पुढारी तडका आर्टीकल Pudhari File Photo
संपादकीय

उपमा आणि टीकास्त्र

पुढारी वृत्तसेवा

सद्य स्थितीत महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणि इतिहासकालीन व्यक्ती यांचा संबंधच काय आहे? कित्येक शतकांपूर्वी होऊन गेलेल्या आणि भारतावर आक्रमण करून सत्ता स्थापन करणार्‍या व्यक्ती यांचा उल्लेख राजकारणामध्ये रोज होत आहे. अब्दाली कुठून तरी तिकडे अफगाणिस्तानातून आला आणि दिल्लीमध्ये साम्राज्य स्थापन केले. तशीच परिस्थिती औरंगजेबाची होती. दक्षिण विजय मिळवण्यासाठी तो औरंगाबाद येथे आला आणि स्वराज्य काबीज करण्याचा मनसुबा मनाशीच बाळगत त्यात अपयशी होऊन इथेच मरण पावला.

औरंगजेब हा परकी जुलमी सत्तेचा प्रतिनिधी म्हणून इतिहासाने नोंदवला आहे. ज्यांनी हिंदुत्वाची नाळ तोडली त्यांचा उल्लेख आजकाल ‘औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष’ असा केला जात आहे. तशाच पद्धतीने दिल्लीतील पक्षश्रेष्ठी महाराष्ट्रातील पक्षाच्या कार्यकर्त्यांशी, नेत्यांशी बोलण्यासाठी येतात आणि विरोधी पक्षावर टीका करतात तेव्हा त्यांना ‘अहमदशाह अब्दाली’ असे म्हटले जाते. केंद्रातील सत्ताधारी पक्षाचे एक पावरफुल्ल मंत्री शहा आडनावाचे आहेत. त्यामुळे साहजिकच अहमदशाहचा उल्लेख आपल्या राज्यात वारंवार होत असतो. इतिहासातील व्यक्तींची तुलना संपर्कातील राजकारणी लोकांशी करणे हा बर्‍याच लोकांचा छंद होऊन बसला आहे. उद्या चालून हुमायून, बाबर, अकबर त्याचबरोबर राजे जयसिंग किंवा पुढील काळातील किंवा वॉरन हेस्टिंग्स , लार्ड कर्झन अशा तुलना राजकारणी लोक एकमेकांना नावे ठेवण्यासाठी करतील अशी शक्यता दिसून येत आहे.

इथे हे लक्षात घेतले पाहिजे की, दीडशे वर्षे चाललेल्या इंग्रज राजवटीतील कोणाचाही उल्लेख केला जात नाही. इंग्रजांच्या पूर्वी जे राजे, महाराजे किंवा मुघल सम्राट होते त्यांनाच सांप्रत राजकारणामध्ये का ओढले जात आहे, हे लक्षात येत नाही. आजकालच्या तरुण पिढीला आपला इतिहास फारसा माहीत नसतो. त्यांना राजकीय लोक एकमेकांवर चिखलफेक करताना ज्या व्यक्तींचा उल्लेख करत आहेत त्या व्यक्ती माहिती करून घ्यायच्या असतील, तर जुना इतिहास पुन्हा नव्याने वाचावा लागेल. कोण कोणत्या दिशेने महाराष्ट्रावर चालून आला आणि कोणी महाराष्ट्राचे अधिक नुकसान केले, याची आधी माहिती घ्यावी लागेल. येत्या विधानसभा निवडणुकीत विजय आम्हालाच द्या, कारण आम्हीच ते कल्याणकारी राज्य पुन्हा इथे स्थापित करू शकतो, हा विश्वास जनतेला देण्यासाठी आणि विरोधकांना परकीय आक्रमकांची आणि सम्राटांची पदवी देण्यासाठी सध्या राजकीय लोक जोमदारपणे प्रचार करत आहेत. जनतेच्या मनात मात्र मावळे कोणते आणि मुघल कोणते, याविषयी नव्याने गोंधळ निर्माण होत आहे. राजकीय लोकांना नेमके काय म्हणायचे आहे, हे समजून घेण्यासाठी आपणा सर्वांना म्हणजे सर्वसामान्य जनतेला इतिहासाची पाने पुन्हा चाळावी लागतील आणि त्या-त्या काळात त्या-त्या खलनायकाने काय कामगिरी केलेली आहे, याचा अभ्यास करावा लागेल, असे दिसते आहे. कुणाचे विचार काहीही असोत; परंतु जनतेचा शिवचरित्राचा अभ्यास मात्र अत्यंत चांगला आहे. गनिमी कावा करून जनताच राजकीय नेत्यांना खिंडीत पकडेल, अशी शक्यता दिसत आहे. जनता हुशारच असते; परंतु राजकीय लोक जनतेला मूर्ख समजून राजकारणाचे डावपेच खेळत असतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT