सत्ताप्राप्ती, प्राप्त सत्तेचे जतन आणि संवर्धन, त्यासाठी सर्व प्रकारच्या हिकमती करणे म्हणजेच राजकारण. या तत्त्वानुसार राजकारण सनातन आहे, असे म्हणता येते. राजकारण सर्वव्यापी, सर्वगामी असते. एका राजनीतीज्ञाने असे म्हटले आहे की, 'राजकारण म्हणजे कुणाला, केव्हा, काय व कसे मिळते याचा अभ्यास'. गोव्याच्या राजकीय अवकाशातील सांप्रतकाळातील घडामोडी पाहता राजकारणाची ही एक व्याख्या आठवते. ती बसतेही चपखल. देशाच्या तुलनेत गोवा भौगोलिकद़ृष्ट्या चिमुकला असा निसर्गसंपन्न भूप्रदेश. या भूप्रदेशात 1990 च्या दशकात पक्षांतराच्या साथीच्या राजकीय रोगाचा प्रादुर्भाव झाला. तो आजतागायत प्रभावी आणि गतिमान आहे. गोवाच नव्हे तर देशात अनेक राज्यांत नव्या राजकीय सोयरीकी होताहेत, जुन्या तुटताहेत. आजघडीला गोव्यात काँग्रेसच्या अकरा आमदारांपैकी आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश अनपेक्षित, धक्कादायक असा अजिबात नाही. तो होणार हे निश्चितच होते. फक्त आज की उद्या म्हणजेच मुहूर्त बाकी होता.
पक्षांतरबंदी कायद्याच्या कचाट्यातून सहीसलामत सुटायचे झाल्यास अकरापैकी किमान आठ आमदार फुटण्याची गरज होती. कुंपणावर बसलेल्या एक-दोन आमदारांमुळे पुढे झालेल्यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडत गेला. अखेर कुंपणावरील आमदारांना राजी करण्यात यश आले आणि गोवा काँग्रेसला खिंडार पडले. काँग्रेसची देशभर जी स्थिती-गती आहे, त्याचेच प्रतिरूप म्हणजे गोवा काँग्रेस. खिळखिळ्या झालेल्या या 'पुराणी हवेली'च्या कार्यपद्धतीत ना दिल्लीमध्ये फरक पडला, ना गोव्यात. गोव्यात तर 2017 मध्ये 17 आमदार जिंकलेले असतानाही सत्तेचा हातातोंडाशी आलेला घास आत्मघाती, कचखाऊ नेतृत्वामुळे काँग्रेसला खाता आलेला नव्हता. तो घास 13 आमदार असतानाही भाजपने चतुराईने आणि गतीने घेतला. सत्तेवर मांड ठोकली. 40 सदस्य संख्येच्या सभागृहात 21 हा बहुमतासाठीचा जादुई आकडा गाठण्यासाठी भाजपने सर्व तर्हेच्या हिकमती केल्या.
2022 च्या विधानसभा निवडणुकीत तर एकहाती सत्ता स्थापन केली. संख्याबळाची गरज नसतानाही सहकारी मित्र वाढवले. त्याचाच एक भाग म्हणून आठ काँग्रेस आमदारांच्या या भाजप प्रवेशाकडे पाहता येईल. सत्ता तर आमचीच असेल इतकेच नव्हे, तर विरोधी अवकाशाचे अस्तित्वही आम्ही मिटवून टाकू, अशी ही आक्रमक वाटचाल. अस्तित्व न मिटल्यास दुसर्या शब्दात सत्ताधारी आणि विरोधक दोन्हीही भूमिका आम्हीच वठवू. तात्पर्य काय, खेळ आमचाच. येथे भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे वक्तव्य आठवते. अलीकडेच ते म्हणाले, 'काँग्रेस संपली आहे, देशात यापुढे भाजप हा एकमेव पक्ष असेल, अन्य पक्ष नसतील.' त्याचा एक छोटासा दाखला म्हणून गोव्यातील घडामोडींकडे पाहता येईल. इतकेच नव्हे, तर देशाच्या अन्य राज्यांतील राजकीय समीकरणेही नड्डा यांच्या विधानाच्या पुष्ठ्यर्थ पाहता येतील. बिहारमधील ताज्या प्रतिक्रियेने त्याला बळ मिळाले होतेच, दरी दिसत असतानाही गोव्यातील घडामोडींवर काँग्रेस नेते अपेक्षेप्रमाणे 'सुशेगात' राहिले.
काँग्रेसतर्फे देशभर 'भारत जोडो' अभियान सुरू आहे. अशावेळी गोव्यात 'काँग्रेस छोडो आणि आणि भाजप जोडो' असे आंदोलन सुरू झाल्याची प्रतिक्रिया समाजमाध्यमांत उमटली. बदलत्या राजकारणाची परिभाषा समजून घेऊन कार्यपद्धती बदलास, गतीने निर्णय घेण्यास काँग्रेस तयार नाही. त्याचा परिणाम दिल्लीपासून सर्वत्र झालेला आहे. लोकशाही आणि निवडणुकीचे नाते, राजकीय अर्थशास्त्राचा प्रभाव या पैलूंकडे काँग्रेसचे देशभर दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे निवडणुकीला सदैव तयार असणारा भाजप आणि आपल्याच कोशात आत्ममुग्ध असणारी काँग्रेस अशी दोन टोके आहेेत. लोकसभेच्या 'मिशन 2024' साठी भाजपची निकराची मोर्चेबांधणी सुरू असल्याचे महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील राजकीय घडामोडींवरून स्पष्ट होते.
भाजपविरोधात सर्व विरोधकांनी देशभर एकत्रित लढले पाहिजे, असे प्रमुख विरोधी नेते सांगत असताना भाजप मोर्चेबांधणीत एक पाऊल पुढे असल्याचे मान्य करावे लागते. त्यामुळेच भाजप आणि विरोधकांच्या उक्ती आणि कृतीमध्ये मोठे राजकीय अंतर आहे. गोव्यात 2022 च्या विधानसभा निवडणुकीत मतदानापूर्वी काँग्रेसचे सर्व उमेदवार, नेतेमंडळी, पदाधिकारी यांनी पक्षांतर करणार नसल्याची ग्वाही प्रतिज्ञापत्राद्वारे दिलेली होती. इतकेच नव्हे, तर मंदिर, मशीद, गुरुद्वारा आणि चर्चमध्ये जाऊन पक्षांतर करणार नसल्याची शपथ घेतलेली होती. गोव्याची सामाजिक संरचना आणि सौहार्दाचे वातावरण पाहता सर्व प्रार्थनास्थळांत जाऊन शपथ घेण्याचा बेरकीपणा या मंडळींनी दाखवलेला होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे मूळचे भाजपचेच. तेथून उडी मारून ते काँग्रेसमध्ये गेले. आता त्यांनी पुन्हा एकदा उडी मारली आणि स्वगृही परतले.
यावर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर समाजमाध्यमांत खूप चर्वितचर्वण होत आहे. ते म्हणतात, 'मी देवावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. मी पुन्हा देवाचा कौल घेतला. मी देवापुढे माझे गार्हाणे मांडले. देवाला सगळी परिस्थिती सांगितली. त्यावर देवाने मला तुला हवा तो निर्णय घे. मी तुझ्या पाठीशी असल्याचे सांगितलेे. त्यानंतर आपण भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला.' त्यांचा हा व्यक्तिगत निर्णय होता आणि तो गोव्याच्या किती हिताचा, हा प्रश्न तूर्त बाजूला ठेवला, तरी भाजपच्या जिंकण्याच्या आक्रमक वृत्तीचे ते आणखी एक उदाहरण म्हणता येईल. दुसरीकडे विरोधी पक्षांचा भाजपविरोध किती पोकळ आहे, त्यानेही स्वार्थाचे टोक गाठले आहे. त्यातही ज्याकडे मोठ्या आशेने पाहिले जाते ती काँग्रेस आणि तिचे तथाकथित नेते किती गलितगात्र झाले आहेत, हे सांगणारा गोव्याच्या धड्याचा हा अन्वयार्थ, दुसरे काय?