पाच जून रोजी पाळला जाणारा ‘जागतिक पर्यावरण दिन’ हा मानवाच्या बदलत्या जीवनशैलीमुळे होणार्या हानीबाबत आणि विकासासाठी होणार्या निसर्गाच्या शोषणाबाबत जगाला इशारा देत आहे, जागृत करत आहे. यंदाच्या पर्यावरण दिनाची थीम प्लास्टिकमुळे पर्यावरणाला होणार्या धोक्यांबाबत जागृती करणारी आहे. दरवर्षी जगभरात 40 कोटी टनांहून अधिक प्लास्टिक तयार होते. त्यातील केवळ 10 टक्के पुनर्वापरात येते. उर्वरित प्लास्टिक नदी, समुद्र, जंगल आणि मातीमध्ये मिसळत असून त्यामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टीचे, निसर्गाचे प्रचंड नुकसान होत आहे.
जागतिक पर्यावरण दिनाची सुरुवात 1972 मध्ये स्टॉकहोम (स्वीडन) येथे झालेल्या पर्यावरण परिषदेपासून झाली. तेव्हापासून दरवर्षी विविध देशांत व वेगळ्या विषयांवर आधारित हा दिन साजरा केला जात आहे. संयुक्त राष्ट्रांनी यंदाच्या पर्यावरण दिनासाठी निवडलेली थीम आहे, ‘बीट प्लास्टिक पोल्युशन!’ मानवाच्या दैनंदिन जीवनाला व्यापून टाकलेल्या प्लास्टिकने आज पर्यावरणापुढे मोठे आव्हान उभे केले आहे. पूर्वीच्या काळी प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा वापर केला जात नव्हता. त्या काळात कापडी, कागदी पिशव्या लोक वापरत होते, पण कालांतराने प्लास्टिकच्या पिशव्यांची उपलब्धता वाढली अण्णि हा एक सोपा पर्याय आहे हे दिसल्यानंतर त्याच्या वापरापेक्षाही जास्त गैरवापर वाढला. प्लास्टिकच्या कॅरी बॅगचा फार मोठा धोका पर्यावरणाला आहे.
आपण एक कागदी पिशवी वापरली तर हा कागद नैसगिर्र्क पद्धतीने नष्ट होण्यासाठी केवळ पाच आठवडे लागतात. त्याची कुजण्याची प्रक्रिया तत्काळ होते आणि त्यामुळे पर्यावरणाला त्यापासून हानी होत नाही. कापडी पिशव्यांचे कापड नष्ट होण्यासाठी पाच महिने लागतात. ते कापड जमिनीखाली गाडून ठेवले तर पाच महिन्यांनी ते पूर्णपणे कुजते. त्यामुळे पर्यावरणाला त्यापासून नुकसान होत नाही. प्लास्टिक पिशव्यांचे मात्र तसे नाही. सध्या ज्यापासून प्लास्टिकच्या कॅरी बॅग बनवल्या जातात. ते प्लास्टिक नैसर्गिकपणे नष्ट होण्यासाठी निसर्गाला 500 वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागतो. त्यामुळे ते नैसर्गिकपणे नष्टच होत नाही.
प्लास्टिकच्या अतिवापरापेक्षा गैरवापरामुळे निसर्गाचे मोठे नुकसान होत आहे. आज प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर ही गरज वा सोय कमी आणि स्टाईल अधिक बनली आहे. साध्या औषधाच्या गोळ्या घेतल्या तरीसुद्धा लोक दुकानदाराकडे कॅरी बॅग मागतात आणि ती दिली नाही तर जोरजोरात भांडतात देखील. शेवटी दुकानदारही गिर्हाईक टिकवायचे असते म्हणून ते कॅरी बॅग देतात. बरेचदा या कॅरीबॅग इतक्या पातळ असतात की, घरी जाईपर्यंत त्या फाटतात आणि दुसर्या दिवशी त्या कचर्यासोबत उकिरड्यावर जातात. याचा दुष्परिणाम किती मोठ्या प्रमाणावर होतो याचा विचार ना दुकानदार करतात ना ग्राहक !
सध्याच्या परिस्थितीत आपल्याकडे कचर्यामध्ये सर्वात मोठी समस्या आहे ती प्लास्टिकच्या पिशव्यांचीच. या पिशव्यांचा कचरा नष्ट होत नाही, त्यामुळे तो सर्वत्र पसरलेला दिसतो. त्यामुळे इतर अनेकसमस्या निर्माण होताना दिसत आहेत. गटारे साफ करत असताना त्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्या आणि प्लास्टिकच्या बाटल्याच सापडतात. पावसाळ्यात ही सर्व गटारे तुंबली जातात. थोडासा जरी पाऊस पडला तरी त्यामुळे रस्त्यावर पाणी येणे, वाहतुकीला अडथळा निर्माण होणे, सोसायट्यामध्ये पाणी जाणे हा प्रकार सर्वत्र दिसू लागला आहे. या परिस्थितीला प्लास्टिक आणि त्याचा वारेमाप वापर व टाकाऊ वृत्तीच कारणीभूत आहे. ही समस्या शहरांपुरतीच मर्यादित राहिलेली नाही. आज खेड्यातही प्लास्टिक कचर्यामुळे ओढे, नाले, गटारी तुंबलेली आढळतात.
आज मुंबईसारख्या ठिकाणी किंवा समुद्र किनारी असणार्या गावांमध्ये-शहरांमध्ये समुद्राच्या पाण्याचा तळ प्लास्टिकने झाकलेला आहे, इतका प्लास्टिकचा वापर वाढलेला आहे. ही एका भीषण धोक्याला जन्म घालणारी गोष्ट आहे. याचा जीवसृष्टीवर-जलसृष्टीवर अतिशय प्रतिकूल परिणाम होतो. समुद्राच्या, नद्यांमध्ये राहणारे जलचर पाण्यात टाकलेले प्लास्टिक खाऊन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. हेे मृत प्राणी कापल्यानंतर त्यांच्या पोटात प्लास्टिक आढळल्याचे दिसून आले आहे. आपल्याकडे नदीत किंवा समुद्रात निर्माल्य टाकताना तेही प्लास्टिकच्या पिशवीसकट टाकले जाते. घरातील कचराही प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये बांधून कचरा कुंडीत टाकला जातो. हा कचरा जी जनावरे खातात, त्यांच्या पोटात प्लास्टिक जाते. कोल्हापुरात अशा मोकळ्या गाई किंवा म्हशींच्या पोटातून तीस-चाळीस किलो प्लास्टिकचे कागद काढण्यात आले आहेत. म्हणजे आपल्या गैरवापरामुळे दुसर्याचा जीव जातो आहे याचा विचार माणसाने केला पाहिजे.
आज मानवी जीवनाच्या सर्व गरजांमध्ये प्लास्टिकचा वापर केला जात आहे. पेनामधील रिफिलचे उदाहरण घेतले तर पूर्वी आठ आण्याला सुटी रिफिल मिळत होती. आता ती प्लास्टिकच्या वेस्टनात मिळते. त्यामुळे तिचा आकर्षकपणा वाढला, किंमत वाढली पण पर्यावरणाचे नुकसानही वाढले. कारण रिफिल काढून घेऊन ते प्लास्टिक आवरण टाकून दिले जाते. आपण जे रेडिमेड कपडे विकत घेतो ते प्लास्टिकच्या पिशवीतच असतात. त्यामध्ये कॉलरजवळ, हातोप्यांवर प्लास्टिक लावलेले असते. अशा प्लास्टिकचे काय करायचे हा प्रश्न असतो. वस्तू आकर्षक दिसावी या विक्रीकौशल्याच्या गरजेतून हे सर्व झाले आहे, पण याची खूप मोठी किंमत पर्यावरणाच्या हानीमुळे मोजावी लागत आहे.
निसर्ग अभ्यासक म्हणून मी आणखी एका गोष्टीचे निरीक्षण केले आहे. आजूबाजूला वावरणारे पक्षीही आज घरटे बांधताना प्लास्टिक वापरत असल्याचे दिसले आहे. या घरट्यांमध्येही मला प्लास्टिकचे कागद दिसले. म्हणजे नैसर्गिक पक्षी, प्राणीसुद्धा या वापराला तयार झाले की काय, असा प्रश्न निर्माण होतो, पण यामागचे खरे कारण असे आहे की, या पक्ष्यांना ज्या गोष्टी घरटे बांधण्यासाठी आवश्यक आहे, तेच जर उपलब्ध होत नसेल आणि जिथे तिथे प्लास्टिकच दिसत असेल तर त्या पक्ष्यांचाही नाईलाज आहे. बुलबुल, चिमण्या यांच्या घरट्यात प्लास्टिक दिसू लागणे, इथपर्यंत प्लास्टिकचे आक्रमण वाढले असेल तर ते नक्कीच भनायक आहे. प्लास्टिकचा एवढा अट्टाहास कशासाठी याचे उत्तर आपल्याकडे बोकाळत चाललेल्या ‘यूज अॅण्ड थ—ो’ कल्चरमध्ये आहे. जागतिकीकरणानंतर आलेल्या नवअर्थकारणामध्ये आणि बाजारधिष्ठित अर्थव्यवस्थेमध्ये ‘वापरा आणि टाका’ ही संस्कृती वेगाने पसरत गेली.