रंगनाथ कोकणे, पर्यावरण अभ्यासक
दरवर्षीप्रमाणे यंदाही 29 जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिन जगभरात साजरा होत आहे. वाघ हा जैवसाखळीतील महत्त्वाचा वन्यपशू आहे. भारताच्या विविध प्राचीन ग्रंथांत, लोककथांमध्ये आणि कलाविष्कारांमध्ये वाघ हा शक्ती, निर्भयता आणि राजस सौंदर्याचे प्रतीक म्हणून समोर आला आहे. व्याघ्र दिनानित्ताने वाघाच्या संवर्धनासाठी सर्वसमावेशक कृती व्हायला हवी.
एकेकाळी संपूर्ण आशियात मुक्तपणे फिरणार्या या शाही प्राण्याची संख्या एका शतकात एक लाखावरून थेट 3500 पर्यंत खाली आली होती. हीच गंभीर परिस्थिती ओळखून 2010 मध्ये रशियात सेंट पीटर्सबर्ग येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय वाघ परिषदेत ‘टीएक्स-2’ हा संकल्प करण्यात आला. म्हणजे 2022 पर्यंत वन्य वाघांची संख्या दुप्पट करायची! 13 वाघ-निवास देशांनी एकत्र येऊन वाघाच्या संवर्धनासाठी बहुपक्षीय कार्यक्रम आखला. या घोषणेनंतर भारत, नेपाळ, भूतान, रशिया, मलेशिया, थायलंड अशा देशांनी स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध धोरणात्मक पावले उचलली. भारताने ‘प्रोजेक्ट टायगर’अंतर्गत 1973 पासूनच सुरू केलेली वाटचाल अधिक गतिमान केली. आज, 2025 मध्ये आपण त्या संकल्पाचे फळ पाहात आहोत. जागतिक अहवालानुसार आज आशियामध्ये सुमारे 5,574 वन्य वाघ आहेत, जे 2010 च्या तुलनेत सुमारे 74 टक्के अधिक आहेत.
भारतात सध्या 53 व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांच्या निवासासाठी संरक्षित क्षेत्रांचे जाळे विस्तारले आहे. यात मध्य प्रदेशातील कान्हा आणि पेंच, महाराष्ट्रातील ताडोबा, पश्चिम बंगालमधील सुंदरबन, उत्तराखंडमधील कॉर्बेट अशा विविध भौगोलिक आणि परिस्थितिकीय भागांचा समावेश आहे. यामुळेच आजघडीला भारतामध्ये सर्वाधिक म्हणजे 3,682 वाघ हयात स्थितीत आहेत.
‘प्रोजेक्ट टायगर’पासून सुरू झालेल्या आपल्या संरक्षण यशोगाथेत आता आधुनिक पद्धतींचा वापर, कॅमेरा ट्रॅप्स, बायो फेन्सिंग आणि स्थानिक समुदायांचा सहभाग हे नवे आयाम जोडले गेले आहेत. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड अशा अनेक राज्यांत संरक्षण क्षेत्रे वाढवण्यात आली आहेत. पण याचवेळी चिंतेची बाब म्हणजे झारखंड, ओडिशा आणि छत्तीसगडसारख्या राज्यांत चितळ, सांबर, रानगवा यांसारख्या वाघाचे खाद्य असणार्या प्राण्यांच्या प्रजातींची संख्या घटत चालली आहे. त्यामुळे वाघ मानवी वस्त्यांकडे वळू लागलेत आणि माणूस-वाघ संघर्षाचे प्रमाण वाढते आहे. भारतीय वन्यजीव संस्था (डब्ल्यूआयआय) आणि राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरण (एनटीसीए) यांनी संयुक्तपणे प्रसिद्ध केलेल्या एका नव्या अहवालात यासंदर्भात गंभीर इशारा देण्यात आला आहे.
वाघांचे खाद्य असणार्या या प्रजातींच्या संख्येत घट होण्यामागे जंगलतोड, पायाभूत सुविधा विकास, शेतीचा विस्तार, शिकारी आणि काही भागांतील नागरी अस्थिरता यांसारखी अनेक कारणे आहेत. जागतिक व्याघ्रसंख्येतील सुमारे 70 टक्के वाघ भारतात आहेत. त्यांच्या आहारात नीलगाय, जंगली डुक्कर, हॉग डिअर, बार्किंग डिअर आणि चिंकारा यांसारख्या इतर प्रजातीही असतात. फक्त वाघच नाही; तर बिबट्या, कोल्हा आणि लांडगा यांसारखे इतर शिकारी प्राणीही याच शिकार प्रजातींवर अवलंबून असतात. एक महत्त्वाची गोष्ट सर्वांनीच लक्ष घ्यायला हवी, ती म्हणजे वाघाचे अस्तित्व हे त्या जंगलाच्या आरोग्याचे निदर्शक मानले जाते. जिथे वाघ आहेत, तिथे चांगली शिकार प्रजाती, निरोगी जैवसाखळी, वने आणि जलप्रणाली आहेत, असे मानले जाते. त्यामुळे व्याघ्रसंवर्धन म्हणजे संपूर्ण परिसंस्थेचे रक्षण होय. तसेच वाघाच्या अस्तित्वाशी थेट संबंधित असणारे बिबट्या, लांडगा, कोल्हा यांसारखे अन्य शिकारी प्राणी याच परिसंस्थेतील घटक आहेत. त्यांचं संतुलन टिकवणं हीसुद्धा एक व्यापक पर्यावरणीय जबाबदारी आहे.