संपादकीय

एक्स्प्रेस मरणाची सोय!

backup backup

पेढा घ्या.
अरे वा! पेढा काय, केव्हाही आवडतोच; पण हा 'किस खुशीमें?'
नातू परत आला ना आमचा.
कुठल्या लढाईवरून आला एवढा?
लढाई नाही; पण मुंबईपासून पुण्याला आला. एक्स्प्रेस वेने आला तरी सुखरूप, हातीपायी धड आला. ही गोष्ट आता साजरी करण्याजोगीच झाली ना?

प्रश्‍नच नाही. घाटात किती रखडला?
तोही फार नाही म्हणे. काल भलतंच गुरूबळ असणार बघा त्याच्या पत्रिकेत. एरवी एक्स्प्रेस वे चे शाप कोणाला चुकणार आहेत?
एक्स्प्रेस वे म्हणजे द्रुतगती मार्ग सुरू होणार होता तेव्हा आपणच सगळे किती हुरळलो होतो? काय तर म्हणे, मुंबई-पुण्यातलं अंतर कमी होणार, पेट्रोलचा खर्च कमी होणार, लोण्यासारख्या रस्त्यावरून घरंगळल्यासारखे आपण तीन तासांत सगळं अंतर कापणार!
ते अजूनही होतंच हो. म्हटलं तर मुंबई-पुणे प्रवास सोपा झालाच आहे आता; पण एकीकडे टोलमुळे महाग झालाय तसाच अनेकदा जीवावर बेतणाराही झालाय.

बोरघाटाचा उतार, आडोशी बोगद्यानंतरचा भाग, अमृतांजन पूल इथे मोक्ष मिळतोच कोणाकोणाला! मरणाचापण एक्स्प्रेस वे तयार झालाय म्हणाना! सगळं अवजड वाहनांमुळे होतं बघा. एक माईचा लाल लेनची शिस्त पाळेल तर शपथ! डिझेल वाचवायसाठी उतारावर न्यूट्रलवर गाड्या चालवायच्या! त्याने स्पीड कंट्रोल सुटणार तो वेगळाच. कधी कोण लेन चुकवून समोरून मिठी मारायला येईल, नेम नाही. कोणाची नजर नसते का यांच्यावर?

आहेत की! रस्ते विकास महामंडळ आहे. आयआरबी आहे. पोलीस आहेत असे बरेच बसवलेत. एखादा अपघात झाला, चार माणसं मेली की, जागे होतात सगळे. थोडे दिवस मारतात पाचर की, पुन्हा पहिले पाढे पंचावन्‍न!
मध्ये थोडे दिवस ते काहीतरी झीरो फेटॅलिटी कॉरिडॉर का कायतरी करणार होते ना?
असेल. मध्येमध्ये सरकारला जाग येते. आय.टी.एम.एस.ची पण भाषा होते.

आय.टी.एम.एस. म्हणजे?
इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टिम असं काहीतरी होतं वाटतं. आय.टी. म्हटलं की, सगळ्यांना ऐटीचं वाटतं.
हो तर! तेवढाच वेगाचाही नाद असतो आता सगळ्यांना. बंदुकीच्या गोळ्या सुटाव्यात तशा गाड्या सोडणार सगळे.
गाड्या कितीही पळवल्या तरी पडून पडून फार तर दहा मिनिटांचाच फरक पडेल ना एण्डच्या शेवटाला?
होय हो; पण रुबाब केवढा वाढतो असले पराक्रम सांगताना. मी सगळ्यांना हरवलं, मी शंभर मिनिटांत एक्स्प्रेस वे संपवला.

आणि आयुष्यही संपवलं तर?
वेगाची नशा सर्वात वाईट. लेन तोडायच्या, लेनमध्ये लंगडीधावकी खेळायचं आणि जीवाशीपण खेळायचं.
पोलिसानं पकडलंच तर मांडवली करायला जायचं.
कधी सुधारणार आपण? समजेना झालंय!

म्हणून तर, नातू एक्स्प्रेस वे नी जायला निघाला की, आमची ही देव पाण्यात ठेवते. सुखरूप पोहोचला की पेढे वाटते.
त्या देवांचीच प्रार्थना करायला सांगा वहिनींना. सुधारणा होवोतच; पण त्याआधी माणसं सुधारोत म्हणावं आमच्या देशातली. नियम पाळण्यासाठी असतात, हा नियम पहिल्यांदा शिकूदेत म्हणावं!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT