की, कार कुणाला विकायची. कारण एरवी विकणारे कमी आणि विकत घेणारे जास्त.

यावेळी परिस्थिती उलटी होती. सगळ्यांनाच त्यांची कार विकायची होती. कारण, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर सरांनी 'तुम्हाला पुण्यात पीएमपीएमएलची बस वेळेत मिळाली तर काय कराल?' या प्रश्नाचे उत्तर देताना 'असे झाले तर मी कार विकून टाकेन' असे उत्तर दिले. सरांनी पुणेकरांना कधीही पूर्ण न होणारे स्वप्न दाखविले. आमचे करमळकर सर साधे, सरळ.

पुणेकरांचाच काय कुणाचाही त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसेल असे व्यक्तिमत्त्व. आम्ही पुणेकरांनी ठेवला की हो विश्वास आणि निघालो आमच्या कार विकायला! त्यांच्या विद्यापीठाने म्हणे पीएमपीएमएलसमवेत सामंजस्य करार केला म्हणे! त्यातून विद्यार्थ्यांनी नागरिकांना मिळणार्‍या बस सेवेबाबत सर्वेक्षण केले म्हणे. त्यात असे आढळून आले की, बससेवा देताना पीएमपीएमएलची कोणतीही चूक नाही.

ते बिचारे जुन्या रंग उडालेल्या, फाटक्या सीट असलेल्या, जागोजाग बंद पडणार्‍या, उद्धट चालक आणि वाहक असणार्‍या, वेळेत न सुटणार्‍या, अपेक्षित थांब्यावर न थांबणार्‍या बसेस बिनबोभाट पुरवित आहेत. खरा दोष आहे तो पुणेकरांचाच. ते येवढे जागृत, पण या बस सेवेबाबत चकार शब्द काढत नाहीत. यात सेवा देणार्‍यांचा दोष तो काय? यामुळे पश्चात्ताप होऊन पुणेकरांनी आपल्या कार विकून बसने प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे हो! या कार पीएमपीएमएलने विकत घेऊन त्या विकून आम्हास चांगली बससेवा द्यावी, एवढेच मागणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT