Political Dilemma | कोणता झेंडा घेऊ हाती? File Photo
संपादकीय

Political Dilemma | कोणता झेंडा घेऊ हाती?

पुढारी वृत्तसेवा

कार्यकर्ता : भाऊ, प्रचार साहित्य घेण्यासाठी दुकानावर आलो आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मशालीच्या चिन्हाचे झेंडे, टोप्या, छातीला लावायचे बिल्ले आणि लाईटच्या खांबावर लावायचे बॅनर खरेदी करत आहे. प्रत्येकाचे किती घ्यायचे तेवढे सांगा म्हणजे लगेच घेऊन आपल्या कार्यालयात येतो.

नेता : अरे, थांब थांब गडबड करू नको. अजून नक्की नाही कोणते तिकीट मिळणार ते! आताच मला मुंबईवरून फोन आलाय. मशाल राहू दे तुतारीचे बघून ठेव. आणि हां, तुतारी नीट बघून घे. पिपाणीसारखी दिसायला नको. थोड्या वेळात तुला सांगतो. नंतर मग खरेदी कर. आताच आपण पक्ष बदललाय. मशालीकडून तुतारीकडे आलो आहोत.

कार्यकर्ता : बरं भाऊ, फोनची वाट बघतो.

(थोड्या वेळाने) नेता : हे बघ मशाल सोडून दे, तुतारी राहू दे. घड्याळाचे प्रचार साहित्य किती आहे ते बघ. कमी पडायला नको.

कार्यकर्ता : अजिबात कमी पडणार नाही भाऊ. इथे दुकानावर आलोय, तर सगळ्यात जास्त प्रचार साहित्य कमळाचे आणि त्याच्या खालोखाल धनुष्यबाणाचे आणि त्याच्या खालोखाल घड्याळाचे आहे. मशाल आणि तुतारीचे थोडेबहुत साहित्य आहे. तुमचा फोन आला एकदा फायनल की, तुम्ही म्हणता ते घेऊन टाकतो. काय म्हणताय? वाट बघू थोडा वेळ. सकाळपासून इथे बसलोय, दुपार झाली तरी तुमचा अजून निर्णय होत नाही. काय ते एकदाच ठरवून टाका. आम्ही सगळे कार्यकर्ते दुकानावर बसून आहोत.

नेता : अरे वेड्यांनो, राजकारण तुम्हाला कळत नाही. आपण कुणाकडून निवडून येतो, याची शक्यता जास्त आहे तिथेच आपल्याला जायला पाहिजे. मी निवडून आलो, तरच तुमचं काहीतरी चांगभलं होईल. नाही तर बसा मग पाच वर्षे टाळ्या वाजवत. अजिबात गडबड करू नको. (थोड्या वेळाने) हे बघ, घड्याळाचे फायनल होत आले आहे. आताच फोन आला होता.

कार्यकर्ता : मग घड्याळ चिन्ह असलेले प्रचार साहित्य घेऊ का? संध्याकाळ व्हायला आली अजून तुमचं काही निश्चित होईना.

नेता : अरे येड्या, रात्र वैर्‍याची आहे. राजकारण म्हणजे ताकसुद्धा फुंकून प्यावे लागते. एबी फॉर्म हातामध्ये पडेपर्यंत कोण कुठून उभारणार, काहीच नक्की नाही. आता मी तुला घड्याळाचे बघ म्हणत होतो, तिकडे घड्याळ आणि तुतारी एकत्र यायला लागले आहेत. समजा ते दोघे एकत्र आले, तर कदाचित आपल्याला कमळाचे प्रचार साहित्य पण घ्यावे लागेल. अजिबात गडबड करू नकोस. मोठ्या पक्षाकडून उभा राहिलो की, प्रचार साहित्य आपल्याला घ्यायचे कामच पडत नाही. सगळं काही वरूनच येत असते. कुणाचा एबी फॉर्म मिळेल काही सांगता येत नाही. कुणाचा नाही मिळाला, तर आपण आहोतच अपक्ष! कपबशी, पतंग, बॅट, टीव्ही जे मिळेल चिन्ह त्याचे प्रचार साहित्य घेऊयात. हाय काय अन् नाय काय!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT