Nuclear Threat | पुन्हा अण्वस्त्रांच्या दहशतीच्या छायेत... 
संपादकीय

Nuclear Threat | पुन्हा अण्वस्त्रांच्या दहशतीच्या छायेत...

पुढारी वृत्तसेवा

अक्षय निर्मळे

अमेरिका आणि रशिया यांच्यातील न्यू स्टार्ट (न्यू स्ट्रॅटेजिक आर्म्स रिडक्शन ट्रीटी) हा महत्त्वाचा करार 5 फेब्रुवारी रोजी अधिकृतपणे कालबाह्य झाला. आता या दोन सर्वात मोठ्या अण्वस्त्र शक्तींवर अण्वस्त्र विकसन, माहितीची देवाणघेवाण आणि वापराबाबत कोणतेही कायदेशीर बंधन नसेल. ही जागतिक सुरक्षाव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा आहे.

हा करार प्राग येथे 8 एप्रिल 2010 रोजी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि दिमित्री मेदवेदेव यांनी केला. 10 वर्षांनंतर पाच वर्षांची मुदतवाढ त्याला दिली गेली. करारानुसार दोन्ही देश जास्तीत जास्त 1,550 अण्वस्त्रे तैनात ठेवू शकत होते, तसेच जास्तीत जास्त 700 तैनात क्षेपणास्त्रे व बॉम्बवर्षक विमाने ठेवू शकत होते. एकमेकांच्या अण्वस्त्र तळांवर प्रत्यक्ष तपासणी, अण्वस्त्रांबाबत नियमित माहितीच्या देवाणघेवाणीचे बंधन होते. करार संपल्याने ही पारदर्शकता संपली. आता दोन्ही देश दुसर्‍याच्या क्षमतेचा अंदाज गुप्तचर माहिती, संशयावरून घेत राहतील. अशी परिस्थिती नेहमीच संघर्षाला खतपाणी घालते.

युक्रेन युद्ध, नाटोचा विस्तार, आर्थिक निर्बंध, सीरिया आणि इतर जागतिक संघर्ष यावरून अमेरिका-रशियातील तणाव कमी-जास्त होत असतो. याशिवाय मध्यपूर्वेत इस्रायल-इराण-अमेरिका संघर्ष, तैवान-चीन तणाव इत्यादीमुळे जग आधीच अस्थिर आहे. या पार्श्वभूमीवर अण्वस्त्र नियंत्रणाचा शेवट म्हणजे अण्वस्त्र स्पर्धेला ‘फ्री हँड’ दिल्यासारखे आहे. यात आणखी एक नवा अँगल आहे तो चीनचा. आतापर्यंत अण्वस्त्र नियंत्रण हे प्रामुख्याने अमेरिका-रशिया यांच्यात मर्यादित होते; पण अलीकडच्या काळात चीनने वेगाने अण्वस्त्र साठा वाढवला आहे. महत्त्वाचे म्हणजे, चीन कोणत्याही करारात बांधिल नाही. त्यामुळे अण्वस्त्र स्पर्धा आता अमेरिका, रशिया, चीन अशी त्रिकोणी असेल. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, उत्तर कोरिया आणि राणसारख्या देशांचे अण्वस्त्र राजकारणही अप्रत्यक्षपणे परिणामकारक ठरू शकते.

या पार्श्वभूमीवर जागतिक समुदायाची भूमिका महत्त्वाची असणार आहे. संयुक्त राष्ट्रे, युरोपियन संघ आणि मध्यम शक्ती असलेले देश केवळ चर्चा, निवेदने देऊन थांबू शकत नाहीत. नव्या बहुपक्षीय अण्वस्त्र नियंत्रण चौकटीची गरज आहे, ज्यात अमेरिका, रशिया आणि चीन तिघांनाही सहभागी व्हावे लागेल. अन्यथा अण्वस्त्र न वापरण्याचा अलिखित नियम टिकेल, याची खात्री देता येणार नाही.

न्यू स्टार्टचा अंत म्हणजे युद्ध अपरिहार्य झाले, असा निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. अण्वस्त्र नियंत्रणाच्या चौकटीत जग काही प्रमाणात स्थैर्य अनुभवत होते. शीतयुद्ध काळातही अण्वस्त्र स्पर्धेला काही नियम, मर्यादा आणि पारदर्शकता होती; मात्र त्या चौकटीच कोसळत आहेत. नवीन युगात अण्वस्त्रे ही सामर्थ्याची प्रतीके झाली असतीलही; पण ती मानवी संस्कृतीच्या विनाशाची शक्यता बाळगणारे वास्तवदेखील आहे. एका चुकीच्या आकलनाने, एका तत्काळ प्रतिक्रियेतून किंवा एका तांत्रिक बिघाडाने इतिहास कायमचा बदलू शकतो. स्पर्धेच्या या वाटेवरून परत फिरून संवाद, विश्वास आणि सामूहिक जबाबदारीचा मार्ग स्वीकारणे हीच परिपक्वता असू शकते. अन्यथा अण्वस्त्रांच्या दहशतीची सावली नेहमीच पुढील पिढ्यांच्या भविष्यावर उमटत राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT