World Book Day | पुस्तक विकत घेणे, हाच खरा संदेश 
संपादकीय

World Book Day | पुस्तक विकत घेणे, हाच खरा संदेश

पुढारी वृत्तसेवा

श्रीराम ग. पचिंद्रे

पुस्तक हे माणसाकडून तयार होते आणि माणसालाच घडवते. पुस्तक क्रांती घडवते आणि विझवतेदेखील. पुस्तकाचे सामर्थ्य मोठे असते. पुस्तक माणसाच्या मेंदूला आकार देते. विचारांना दिशा देते आणि ज्या कृतीला विचारांची जोड असते, ते विचार पुस्तकातून अधिक सक्षमपणे बाहेर येतात. आज जागतिक पुस्तक दिन आहे. त्या औचित्यानं लिहिलेला लेख...

तैलाद रक्षेत जलाद रक्षेत रक्षेत शिथिल बन्धनात।

मूर्ख हस्ते न दातव्यं एवं वदति पुस्तकं॥

‘तेलापासून माझं रक्षण कर, पाण्यापासूनही कर. माझी पानं विस्कटून जाऊ नयेत म्हणून शिथिल बांधणीपासून माझं रक्षण कर आणि मूर्ख माणसाच्या हातात मला जाऊ देऊ नको,’ असं पुस्तकच माणसाची विनवणी करतं, असं एक सुभाषित आहे.

मूर्ख माणूस पुस्तक नीट हाताळत नाही, वाचत नाही, जवळ असूनही वर्षानुवर्षे त्याला हातही लावत नाही. दुसर्‍या प्रकारचा मूर्ख माणूस वाचन न करता, ‘रोबोट’ चित्रपटातील चिट्टीसारखा पाने वरवर चाळून सखोल वाचनाचा आभास निर्माण करतो. हे दोन्ही प्रकारचे लोक पुस्तकाचा अपमान करीत असतात. पुस्तकं ही माणसाला त्याचंच जग नव्या रूपात दाखवतात आणि माहिती नसलेल्या नव्या जगात घेऊन जातात. पुस्तकं नवी द़ृष्टी देतात आणि अनुभवलेल्या क्षणांकडे नव्या द़ृष्टीनं पाहायला शिकवतात. क्रांती घडवण्याची, क्रांती विझवून टाकण्याचीही क्षमता पुस्तकात असते.

इसवी सनाच्या आधी पुस्तकांचा शोध लागला. आधी धूळपाटी, मग दगडी पाटी, मग झाडाची पाने, मग झाडाची साले, प्राण्यांची कातडी, मग भूर्जपत्र असं करत करत कागदाचा जन्म झाला. तोवर सुट्या कागदावर पुस्तकं तयार होत होती. नंतर कागदावर लिहिलेली पक्क्या बांधणीची पुस्तकं तयार होऊ लागली. नंतर दगडावर अक्षरं कोरून ती कागदावर उमटवली जायला लागली. त्याला ‘शिळा प्रेस’ असं म्हटलं जायला लागलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अष्टप्रधान मंडळाची नावं शिळा प्रेसवर छापली होती. त्या अर्थानं शिवाजी महाराजांना भारतीय मुद्रणाचे जनक मानता येईल. पुढे यंत्रयुगात छपाईला गती आली आणि पुस्तक निर्मितीला वेग आला. जगातल्या बहुतेक सर्व भाषांमध्ये हजारो पुस्तकं तयार होऊ लागली. ही पुस्तकं वाचणारा वर्ग तयार झाला. मग, त्यातून ग्रंथालयाची निर्मिती झाली. वाचकांच्या ज्ञानाची आणि मनाची भूक भागविण्यासाठी ग्रंथालये उपयुक्त ठरायला लागली. पुस्तकातून ज्ञान आणि विज्ञान, कला आणि साहित्य यांची निर्मिती व्हायला लागली. तत्त्वज्ञानाचे ग्रंथ निर्माण होऊ लागले आणि माणसाने निर्माण केलेल्या तत्त्वज्ञानातून अनेक तत्त्वज्ञ निर्माण होऊ लागले.

माणूसच पुस्तक लिहितो; पण माणसानं लिहिलेलं पुस्तक माणसालाच घडवते, ही खरी गोष्ट आहे. ज्या राष्ट्रात मोठी आणि संख्येने जास्त ग्रंथालये आहेत आणि वाचक जास्त आहेत, ते राष्ट्र खर्‍याअर्थानं समृद्ध आणि शांतिप्रिय मानलं गेलं पाहिजे. सम—ाट अलेक्झांडरनं भारतावर स्वारी केली, तेव्हा इथली तक्षशिला, विक्रमशिला, नालंदा ही संपन्न विद्यापीठं त्यानं पाहिली. तिथली प्रचंड ग्रंथसंपदा पाहून तो प्रभावित झाला आणि अ‍ॅरिस्टॉटलचा शिष्य असलेल्या अलेक्झांडरने आपल्या देशात जगातील सर्वात मोठं ग्रंथालय उभं करायचं ठरवलं. त्यानं त्यासाठी जगभरातून अनेक दुर्मीळ ग्रंथ गोळा केले होते. त्यासाठी त्यानं विपुल पैसा ओतला होता. त्याचं हे स्वप्न त्याच्या अवघ्या 32 व्या वर्षी झालेल्या मृत्यूनंतर सेनापती टॉलेमी यानं पूर्ण केलं. वाचन संस्कृती टिकली पाहिजे, वाढली पाहिजे अशी नेहमी चर्चा होते. माझ्या परिचयाच्या एका तरुण पत्रकारानं आपल्या तीन वर्षांच्या मुलीवर पुस्तक वाचनाचे संस्कार व्हावेत म्हणून घरीच एक वाचनालय सुरू केलेलं आहे. कोवळ्या वयातील मुलं वेगळं काही करत नाहीत, तर केवळ अनुकरण करतात. आई-वडील पुस्तकं वाचत असतील, तर मुलंही त्यांचं अनुकरण करून वाचन करायला लागतील. म्हणून पालकांनी स्वत:च पुस्तकांचं वाचन केलं पाहिजे. आजच्या जागतिक पुस्तक दिन खर्‍याअर्थानं साजरा करण्यासाठी सर्वांनी एक तरी पुस्तक विकत घ्यावं आणि ते वाचावं, एवढंच सांगावं, असं वाटतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT