संयुक्त राष्ट्रसंघाने 1975 ते 1985 हे आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘महिला दशक’, तर 1975 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले होते. स्त्रीला समाजात काय स्थान, स्त्रियांची सामाजिक स्थिती नेमकी कशी व त्यांचे प्रश्न कोणते, याचा शोध घ्यावा आणि जगातील सर्व देशांनी स्त्रियांचा दर्जा उंचावण्यासाठी विकास कार्यक्रम हाती घ्यावेत, असे आवाहन संयुक्त राष्ट्रसंघाने केले होते. या गोष्टीस इतकी वर्षे उलटल्यावरही आज जगातील महिलांची स्थिती दारुणच आहे, असे म्हणावे लागेल. 2024 मध्ये जगात दर दहा मिनिटाला एका महिलेची तिच्या जवळच्या व्यक्तीकडून हत्या झाली. वर्षभरात सुमारे 50 हजार महिला आणि मुलींना जीव गमवावा लागला, हे भीषण वास्तव संयुक्त राष्ट्राच्या ताज्या अहवालातून समोर आले. स्त्री हिंसाचार प्रश्नाविरोधातील लढ्यात कोणतीही प्रगती झाली नसल्याबद्दल त्यात खंतही व्यक्त केली आहे. 117 देशांमधील संकलित माहितीनुसार दररोज 137 महिलांना मारले जात आहे. 2019च्या तुलनेत ही एकूण संख्या किंचित घटलेली दिसत असली, तरी ती कमी नाही.
महिला आणि मुलांसाठी स्वतःचे घरच सर्वात धोकादायक ठिकाण राहिले आहे, हे त्यातील निरीक्षण गंभीर आणि प्रत्येकाला अंतर्मुख व्हायला लावणारे आहे. जगातील सर्वच देशांमध्ये महिलांच्या हत्या होत आहेत; परंतु आफ्रिकेतला आकडा सर्वात जास्त, म्हणजे 22 हजार इतका आहे. आफ्रिकेतील अनेक देश मागास असल्यामुळे तेथे जास्त हत्या होत असल्याचे मानले, तरी प्रगत देशांतही हे प्रमाण कमी नाही. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फिजी, न्यूझीलंड येथील दर एक लाख स्त्रियांमागे 1.4 इतके फेमिसाईड म्हणजे स्त्रीहत्येचे प्रमाण आहे. उलट आशिया आणि युरोपात अनुक्रमे 0.7 आणि 0.5 इतके ते आहे. एकीकडे स्त्री-पुरुष समानता वाढत आहे.
स्त्रिया उंबरठ्याबाहेर पडून वेगवेगळ्या स्वरूपाची कामे समर्थपणे करत आहेत. लष्कर, पोलीस, अंतराळ मोहिमा, विज्ञान-तंत्रज्ञान, उद्योगधंदे अशा सर्व क्षेत्रांमध्ये त्या कर्तबगारी गाजवत आहेत. मुळुमुळू रडणारी स्त्री हा आता भूतकाळ झाला आहे, तरीदेखील अजून सामाजिक विकासाचा किती मोठा पल्ला गाठायचा आहे, हे त्यातून स्पष्ट होते. सर्वच स्तरांमधील स्त्रियांना कौटुंबिक हिंसेला तोंड द्यावे लागत आहे. स्त्री हत्या ही अचानक होणारी घटना नाही. हत्येपूर्वी तिला अनेकदा धमक्या व छळाला सामोरे जावे लागते. कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण मोठे आहेच, आता ‘फोटो शेअरिंग’, ‘डॉक्सिंग’ आणि ‘डीपफेक व्हिडीओ’ या नवीन प्रकारांतूनही मानसिक छळाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. समाजमाध्यमांची ही दुसरी धोकादायक बाजू महिलांच्या छळाची आहे. हे वाढते अत्याचार थांबवण्यासाठी जगभरात कायद्यांची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे आणि गुन्हेगारांनी जीव घेण्यापूर्वीच त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी, असे रास्त आवाहन संयुक्त राष्ट्राच्या महिला धोरण विभागाच्या संचालक सारा हेंड्रिक्स यांनी केले आहे.
स्मार्ट फोन्समुळे पोर्नोग्राफिक कंटेट एका क्लिकवर मुबलक उपलब्ध झाला. सतत पॉर्न बघण्याने त्याचे व्यसन लागते. मेंदूतील ‘न्यूरोप्लास्टिक’ बदलांचा हे व्यसन जडण्यात मोठा वाटा असतो. मेंदूच्या कार्यप्रणालीत बदल झाल्याने त्याचे प्रतिबिंब लवकरच व्यक्तीच्या वर्तनात डोकावू लागते. पॉर्नमध्ये स्त्रियांचे चित्र उपभोग्य वस्तू असेच केलेले असते. तिच्याविरुद्द कितीही हिंसक वर्तन केले, तरी पडद्यावरची स्त्री आनंदीच भासते. थोडक्यात, स्त्रियांना बळजबरी व पिडा आवडते असे या पुरुषांच्या मनावर ठसते, अशी मीमांसा मनोविकारतज्ज्ञांनी केली आहे. दुसरीकडे, ओळखीच्या वा घरातीलच व्यक्तीकडून मुली व स्त्रियांवर अत्याचार होण्याच्या घटना वाढतच आहेत. त्या उघडकीस येऊ नयेत म्हणून पीडितांची हत्या केली जाते.
मुळातच स्त्रीला वस्तू समजण्याची प्रवृत्ती समाजात असल्याने स्त्रीकडे स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहिलेच जात नाही. अनेकदा मद्याचे अतिसेवन करून पत्नीला वा मुलींना ठार मारण्याच्या घटनाही घडल्या आहेत. खेळाडू, कलावंत, राजकारणी, मॉडेल्स अशा सर्व क्षेत्रांतील स्त्रिया हिंसेचे लक्ष्य बनत आहेत. कार्यालयीन ठिकाणी स्त्रियांना लैंगिक छळापासून सुरक्षित ठेवण्यासाठी नियम व मार्गदर्शक तत्त्वे ठरवली आहेत. असभ्य चेष्टा, अश्लील चित्रे वा फोटो दाखवणे यांचा यात समावेश होतो. भारतात या कायद्यांतर्गत प्रत्येक संस्थेने, जिथे दहापेक्षा जास्त कर्मचारी असतात, तेथे अंतर्गत समिती स्थापन करणे गरजेचे असते, तरीदेखील या कायद्याची अंमलबजावणी धडपणे केली जात नाही. शाळा, महाविद्यालये, क्रीडांगणे, उद्याने अशा कोणत्याही ठिकाणी स्त्रियांवर अत्याचाराच्या घटना घडतात. खोट्या प्रतिष्ठेच्या मुद्द्यावरून आई, वडील वा भावाने मुलीला मारहाण करणे वा तिचा खून करणे, अशा घटना घडतात. लहान मुलींना ‘गुड टच’ व ‘बॅड टच’ची माहिती दिली जाते; पण विकृत नजरा चिमुकल्यांवर अत्याचार करून त्यांचे बळी घेतच असतात.
लहान, तरुण मुलींवर घरातल्याच जवळच्यांकडून अत्याचार केले जातात. ‘स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी’ असे म्हणून केवळ सुस्कारे सोडण्याचे दिवस गेले. प्रत्येक शाळा, महाविद्यालयात मुलींना स्वसंरक्षणाचे धडे बंधनकारक केले पाहिजेत. समाजमाध्यमांमध्ये अडकलेल्या तरुण पिढीवर चांगले संस्कार व्हायला हवेत. मुलींना लहानपणापासून खेळांसाठी प्रोत्साहित करून त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारले पाहिजे. जगभरातील पुरुषांना स्त्रियांबाबत अधिक संवेदनशील बनवण्याकिरता समाजमाध्यमांचाच प्रभावी वापर व्हायला हवा. कोणतीही हिंसा ही अत्यंत तिरस्करणीय व माणुसकीला काळिमा आणणारी बाब आहे, हा संदेश जगात सर्वत्र झिरपण्याची गरज आहे. लहानपणापासूनच मुलगा-मुलगी दोघेही समान हे सातत्याने बिंबवले पाहिजे. जो न्याय मुलाला तोच मुलीला, अशी भूमिका पालक, शिक्षक, समाज आणि सरकारने घेतली पाहिजे. ‘ती’ पुरुषांइतकीच समान आहे आणि पुरुषांहून अजिबात कमी नाही, हा विचार जेव्हा बिंबेल तेव्हाच अशा हिंसाचाराला आळा बसू शकेल. महिला सबलीकरण कागदावरच राहिले आहे, हे या स्थितीत नाकारणार तरी कसे?