संपादकीय

उद्योगजगताला हादरा

backup backup

उद्योगजगतातील उमदे व्यक्‍तिमत्त्व सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनामुळे केवळ एका उद्यमशील कुटुंबाचे किंवा उद्योगसमूहाचे नव्हे, तर देशाच्या उद्योगजगताचे मोठे नुकसान झाले आहे. देशातील प्रमुख औद्योगिक घराण्यांपैकी एक असलेल्या कुटुंबातील प्रमुख व्यक्‍तीचा अशा रीतीने मृत्यू व्हावा ही धक्‍कादायक गोष्ट तर आहेच; परंतु आपल्या एकूण व्यवस्थेसाठीही लाजिरवाणी, असे म्हणावे लागेल.

गेल्या महिन्यात पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील अपघातात झालेल्या शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या मृत्यूनंतर सायरस मिस्त्री यांच्या अपघातामुळे पुन्हा एकदा रस्ता सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे. अवघ्या 54 वर्षांचे सायरस मिस्त्री हे साधेसुधे व्यक्‍तिमत्त्व नव्हते. मिस्त्री यांच्या आजोबांनी 1930 मध्ये टाटा सन्समध्ये पहिल्यांदा भागभांडवल खरेदी केले होते. टाटा समूहातील सर्वात मोठे भागधारक म्हणून त्यांचा 18.5 टक्के हिस्सा आहे. टाटा समूहातील सूत्रधार कंपनी आणि मुख्यत: विश्‍वस्त संस्थेद्वारे नियंत्रित केल्या जाणार्‍या टाटा सन्समधील ते सर्वात मोठे एकल भागधारक आहेत. त्याचेच प्रतिनिधित्व करीत 2006 सालापासून सायरस मिस्त्री टाटा सन्सवर संचालक म्हणून कार्यरत होते. मिस्त्री यांच्या कार्यपद्धतीने खुद्द रतन टाटा यांना प्रभावित केले होते. 'त्यांची गुणवत्ता आणि क्षमता, त्यांची सूक्ष्म निरीक्षणे आणि त्यांची नम—ता यामुळे प्रभावित झालो आहे,' असे रतन टाटा यांनी त्यांच्यासंदर्भात म्हटले होते.

प्रारंभीच्या काळात रतन टाटा यांच्यासोबत काम करीत नंतर त्यांनी टाटा समूहाचे सहावे अध्यक्ष म्हणून सूत्रेही हाती घेतली. रतन टाटा यांच्यासारख्या देशातील प्रतिष्ठित उद्योगपतीने आपले वारसदार म्हणून त्यांची निवड केली होती, यावरून त्यांच्या कर्तृत्वाची कल्पना येऊ शकते. चार वर्षे त्यांनी टाटा समूहाची जबाबदारी पार पाडली; परंतु मतभेदानंतर टाटा समूहातून त्यांना पायउतार व्हावे लागले. सायरस मिस्त्री यांना जवळून ओळखणार्‍यांच्या मतानुसार निष्कारण वाद किंवा संघर्ष करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता; परंतु केवळ व्यक्‍तिगत सन्मानासाठी त्यांनी त्यासंदर्भाने न्यायालयीन लढाई केली. सायरस मिस्त्री यांनी शापूरजी पालनजी अँड कंपनी लिमिटेड या आपल्या कुटुंबाच्या मालकीच्या बांधकाम व्यवसायात 1991 मध्ये वयाच्या 23 व्या वर्षी संचालक म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. तीन वर्षांनी ते कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बनले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने झपाट्याने यशाचे शिखर गाठले. 2012 साली टाटा सन्सच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर खर्‍या अर्थाने ते प्रसिद्धीस आले. टाटा हे आडनाव नसलेले ते टाटा समूहाचे दुसरे अध्यक्ष बनले होते.

रस्ते अपघातात रोज शेकडो माणसे किड्या-मुंग्यांसारखी मरत असतात, प्रत्येक माणसाचा जीव मोलाचा. 'लाख मेले तरी चालतील, परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे', अशी आपल्याकडे एक म्हण आहे. त्यानुसार विचार केला तर सायरस मिस्त्री हे लाखांच्या पोशिंद्यांपैकी एक होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू अधिक चटका लावणारा तर आहेच; परंतु देशाचे मोठे नुकसान करणाराही म्हणावा लागतो. रस्ते अपघात सतत होत असतात आणि असे कुणी मोठे व्यक्‍तिमत्त्व गेले की कारणांची चर्चा होत असते. गेल्या महिन्यात पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूच्या निमित्ताने रस्ते अपघात आणि सुविधांची चर्चा झाली होती.

रस्ता वेगळा असला तरी पाठोपाठ झालेल्या सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूने त्याचसंदर्भातील मुद्द्यांची पुन्हा उजळणी करण्याची वेळ आणली आहे. तुम्ही गाडी कोणत्या कंपनीची वापरता आणि त्यात सुरक्षिततेसंदर्भातील किती उपाययोजना आहेत, हे महत्त्वाचे असते; परंतु तेवढीच एक गोष्ट महत्त्वाचे नसते. त्याशिवायही अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात. नियमांचे पालन, सुरक्षिततेची काळजी आणि वेगावर नियंत्रण या तीन गोष्टी सर्वाधिक महत्त्वाच्या. मिस्त्री हे पंडोल कुटुंबीयांसह अहमदाबादहून मुंबईकडे मर्सिडीज मोटारीने येत होते.

चारोटी नाक्याजवळील सूर्या नदीच्या पुलाच्या कठड्याला त्यांच्या भरधाव मोटारीची धडक बसल्याने मागील आसनावर बसलेल्या मिस्त्री आणि जहाँगीर पंडोल यांचा मृत्यू झाला. ते ज्या मोटारीतून प्रवास करीत होते, ती सुरक्षिततेसह आरामदायी प्रवासाचे दावे करणारी होती. अशा महागड्या मोटारीत असूनही त्यांचा जीव वाचू शकला नाही, यामागचे कारण समजून घेण्याची आवश्यकता आहे. अतिवेग, सीट बेल्ट न लावणे आणि रस्त्याच्या कामातील अनास्था अशी तीन कारणे सकृतदर्शनी पुढे आली. मुंबईकडे येणारी ही मोटार अतिवेगात असल्यामुळे नियंत्रण मिळवता आले नाही. पाठीमागील सीटवर बसलेल्या सायरस मिस्त्री आणि जहाँगीर पंडोल यांनी सीट बेल्ट न लावल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. पुढच्या सीटवर बसलेले दारिस पंडोल आणि त्यांची पत्नी चालक अनाहिता पंडोल यांनी सीटबेल्ट लावले असल्यामुळे त्यांचे प्राण वाचू शकले.

अपघात झालेले ठिकाण हे अपघाती क्षेत्र आहे. मुंबई-अहमदाबाद या सहापदरी महामार्गाचा काही भाग अद्याप चौपदरीच आहे. अपघाताच्या ठिकाणी तर तीनपदरी रस्ता निमुळता होत होत पुलावर दुपदरी होतो; परंतु यासंदर्भातील सूचना फलक लावला नसल्याने चालकाला याठिकाणी रस्त्याचा अंदाज येत नाही. मिस्त्री यांची कार चालवणार्‍या डॉ. अनाहिता पंडोल यांनाही त्याचा अंदाज न आल्याने मोटार पुलाच्या कठड्यावर आदळल्याचे सांगण्यात आले. रस्त्यांच्या कामाच्या घोषणा होतात, त्यावर राजकीय फायदा उचलला जातो; परंतु या रस्त्यांच्या कामांमधील संबंधित यंत्रणांची अनास्था अनेक लोकांचे बळी घेत असते. सायरस मिस्त्री आणि जहाँगीर पंडोल यांचाही याच अनास्थेने बळी घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT