ताई, तूच तारणहार! (Pudhari File Photo)
संपादकीय

Indian Women Voters | ताई, तूच तारणहार!

कित्येक वर्षांपासून भारतीय महिला नवरा सांगेल त्याला मतदान करून घरी परत येत असत.

पुढारी वृत्तसेवा

कित्येक वर्षांपासून भारतीय महिला नवरा सांगेल त्याला मतदान करून घरी परत येत असत. काळ बदलला तसे महिलांना स्वातंत्र्य मिळत गेले आणि आता तर कोण निवडून येणार हे महिलाच ठरवत आहेत. आपल्या राज्यामध्ये लाडक्या बहिणींनी प्रचंड बहुमताने सध्याचे सरकार निवडून दिले आहे. बिहारमध्ये पण याच लाडक्या बहिणींनी नितीश कुमार यांच्या सत्तेवर शिक्कामोर्तब केले आहे. एकंदरीत काय आहे की, घरातील महिलेला भावनिक साद घातली किंवा तिला काही मिळवून दिले की, ती बंधूंना म्हणजेच आपल्या भावांना भरभरून मतदान करत असते हेही दिसून आले.

बिहार निवडणुकांचे बर्‍यापैकी परिणाम आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर दिसायला सुरुवात झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एक नगराध्यक्षपदाचे उमेदवार यांनी आपण निवडून आलो तर प्रत्येक कुटुंबाला दहा हजार रुपये देणार, अशी घोषणा केली आहे. हे महोदय हे दहा हजार रुपये स्वतःच्या खिशातून न देता नगरपरिषदेच्या निधीमधून देणार आहेत, असेही त्यांनी जाहीर केले आहे. एकंदरीत महिला वर्गाला खूश केले की निवडणूक जिंकता येते, असे काहीसे समीकरण रूढ होऊ पाहात आहे.

नगराध्यक्षपदाच्या एका उमेदवाराने प्रत्येक कुटुंबाला एक वन बीएचके फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले आहे. हे पण आपण नगरपरिषदेच्या फंडातूनच देणार आहोत, असेही त्यांनी जाहीर केले आहे. ज्या संस्थेची उमेदवारी आपण दाखल केली आहे त्या संस्थेची तिजोरी आधीच रिकामी करण्याचा हा बेत कितपत यशस्वी होतो हे माहीत नाही; परंतु काही सामान्य भोळे लोक अशा उमेदवारांना मतदान करण्याची शक्यता आहे. आता एखाद्या कल्पक उमेदवाराने फक्त मी नगरपरिषदेला निवडून आलो तर प्रत्येक भगिनीला येवला पैठणी आणि सोबत मॅचिंग ब्लाऊज पीस देण्याचे आश्वासन देणे बाकी आहे. शिवाय झालेच तर मॅचिंग टिकल्या, मॅचिंग कानातले, मॅचिंग पायातले... अशा घोषणा पण होण्याची शक्यता दिसत आहे.

थोडक्यात सांगायचे म्हणजे आता बहिणींची चलती आहे, म्हणजेच महिलांची चलती आहे. त्यांनी मागायचा अवकाश की, उमेदवार तयार आहेत. फक्त मतदान करा आणि निवडून द्या, पुढचे आमचे आम्ही पाहून घेतो, असा उमेदवारांचा प्रयत्न आहे. ही सर्व भरमसाट पोकळ आश्वासने असून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आत्तापर्यंतचे सर्व प्रकार फिके पडतील असे नवीन गणित पुढे येण्याची शक्यता आहे. एकंदरीत तुमच्या-आमच्यासारख्या सामान्य लोकांना मनोरंजनाची काही कमी भासणार नाही, हे मात्र निश्चित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT