संपादकीय

जागतिक परिचारिका दिन : आरोग्यसेवेचे अखंड व्रत

अमृता चौगुले

आज जागतिक परिचारिका दिन. त्यानिमित्त…

आजचा काळ हा आरोग्यसेवेतील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. कारण, आरोग्य ही जगातील सर्वात महागडी संपत्ती आहे. आधुनिक परिचारिका सेवाचा पाया घालणार्‍या फ्लॉरेन्स नायटिंगेल यांचा जन्म 12 मे 1820 मध्ये फ्लॉरेन्स इटली येथे झाला. हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. फ्लॉरेन्स नायटिंगेल यांनी आपले सर्व जीवन रुग्णसेवेला व समाजसेवेला अर्पण केले होते. परिचारिकांना 'फोर्स ऑफ चेंज' म्हटले जाते. कारण, त्या बदल घडवून आणू शकतात. हे घोषवाक्य सर्व परिचारिकांना प्रेरणा देणारे, वैयक्तिक, सामूहिक उपक्रम राबवण्यासाठी उपयोगी पडणारे आहे. आरोग्य प्रणालीमध्ये लवचिकता आणून आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी त्या नेहमी मदत करत असतात. सततचे बदलणारे वातावरण, उंचावलेले राहणीमान, वाढती लोकसंख्या, असाध्य रोगांचे वाढते प्रमाण, नवीन रोगांची लागण इत्यादींमुळे जागतिक स्तरावर परिचारिकांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.

परिचर्येचा इतिहास पाहावयाचा झाल्यास मानवाच्या निर्मितीपासूनच परिचर्या सुरू झाली आहे. पूर्वी भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना अजिबात स्वातंत्र्य नव्हते. त्यांच्यावर अनेक बंधने होती. परिचर्या करणे हे नोकरांचे काम आहे, असे समजले जात होते. समाजातील चालीरिती, रुढी, परंपरा, जाती-जमाती, अंधश्रद्धा, अशिक्षितता इत्यादी कारणांमुळे भारतामध्ये परिचर्येला अतिशय कमी दर्जाचे स्थान होते. आज परिचर्येकडे पाहण्याचा लोकांचा द़ृष्टिकोन बदलला आहे. कोरोनाच्या संकटात लोकांचे प्राण वाचविण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून सदैव रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे, अशा प्रकारच्या सेवेंमुळे आज बर्‍याच महिला व पुरुष यांनी परिचर्या हा पेशा स्वीकारला आहे.

आपण एखाद्या रुग्णालयांमध्ये जातो, तेव्हा आपणास तेथे अनेक परिचारिका किंवा नर्सेस पाहावयास मिळतात. कोणत्याही रुग्णालयातील रुग्ण हा डॉक्टरांपेक्षा अधिक काळ परिचारिकेच्या देखरेखीखाली असतो. डॉक्टरांच्या आधी त्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना सामोरे जाऊन आधार व मानसिक धैर्य देण्याचे काम परिचारिका सदैव करत असतात. सध्या भारतामध्ये परिचारिकांना फार मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. रुग्णालयांमध्ये विविध घटक आरोग्य सेवा देत असले, तरी परिचारिकेला 24 तास रुग्णसेवेत हजर राहावे लागते. आरोग्य सेवेमध्ये सर्व घटक सदस्यांचे आपापसातील संबंध सहकार्याचे असतील, तरच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांपर्यंत आरोग्याच्या सेवा प्रभावीपणे पोहोचविता येतात व त्यांचा उपयोग देशाच्या आरोग्याच्या दर्जा सुधारण्यासाठी करता येतो.

आरोग्य यंत्रणेतील मोठा समूह व मजबूत कणा म्हणून परिचारिकांना ओळखले जाते. परिचारिका या डॉक्टर्स आणि रुग्ण यांच्यामधील एक महत्त्वाचा दुवा आहेत. या प्रशिक्षित समूहाने एकत्र येऊन शास्त्रोक्त पद्धतीने रुग्णसेवा दिल्यास उच्च प्रतीच्या आरोग्यसेवा निर्माण करण्यासाठी देशाची आरोग्य यंत्रणा सुधारण्यास मदत होईल. सांसर्गिक रोगांचा प्रसार रोखण्यासाठी, दुर्गम भागात आरोग्य सुविधा पोहोचवण्यात, आरोग्यसेवा वितरणात, नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्य पुरवण्यासाठी परिचारिका सदैव तत्पर असतात.

'नर्स' हा पेशा लोक सहजासहजी स्वीकारत नाहीत. रात्रपाळी करणे, स्वतः आजारी असताना, लहान मुलांना सांभाळून, काही नैसर्गिक संकटांना तोंड देऊन काम करताना परिचारिकांना तारेवरची कसरत करावी लागते. परिचारिकांना मानवी वर्तणूक समजून घेणे, प्रामाणिक व अथक परिश्रम, दुसर्‍याचे दुख: स्वतःचे समजण्याची भावना, सौजन्य, सेवाभाव, सहकार्याची भावना, ममत्व, सदैव तत्परता, जबाबदारी स्वीकारणे, निरीक्षण, सुसंवाद, संभाषण कौशल्य, स्वयंशिस्त इत्यादी आवश्यक गुण व कौशल्ये असावी लागतात. आपल्याला वाटते तेवढे परिचारिकांचे आयुष्य सहज व सोपे मुळीच नाही. कामाचा ताण, कौटुंबिक जबाबदारी यामुळे कित्येकदा परिचारिकांचे स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होते. कोरोनासारख्या महाभयंकर महामारीला नियंत्रणात आणण्यासाठी परिचारिकांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. परिचारिकांची ही मानवतेची सेवा नेहमीच आदरास पात्र ठरत आहे. आज जागतिक परिचारिका दिनानिमित्त जगभरात कार्यरत असणार्‍या व अखंड सेवेचे व्रत घेतलेल्या सर्व परिचारिकांना मनापासून सलाम!

– प्रसाद प्रभू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT