West Bengal Election 2026 | अस्मितेची कसोटी (Pudhari File Photo)
संपादकीय

West Bengal Election 2026 | अस्मितेची कसोटी

पुढारी वृत्तसेवा

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा दुसरा आणि अंतिम टप्पादेखील उच्चांकी मतदानाने पार पडला आहे. पहिल्या टप्प्यात 23 एप्रिल रोजी मतांची टक्केवारी 93 टक्के इतकी होती, तर बुधवारी 29 एप्रिलला झालेल्या दुसर्‍या टप्प्यात मतदानाची टक्केवारी 90 टक्के इतकी आहे. मोठ्या प्रमाणात मतदानाचा थेट फायदा किंवा तोटा कोणत्या पक्षाला होईल, हे आताच सांगता येणार नाही. उच्च मतदान सहसा सत्ताविरोधी लाट तथा अँटिइन्कम्बन्सी दर्शवू शकते. त्यामुळे सत्ताधारी पक्षाला धोका वाढू शकतो; पण सत्ताधारी पक्षाने चांगले काम केले असेल, तर हेच जास्त मतदान त्यांच्या समर्थनातही जाऊ शकते; पण जास्त मतदान ही विरोधकांसाठी संधी असते. कारण, नाराज मतदारांना बदल हवा असतो.

बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने ‘माँ, माटी, मानुष’ अशी घोषणा देत 2011 पासून तीन वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आणि आता चौथ्यांदा बंगाली अस्मितेचा चोमोत्कार घडवण्यासाठी त्या रणांगणात उतरल्या आहेत. दुसरीकडे 2021 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपनेही भरघोस यश मिळवले आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सुमारे 38 टक्के मते मिळवून दोन आकडी खासदार लोकसभेत पाठवले. एकेकाळी प. बंगालवर सहा दशकांहून अधिक काळ सत्ता गाजवणारे काँग्रेस आणि डावे पक्ष बाजूला पडले असून भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस असा दुरंगी सामनाच राज्यात कमालीचा इर्ष्येने आणि सर्व शक्तीनिशी झाला आहे.

भाजपला काहीही करून पूर्व भारतातील हे महत्त्वाचे आणि संवेदनशील राज्य जिंकायचे आहे, तर ममतांना आपला बालेकिल्ला शाबूत ठेवायचा आहे. भाजपने हिंदुत्वाचा नारा दिला, तर ममतांनी बंगाली अस्मितेला साद घातली. दोन्ही बाजू अटीतटीने लढल्या. त्यामुळे ममता चौथ्यांदा बाजी मारणार की कमळ फुलणार, याकडे सर्वसामान्य जनतेचीही उत्सुक नजर लागली आहे. येथील 294 विधानसभा मतदारसंघांपैकी 112 मध्ये मुस्लीम मतदारांची संख्या लक्षणीय म्हणजे 25 टक्के एवढी आहे आणि ती निर्णायक ठरल्याचे दिसून आले आहे. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूलने 212 जागा जिंकल्या होत्या आणि त्यापैकी 106 जागा या 112 मतदारसंघांतून मिळाल्या होत्या.

तृणमूलमागे मुस्लीम मतदार उभा असल्याचे नेहमीच दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने आक्रमक हिंदुत्व धोरणाचा पुरस्कार चालवल्याने ममता यांनीही सौम्य हिंदुत्वाचा स्वीकार केला. त्यामुळेच बाबरी मशिदीची प्रतिकृती उभारणार्‍या हुमायून कबीर यांना त्यांनी पक्षातून काढून टाकले. मुर्शिदाबादसह चार जिल्ह्यांत 98 मतदारसंघ आहेत. हे मतदारसंघ मुस्लीमबहुल आहेत. याच भागातून तृणमूल काँग्रेसचे 86 उमेदवार विजयी झाले होते. हूमायून कबीर हे याच भागातील असून त्यांनी स्वतःच्या पक्षाचे उमेदवार दिले आहेत. याशिवाय खा. असदुदिन ओवैसी यांचा एआयएमआयएम पक्षही निवडणूक लढवत आहे. या दोघांचाही परिणाम तृणमूल काँग्रेसच्या यशावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या दहा वर्षांत राज्यात भाजपने विस्तार करत पाय भक्कम रोवले. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे कमळ प्रथम फुलले. भाजपला त्यावेळी तीन जागा आणि दहा टक्क्यांहून अधिक मते मिळाली होती. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मतदानाची टक्केवारी 38 टक्क्यांपर्यंत पोहोचली आणि 77 उमेदवार विजयी झाले. ही भाजपची हनुमान उडीच होती. 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मतदान टक्केवारीत दोन टक्क्यांची वाढ झाली आणि भाजपने 12 जागा जिंकल्या. गेल्या पाच वर्षांत भाजपने संघटनेचा जबरदस्त विस्तार केला आहे. प्रत्येक बूथवर पोहोचण्याची तयारी केली आहे. हे घटक भाजपला अनुकूल ठरणारे आहेत.

तृणमूलने 2011 पासून सलग तीनवेळा विधानसभा निवडणूक जिंकताना जागांसह मताची टक्केवारीही वाढविली. 2011 मध्ये 184 जागा जिंकून त्यांची मतांची टक्केवारी होती 39 टक्के. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूलचे संख्याबळ 211 वर पोहोचले आणि मतदानाच्या टक्केवारीत पाच टक्क्यांची वाढ झाली. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत 215 जागा जिंकून तृणमूलने 48 टक्के मतांपर्यंत मजल मारली. तृणमूलच्या कामगिरीचा आलेख विधानसभा निवडणुकीत सातत्याने चढता राहिला आहे. तथापि, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांपेक्षा दोन टक्के कमी मते पक्षाला मिळाली.

तृणमूलचे 29 खासदार निवडून आले. याआधी तृणमूल-भाजप या दोन्ही पक्षांतील मतांच्या टक्केवारीत 10 ते 11 टक्क्यांचा फरक होता. लोकसभा निवडणुकीत तो सहा टक्क्यांवर आला. त्यामुळे भाजपचे आव्हान यावेळी तृणमूलला मागील निवडणुकीपेक्षा अधिक अवघड ठरू शकते. अर्थात, मुख्यमंत्री असूनही नेहमी रस्त्यावर उतरून लोकांना थेट आवाहन करणार्‍या ममतांच्या नेतृत्वाची कसोटी पाहणारी ही निवडणूक आहे. बंगालमध्ये मतदार याद्या पुनर्निरीक्षणाचे (एसआयआर) प्रकरण चांगलेच गाजले. ममतांनी आपल्या फायरब्रँड प्रतिमेप्रमाणे याला कडवा विरोध केला. नव्वद लाखांवर मतदारांची नावे वगळल्याचा आरोप केला. निवडणूक आयोगाने दुबार, मयत मतदारांची नावे कमी केल्याचा खुलासा केला; पण ममतांनी ते मान्य केले नाही.

या प्रकरणाचा त्यांना लाभ होतो की तोटा, हे निकालातूनच कळेल. लोकसभेत महिला आरक्षणासह मतदारसंघ पुनर्रचना विधेयक विरोधकांनी फेटाळले. तृणमूलनेही या विधेयकाविरोधात मतदान केले होते. भाजपने याचा मुद्दा केला. त्यावर निवडणुकीत सर्वाधिक महिला उभ्या केल्याचे चपखल प्रत्युत्तर ममतांनी दिले. चार मे रोजी निकाल जाहीर होईल. कौल कोणाला मिळेल, हे अद्याप तरी स्पष्ट झालेले नाही. ममता जिंकल्या, तर यापुढे प्रादेशिक पक्षांना उभारी येऊ शकेल. भाजपने विजय मिळवला, तर पूर्वेकडील महत्त्वाचे राज्य भाजपच्या पारड्यात पडेल आणि देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपचे स्वप्न बळकट होईल. या निकालाने राजकारणाला नवी दिशा मिळेल, यात शंका नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT