महिला आयोग आणि भिशी...! 
संपादकीय

महिला आयोग आणि भिशी...!

पुढारी वृत्तसेवा

सई : छाया, अगं कसं होणार आपलं?आयोगातून योग निघून चालला आहे बायकांचा. बायका तिथे पण जाऊन लिंबू-टाचण्या असली भोंदूगिरी करत राहिल्या तर आयोगाचं काय?

छाया : तुला बरी आयोगाची काळजी. तू जाणार आहेस का त्या टाकणकर बाईंच्या जागी.

सई : कळत नाही, पण वळायला काही हरकत नाही राजकारणाकडे.

छाया : वळा. पण भलतीकडे नको. तिथे नुसताच राडा चालू आहे.

सई : असूदे. राडा निस्तरता येत नाही तर राजकारणी कसले.

छाया : तू नको राडा घालू हा आता. भिशी आहे आपली. काय या बायका वेळेवर पण येत नाहीत.

सई : पुढच्या भिशीचे मी नियोजन लावते. मग बघ कशी राजकारणात पण झेप घेते.

छाया : भोंदू बाबा प्रकरण जी महिला चांगल्या प्रकारे उघडकीला आणेल तिचाच आयोग. कळलं? तू पुरावे शोध. आयोगात एन्ट्री पक्की!

सई : हो शोधते माझ्यावर डाव आल्यावर.

छाया : आवर बाई पटपट.

सई : आज पाणीपुरी कोण आणणार होतं? जुई ना. घ्या. तिचाच पत्ता नाही.

छाया : अगं बाई तू मोबाईल लाव.

सई : हां बाई, लावते. आमचं आघाडी सरकार. काय करणार?

छाया : थांब बहुतेक जुई फोन करत असेल.

सई : मी आणून देते.

छाया : मी बघते थांब. नाहीतरी मला किचन मध्ये प्लेटस्, चमचे आणायला जायचंच आहे.

सई : बरं. एकूण आघाडी सरकारचा मदतीचा हात फेटाळला तुम्ही.

छाया : तू बिघडू सरकार आहेस. भिशीतल्या सगळ्यांना कॉल करून घे आधी. अगं बाई! (आश्चर्याने) ह्या बघ आल्या सगळ्या (दाराकडे जात) या या. आज भिशी आमच्या घरी आहे.

जुई : ये. हे घे बाई आधी पाणीपुरीचा डब्बा. बायांनो आधी गिळूया. मग भिशीकडे वळू.

छाया : आपण पंधराजणी आहोत. पुरेल ना?

जुई : म्हणजे काय? बसा

सई : बसा गं. मी प्लेटस्मध्ये देते.

वंदा : अगं नको नावानं बोलवू. माहिती आहे आपण एकमेकींना. भाषण दिल्यासारखी काय बोलते नेहमी. हे अयोग्य आहे दरवेळची औपचारिकता.

छाया : अगं अयोग्य काय? तिला आपण एकत्र जमलो की सुचतं सगळं. तिला भिशी नाही तर महिला आयोगाचं खातं हातात असल्यासारखं वाटतं भिशीचे कागद फेकताना. हो ना? ये पण भिशी कोणाला लागणार हे महिला आयोग सारखं हमी देऊन नाही हं सांगता येणार. लागेल तिला लागेल.

सगळ्याजणी : हो लागेल तिला लागेल... उधळा गं चिठ्ठ्या...!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT