संपादकीय

आवाज कशाने बसलाय मित्रा

मोहन कारंडे

काय रे मित्रा, इतका आवाज का बसला आहे? घशाचे इन्फेक्शन झाले की काय?
अरे नाही यार! होळीच्या दिवशी बोंबलण्याची प्रॅक्टिस करत होतो त्याच्यामुळेच घसा बसलाय. यावर्षी ठरवलेच होते की, त्रास देणार्‍या प्रत्येक गोष्टींविषयी बोंबलायचे आहे म्हणून.
ते साहजिकच आहे, म्हणजे होळीचा सण खास बोंबा मारण्यासाठीच असतो, हे सगळ्यांनाच माहीत आहे; पण मला एक सांग, कुणाकुणाविषयी बोंबलणार आहेस? म्हणजे त्याची काही यादी केलीस का? त्याच्यात काही प्रायोरिटी म्हणजेच प्राधान्यक्रम ठेवला आहेस का?
असं काही नाही; परंतु पोरगा बारावीला आहे, त्याच्या परीक्षा आहेत म्हणून सगळ्यात पहिल्यांदा दहावी-बारावीच्या बोर्डाच्या नावाने बोंब मारणार आहे. प्रश्नपत्रिकेत उत्तरे काय छापून येतात, कुठे कुठे अर्धा तास आधीच प्रश्नपत्रिका फुटतात, काही ठिकाणी सर्रास कॉप्या केल्या जातात. तर अशावेळी सामान्य विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी काय करायचे तर बोर्डाच्या नावाने बोंब मारायची!
झाले समाधान? काय असेल तो राग बोंबा मारून कमी करून घे. अरे आपल्या राज्यात तर तिन्ही त्रिकाळ बारा महिने प्रत्येकजण कुणाच्या ना कुणाच्या नावाने बोंबलत असतो. सासू सुनेच्या नावाने बोंब मारत असते आणि सून सासूच्या नावाने, बाप लेकाच्या नावाने बोंब मारतो आणि लेक बापाच्या नावाने. अरे घरोघरी हीच बोंबाबोंब आहे. कार्यालयामध्ये साहेब बोंबा मारत असतो की, कर्मचारी काम करत नाहीत म्हणून आणि कर्मचारी बोंबा मारत असतात साहेबाला अक्कल नाही म्हणून. आपल्या देशात प्रत्येकजण शहाणा झाल्यामुळे नेहमी समोरच्याला काही ना काहीतरी शहाणपण शिकवत असतो आणि जो शहाणपण शिकवतो त्याला काही अक्कल नाही असे म्हणत इतर लोक बोंबा मारतात. सगळ्यात मोठी होळी कुठे होत असेल तर ती राजकारणात. मीडिया आल्यापासून, म्हणजे हा रे मीडिया, आल्यापासून चोवीस तास दुसर्‍याच्या नावाने बोंब मारण्याची सोय उपलब्ध झाली आहे. काही काही लोक सकाळी नऊ वाजल्यापासून रोज बोंबा मारतात. त्याला उत्तर म्हणून दिवसभर बाकीचे लोक त्याच्या नावाने बोंबा मारतात. हे चक्र न संपणारे आहे. राजकारणाचे म्हणशील तर सत्ताधारी विरोधकांवर आणि विरोधक सत्ताधार्‍यांच्या नावे बारा महिने बोंबा मारत असतात. सगळ्यात मोठा आक्रोश जनतेचा असतो. आपण निवडून दिलेले प्रतिनिधी एकदा निवडून आले की पुन्हा पाच वर्ष फक्त टीव्ही चॅनेलवर दर्शन देतात, प्रत्यक्ष भेटत नाहीत म्हणून जनता ओरडत असते. त्यामुळे ही बोंबा मारण्याची परंपरा फार जुनी आहे असे तुझ्या लक्षात येईल आणि मनसोक्त बोंबलायची सोय असल्यामुळे हा सण महत्त्वाचा आहे यात शंका नाही.
बरं मला एक सांग, आजचा सण साजरा करण्याचे तुझे काय नियोजन आहे? अरे कशाचे नियोजन? डोळे लावून शांत बसून मनातल्या मनात एकेकाच्या नावे बोंबा मारत बसलो आहे. आपण सामान्य माणसं. आपल्यामध्ये रस्त्यावर जाऊन ओरडण्याची हिंमत नाही. मग मी दरवर्षी काय करत असतो की ज्याच्या ज्याच्या नावाने बोंबा मारायच्यात त्या मनातल्या मनात मारत असतो. वाईट, व्यसनी, दुर्गुण किंवा जे जे अमंगल आहे ते जाळून टाकण्याचा सण म्हणजे होळी. सर्व समाजातून अशुद्ध, अमंगल, अपवित्र असे सगळे निघून जाईल तर मग रामराज्य आले असे म्हणावे लागेल. तसे काही होण्याची शक्यता नाही म्हणून आपण आपल्या जागेवर मोठ्याने बोंबलत बसायचे. एकंदरीत, होळीचा सण आज-काल बाराही महिने साजरा केला जातो आहे.

– झटका

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT