प्रा. डॉ. मोहन वाडेकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्याचे अभ्यासक, गुरुकुंज
भौतिक प्रगतीच्या दिशेने झेपावणाऱ्या भारतात जातीय विद्वेष, सामाजिक विषमता आणि नैतिक मूल्यांचा ऱ्हास ही गंभीर आव्हाने बनली आहेत. अशा परिस्थितीत मानवता, समता, ग्रामविकास आणि सेवाभावाचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची आज देशाला नितांत गरज आहे. त्यांच्या विचारांचा प्रसार आणि ‘भारतरत्न’ सन्मानाची मागणी ही केवळ एका संताचा गौरव नव्हे, तर मानवतेच्या मूल्यांचा सन्मान ठरेल.
आज भारत महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. विविधतेने नटलेला आणि जगातील सर्वात तरुण देश म्हणून आपली गणना होते. परंतु आजची देशातील अराजकता बघता ज्या तरुणाईच्या भरवशावर आपण ‘विश्वगुरू’ होण्याचे स्वप्न पाहात आहोत त्यांची होत असलेली अवहेलना बघून तरुण भारताच्या भविष्याची चिंता वाटते. विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि अर्थव्यवस्थेत आपण मोठी प्रगती करत आहोत. परंतु दुसरीकडे जातिभेद, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, सामाजिक विषमता, नैतिक मूल्यांचा ऱ्हास आणि ग्रामीण समस्यांसारखी आव्हाने आजही आपल्या समोर उभी आहेत. प्रश्न असा आहे की, केवळ भौतिक प्रगती म्हणजेच खरा विकास आहे का? की माणसाच्या विचारात, आचरणात आणि समाजाप्रति असलेल्या कर्तव्य भावनेतही परिवर्तन घडणे आवश्यक आहे.
जाती-जातीत, धर्मा-धर्मांत तेढ निर्माण केली जात असताना समाजाला मानवतेचा, समतेचा, श्रमाचा, सेवेचा आणि भक्तीचा मार्ग दाखवणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचे महत्त्व प्रकर्षाने जाणवते. आपल्या वाणीने जनजागृती करणाऱ्या आणि ‘ग्रामगीता’ या महानग्रंथातून ग्रामविकासाचा मंत्र देणाऱ्या महान संतांनी राष्ट्रनिर्मितीचा पाया सामान्य माणसाच्या जागृतीत असल्याचे अधोरेखित केले. म्हणूनच आजच्या भारताला केवळ विकासाच्या योजना नव्हे, तर विकासाला योग्य दिशा देणारे विचारही आवश्यक आहेत.
परमेश्वराकडे माणूस मागण्याची वेळ राष्ट्रसंतांवर का आली?
‘माणूस द्या, मज माणूस द्या’ या मानवतावादी भावनेतून व्यक्त होणारा विचार आजच्या सामाजिक परिस्थितीत अधिक महत्त्वाचा ठरतो. ‘माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे’, ही अपेक्षा साधी असली तरी तिचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. समाजमाध्यमांच्या माध्यमातून अफवा, द्वेषपूर्ण संदेश आणि धार्मिक तेढ पसरविण्याचे प्रकार घडत असताना विवेक, संवेदनशीलता आणि सत्याची कास धरणे आवश्यक झाले आहे. विचारभिन्नता असू शकते; मात्र ती शत्रुत्वाचे कारण बनू नये, हीच राष्ट्रसंतांच्या विचारांची शिकवण आहे. तथापि, राजकीय स्वार्थासाठी समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न होत असल्याचे अनेकदा दिसते. जातीय आणि धार्मिक अस्मितांना खतपाणी घालून सामान्य माणसांच्या भावनांचा वापर केला जातो. अशावेळी राष्ट्रसंतांचे विचार समाजाला आत्मपरीक्षण करण्याची प्रेरणा देतात. धर्म कोणताही असो, माणसाचे दुःख सारखेच असते. भूक, गरिबी, बेरोजगारी, अशिक्षितपणा आणि अन्याय यांना जात-धर्माच्या सीमा नसतात. त्यामुळे या समस्यांविरुद्ध एकजुटीने लढणे, हाच खरा राष्ट्रधर्म आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामविकासाला राष्ट्रविकासाचा पाया मानले. स्वच्छता, श्रमप्रतिष्ठा, शिक्षण, व्यसनमुक्ती, सामूहिक प्रयत्न आणि सामाजिक जबाबदारी यांवर त्यांनी भर दिला. आजही ग्रामीण भागातील समस्या सोडविताना, पर्यावरणाचे रक्षण करताना, युवकांना विधायक कार्याकडे वळविताना आणि वंचित घटकांना न्याय मिळवून देताना या विचारांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरते. केवळ भाषणांतून राष्ट्रनिर्मिती होत नाही; त्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या कृतीतून सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे.
राष्ट्रसंतांचे विचार हे केवळ इतिहासाचा भाग नाहीत, तर वर्तमानातील समस्यांवर मार्गदर्शन करणाऱ्या विचारांचा ठेवा आहे. आज देशाला केवळ मोठमोठ्या घोषणा देणाऱ्या व्यक्तीची नव्हे, तर समाजासाठी निःस्वार्थपणे काम करणाऱ्या नागरिकांची गरज आहे. राजकीय क्षेत्रात काम करणारे नेते, प्रशासकीय विभागात नोकरी करणारे अधिकारी, शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे गुरुजन, वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर असोत किंवा ज्या कोणत्या क्षेत्रात आपण कार्य करत आहोत तेथे प्रामाणिकतेला, समर्थनाला प्राधान्य दिले पाहिजे. प्रत्येकाने स्वतःपासून बदलाला सुरुवात केली तर कुटुंब बदलेल, गाव बदलेल, समाज बदलेल आणि देशही बदलेल.
ग्रामविकासातूनच राष्ट्रविकास होतो असा राष्ट्रसंतांचा ठाम विश्वास होता. आजही भारत हा खेड्यांचा देश आहे. आजही ग्रामीण भागात शिक्षण, आरोग्य, रोजगार, स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्यासारख्या अनेक समस्या आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी ग्रामस्वच्छता, लोकसहभाग, श्रमदान आणि स्वावलंबन यांना महत्त्व देणे आवश्यक आहे. आज देशातील प्रत्येक गावाने ग्रामगीतेतील विचारांचा स्वीकार केला तर ग्रामीण भारत अधिक स्वच्छ, सक्षम आणि समृद्ध होऊ शकतो. जातिभेद आणि सामाजिक विषमतेवर प्रहार करताना राष्ट्रसंत म्हणतात, आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपण प्रगती करत असलो तरी समाजात जातिभेद, धर्मभेद द्वेष आणि सामाजिक विषमता अनेक ठिकाणी दिसून येते. माणसाची ओळख त्याच्या माणुसकीवरून व्हावी, हा विचार समाजात रुजवणे गरजेचे आहे. त्यांनी मानवतेला सर्वोच्च स्थान दिले. सर्व माणसे समान आहेत. प्रत्येक व्यक्तीचा सन्मान झाला पाहिजे हा त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा संदेश होता.
धर्माचा अर्थ सांगताना राष्ट्रसंत सांगतात की, धर्म म्हणजे मानवेसवा. धर्म म्हणजे केवळ पूजा, विधी किंवा धार्मिक कार्यक्रम नव्हेत. दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणे, गरजू व्यक्तीला मदत करणे, दुर्बलांना आधार देणे आणि समाजात प्रेम वाढवणे हीदेखील धर्माची महत्त्वाची रूपे आहेत. राष्ट्रसंतांच्या विचारातून मानवसेवा, सामाजिक एकता आणि नैतिक आचरण याचे महत्त्व स्पष्ट होते. राष्ट्रसंतांनी समाजाच्या व पर्यायाने विश्वाच्या कल्पनाकरिता अनेक मार्गांचा अवलंब केला. पहाटेचे सामुदायिक ध्यान, सायंकाळची सामुदायिक प्रार्थना, परिस्थितीनुसार त्यांनी लिहिलेले भजने, वेळोवेळी केलेले प्रबोधन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी लिहिलेली, ग्रामाला केंद्रस्थानी ठेवून व शेतकऱ्यांना समर्पित ‘ग्रामगीता’.
देशातीलच नव्हे तर जगातील सद्यस्थिती बघता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांची अत्यंत गरज आहे. ‘या भारतात बंधुभाव नित्य वसू दे’ अशी आर्त हाक देणाऱ्या व मानवतेचा संदेश संपूर्ण जगात पोहोचविणाऱ्या संतांना देशाच्या महामहीम राष्ट्रपतींनी ज्यांना ‘राष्ट्रसंत’ ही उपाधी दिली त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च सन्मान देऊन गौरविण्याची गरज आहे. त्याने राष्ट्रसंतांचा नव्हे तर भारत देशाचा गौरव होईल आणि देशातील प्रत्येक घटकापर्यंत त्यांचे विचार पोहोचविण्यास मदत होईल व आपला देश अराजकतेने भरकटलेल्या परिस्थितीतून समृद्ध, सुसंस्कृत, सशक्त देशाच्या दिशेने वाटचाल करेल.