मराठवाड्यात एकेकाळी बलशाली म्हणून ओळखल्या जाणार्या काँग्रेस पक्षात मरगळ आली आहे. या पक्षाचा प्रभाव ओसरला असून, त्यास संजीवनी कोण देणार, हा प्रश्नच आहे.
उमेश काळे
मराठवाड्यात नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. भाजप, शिंदेंची शिवसेना, उबाठा, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही गट, काँग्रेस, भारिप-बहुजन महासंघ निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. पण राज्याला बलाढ्य नेते देणार्या काँग्रेस पक्षाची अवस्था विचित्र झाली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील त्यांचे समर्थक भाजपवासी झाले आहेत. नांदेडची धुरा विद्यमान खासदार प्रा. रवींद्र चव्हाण यांच्यावर आली आहे. त्यांनी सध्या तरी 12 नगरपालिका व एका नगर पंचायतीसाठी उमेदवार घोषित केले आहेत. आघाडीबाबत अजून अनिश्चितता असल्याने उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरच त्यातील किती उमेदवार राहणार हे स्पष्ट होईल.
भोकर आणि मुदखेड येथे उमेदवारी न दिल्यामुळे स्थानिक नेत्यांनी पक्षाचा राजीनामा देणे पसंत केले. पण एकंदर वातारवण हे काँग्रेसला किती अनुकूल राहील हा प्रश्नच आहे. नांदेडप्रमाणेच लातुरात काँग्रेसचे थोडेफार अस्तित्व उरले आहे. तेथे आ. अमित देशमुख हे पक्ष सांभाळत आहेत. बाकी जिल्ह्यात नाव घेईल असा कोणी नेता नाही. लातुरात खासदार काँग्रेसचा असला तरी त्यांचे नाव कधी चर्चेत दिसत नाही. अमित देशमुख यांनी नगरपालिकेपेक्षा लातूर महापालिकेवर आपले लक्ष केंद्रित करण्याचे ठरविल्याचे म्हटले जाते. अजून महापालिका निवडणुका घोषित झाल्या नसल्या तरी लातूर महापालिका आपल्या ताब्यात राहावी म्हणून त्यांनी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविले आहेत.
जालन्यात डॉ. कल्याण काळे हे काँग्रेसचे खासदार आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना यश मिळाले असले तरी काँग्रेसचे नेते, माजी आमदार कैलास गोरंट्याल हे भाजपमध्ये गेल्यामुळे शहरात काँग्रेसचा जोर ओसरला आहे. भोकरदनला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस निवडणूक लढवत असली तरी दुसर्या तालुक्यात काँग्रेसचा प्रभाव शून्यच आहे. बीड जिल्ह्यात काँग्रेस नावापुरतीच उरली आहे. भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचा प्रभाव या जिल्ह्यात अधिक जाणवतो. अशीच स्थिती धाराशिव, हिंगोली, परभणीची आहे. या पार्श्वभूमीवर बहुजन महासंघ आणि काँग्रेस युतीची चर्चा होती. ही चर्चा हवेतच विरली.
मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्या छत्रपती संभाजीनगरात काँग्रेस नसल्यासारखीच आहे. शिवसेनेचा संभाजीनगरात प्रवेश झाल्यापासून काँग्रेसला आपला प्रभाव फारसा दाखवता आला नाही. या पक्षाचा एकही खासदार आणि आमदार नसल्याने कार्यकर्ते अन्य पक्षांकडे वळले आहेत. नगरपालिकेत सुरू असलेल्या धामधुमीचा विचार करता नांदेड, लातूरचा काही भाग सोडला तर आठ जिल्ह्यांच्या या प्रदेशात काँग्रेस मरणप्राय अवस्थेत असल्यासारखीच स्थिती आहे. जिल्हा बँका, सहकारी साखर कारखाने, सहकारी संस्थाही हातातून गेल्या आहेत. परिणामी काँग्रेसची स्थिती विकलांग झाली आहे. 46 आमदारांपैकी लातूरचे अमित देशमुख हेच एकमेव काँग्रेसचे आहेत. देशमुख यांना साथ देणार्या परजिल्ह्यातील एकाही नेत्याचे नाव समोर येत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
या निवडणुका स्थानिक पातळीवर आणि स्थानिक मुद्दे समोर ठेवून लढल्या जात असल्या तरी ज्या पद्धतीने महायुतीचे घटक पक्ष (युती झाली नसली तरी) जोरकसपणे उतरले आहेत, तशी स्थिती आघाडीची दिसत नाही. त्यात ठाकरे गट आणि शरद पवार गटाचे प्रभाव क्षेत्र घटताना दिसते. काँग्रेस शेवटच्या स्थानावर आहे. या पक्षातील कार्यकर्त्यांना कामाला लावणारा एकही नेता मराठवाड्यात नाही, ही शोकांतिका म्हटली पाहिजे.