संपादकीय

एक संवाद

backup backup

ही घ्या अंगठी सीतामाई.
अरे हनुमंता, आलास तू? किती दिवसांनी फिरकतोयस?
बिझी होतो माई.
कशात बिझी? वृक्ष मुळासकट उपटण्यात की पर्वत उचलून नेण्यात?
ते शक्तीच्या प्रदर्शनाचे उद्योग आता संपलेत माते, आता युक्तीने लढवण्यावर भर द्यायचाय.
ये इकडे, शांतपणे बसून सांग बरं. उगाच सैरावैरा हुप्पा, हैय्या करत किती पळणार आहेस बाबा?
नाही पळणार तूर्त; पण निवांतपणे इथेही नाही थांबू शकणार. पुढचे काही दिवस सलग पृथ्वीवरच काढावे म्हणतो.
कशासाठी? एकाजागी थांबून चैन पडणार आहे का तुला?
नाविलाज आहे. सध्या माझी जास्त गरज तिथेच आहे.
का बरं? पावसाळ्यापूर्वीच्या बंदोबस्ताच्या कामासाठी तुझी सेना लागणार आहे का?
नाही. मलाच लोकांना नीट चालिसा म्हणायला शिकवावं लागणार आहे.
हनुमान चालिसा? ती तर तुलसीदासाने लिहून ठेवलीच आहे ना मागे? तब्बल चाळीस श्लोकांची?
होय हो; पण मूळची अवधीतली ती. लोकांना नव्याने शिकायला अवधी लागणार बराचसा. मुळात आपल्यात 'भीमरूपी महारूद्रा' सहसा जास्त पॉप्युलर आहे. ते काढून तिथे चालिसा चालीसकट बसवावी म्हणतो.
कशाला एवढा खटाटोप करायचा?
माई, बरेच लोक चालिसाची पार धूळधाण उडवताहेत सध्या. नाक्या-नाक्यांवर, पक्ष, कचेर्‍यांमध्ये वगैरे पुरती लक्तरं लटकताहेत तिची. ऐकवत नाही एकेकदा.
मग दुर्लक्ष कर. तुला काय? शेपटी वाट्टेल तशी फुगवता येते, तसेच कान हवे तेव्हा बंद करावेत. संपलं.
तो विचार होताच. तेवढ्यात नव्याने माझ्या जन्मस्थानाचा वाद सुरू केलाय काही महाभागांनी.
त्यात वाद काय घालायचाय? तू अंजनीसुत, म्हणजे तुझा जन्म अंजनेरीचा असणार. हा साधा कॉमनसेन्स असायला हवा ना जांबुवंता?
असं आपल्याला वाटतं रघुनंदिनी; पण कोणत्याही स्थानाला विकासनिधी मिळायची वेळ आली की, पहिलेछूट कॉमनसेन्सचा बळी जातो हा कलियुगाचा नियम आहे बरं जानकीदेवी.
हो का? इथे लंकेत बसूनबसून बर्‍याच गोष्टी मला कळत नाहीत कपिवर. तूच प्रकाश टाकावास हे बरं!
काय आहे माई, कोणीतरी मध्येच किष्किंधाचा वांधा उभा केलाय बघा.
कर्नाटकातलं किष्किंधा?
होय. तेच. नाशिकजवळच्या अंजनेरीवरून माझा जन्म थेट कर्नाटकात न्यायचा घाट घातलाय काहींनी.
मग आता रे?
आता काय कथा? पुढचा काही काळ यावरून वाद घालतील लोक. तो मागे पडला की, मी खरंच सूर्यावर झेप घेतली का? मी खरंच चिरंजीवी आहे का? गंधमादन पर्वत नक्की कुठे आहे? यावरून पाळीपाळीने वादाचे आखाडे घातले जातील. कुठून तरी मला आपापल्या राज्यात, पक्षात, मोहल्ल्यात ओढायचे प्रयत्न चालतील.
अरे वा! म्हणजे एकदम डिमांडमध्ये येणार की तू वज्रहनुमंता. कर एंजॉय ही लोकप्रियतेची लाट!
मला लोकप्रियतेचा प्रॉब्लेम नाहीये राज्ञी. लोक माझी आठवण काढताहेत, चांगलंच आहे; पण यापेक्षा प्रभूचरणी मी वाहिलेल्या निष्ठेचं अनुकरण लोकांनी करावं. माझ्याप्रमाणे आपापल्या नेत्याशी, पक्षाशी, राज्याशी एकनिष्ठ राहावं तेव्हाच खरे अच्छे दिन येतील ना वैदेही?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT