कुठे पडणारा अतिरिक्त पाऊस, कुठे पावसाने दिलेली ओढ, राज्यात काही ठिकाणी झालेल्या पेरण्या वाया जाण्याची निर्माण झालेली भीती, हे प्रश्न तुमच्या-आमच्यासारख्या सामान्य लोकांना महत्त्वाचे असतील, यात शंका नाही. सोशल मीडियामध्ये नेहमीच अनेक विषयांवर चर्चा रंगते, हे तर सर्वांनाच ठाऊक आहे. यापेक्षा अमुक एक तमुक एकासोबतच जाईल काय, याची विशेषतः सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
सध्या राज्यामध्ये नियमित चर्चिले जाणारे दोन विषय आहेत. पहिला विषय म्हणजे, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का आणि दुसरा विषय म्हणजे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? या विषयांवर त्या -त्या पक्षांचे नेते प्रतिक्रिया देत नाहीत, इतकी चर्चा माध्यमांमध्ये होत आहे. याचे कारण, माध्यम हा मोठा स्रोत असतो. त्याला नेहमी नवनवीन बातम्या लागत असतात. बातम्या पण अशा असल्या पाहिजेत की, ज्यामुळे त्या चॅनेलचा टीआरपी वाढत जातो. आता उदाहरण घेऊयात, दोन ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचे. हे दोघे भाऊ या विषयावर फारसे काही बोलले नाहीत. त्यांचे प्रवक्तेही फारसे काही बोलले नाहीत; परंतु माध्यमांनी ही बातमी उचलून धरली आणि गेले पंधरा दिवस तेच ते चर्वितचर्वण सुरू आहे. एखादा मुद्दा उभा राहिला की, त्यावर प्रतिक्रिया देणारे असंख्य लोक आपल्या राज्यात आहेत.
या लोकांशिवाय राजकीय तज्ज्ञ नावाची एक नवीन जमात उदयाला आली आहे. अशावेळी त्यांना चॅनेल्सवर बोलावून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, तर जनतेची काय प्रतिक्रिया असेल, असा प्रश्न विचारला जातो. राजकीय तज्ज्ञ या बंधूंच्या एकत्र येण्यामुळे राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होतील, याविषयी सविस्तर आपले मत मांडत असतात. आमचे म्हणणे असे आहे की, दोन्ही बंधू एकत्र येतील तेव्हा येतील; पण तुम्ही आतापासून कशाला चर्चा करताय?
या प्रश्नावर थोडेसे वातावरण थंड होत आहे असे वाटले की, कोण काय सूचक बोलले, याची पण बातमी केली जाते. मग, एकत्र येणार का? टाळी देणार का? पहिल्यांदा टाळी कोण कोणाला देणार? पहिल्याने टाळीसाठी हात उंचावला, तर दुसरा टाळी घेण्यासाठी हात पुढे करणार का? या सगळ्या गोष्टींची चर्चा होत राहते. काका आणि पुतणे यांच्यामध्ये मतभेद होऊन राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले. दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांच्या विरुद्ध लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढले. निवडणुकांचा धुरळा संपल्याबरोबर माध्यमांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, अशी हूल उठवून दिली. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायचे असतील, तर येतीलच ना? समजा ते एकत्र आले, तर ते सर्वांना सांगतीलच की नाही? त्याच्या आधी का ढोल बडवत आहात? हे आपल्यासारख्या सामान्य लोकांना समजत नाही. राजकारणात काही शाश्वत नसते. निवडणुका लागल्या की, आपले राजकीय गणित लक्षात घेऊन राजकीय नेते एकत्र येत असतात. अशातच हिंदी भाषेच्या सक्तीवरून महाराष्ट्र राज्यात चांगलेच वादंग माजले आहे. त्याला विरोध म्हणून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची आणि एकाच वेळी दोघांनीही मोर्चा काढावा, असा आग्रह दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आणि प्रवक्ते करताना दिसत आहेत.