उमेश काळे
मराठवाड्यात पाणीटंचाईचे संकट गडद होत असताना पाण्याची नासाडी रोखणार कशी हा प्रश्न निर्माण झाला आहे.
मराठवाड्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती असतानाही दिवाळीच्या सणात त्याची तीव्रता कुठेही जाणवली नाही. दिवाळीचा उत्साह ओसरल्यानंतर आता खऱ्या संकटाची जाणीव होऊ लागणार आहे. आगामी काळात पिण्याचे पाणी, पशुधनासाठी चारा आणि रब्बी हंगामातील पिकांची काळजी ही मराठवाड्यासमोरील मोठी आव्हाने असणार आहेत. त्यातही पुढील सात ते आठ महिने पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर ठरण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगरसारख्या शहरात हजारो लिटर पाणी वाहून जात असल्याचे चित्र दिसते. गाड्या धुणे, झाडांना गरजेपेक्षा जास्त पाणी देणे, कपडे व भांडी धुण्यासाठी अतिरिक्त पाणी वापरणे, अंगणात सडा टाकणे अशा अनेक कारणांनी शहरी भागात पाण्याची नासाडी सुरूच आहे. शहरातील सिडको, हडको आणि अन्य वसाहतींमध्ये पूर्वी आठ ते दहा दिवसांच्या अंतराने होणारा पाणीपुरवठा आता चार ते पाच दिवसांवर आला आहे. मात्र, जलकुंभ स्वच्छतेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याच्या तक्रारी आहेत. नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन करणाऱ्या महापालिकेने स्वतःच्या व्यवस्थापनातही पाण्याची बचत होईल, याची दक्षता घेणे गरजेचे आहे.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि लातूर या पाच महापालिका असलेल्या शहरांसह हिंगोली, बीड आणि धाराशिव या नगरपालिका असलेल्या जिल्ह्यांच्या मुख्यालयांमध्येही पाण्याचा अपव्यय रोखण्याचे मोठे आव्हान आहे. टंचाईची परिस्थिती गंभीर होत असतानाही या शहरांमध्ये पाण्याचा गैरवापर सुरूच आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना शहरांना जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, दर पंधरा ते वीस दिवसांनी जलवाहिनीला गळती लागण्याचे प्रकार घडतात. या गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया जाते. जलवाहिनीची गळती तात्पुरती दुरुस्त करण्याऐवजी ती कायमस्वरूपी रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा पाण्याची टंचाई अधिक तीव्र झाल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. नांदेड शहरातील परिस्थितीही यापेक्षा वेगळी नाही.
महापालिकेने नागरिकांना वाहने धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरू नये, असे आवाहन केले होते. मात्र, महापालिकेच्या आवारातच वाहनांची धुलाई होत असल्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी प्रसारित झाला होता. तरोडा, आर. के. फंक्शन परिसर आणि लक्ष्मीनगर भागात पाणी वाया जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे करण्यात आल्या आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागातील एसटी वर्कशॉप परिसरात तब्बल अकरा दिवसांपासून सुरू असलेली पाण्याची गळती रोखण्यातही महापालिकेला यश आलेले नाही. नागरिकांना पाणी बचतीचे धडे देणाऱ्या प्रशासनाने आधी स्वतःच्या यंत्रणेतील त्रुटी दूर करणे आवश्यक आहे. लातूर आणि परिसरातील शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात केवळ आठ ते दहा टक्के पाणीसाठा शिल्लक असताना प्रशासनाने विद्युत मोटारी जप्त करण्याची कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई आधीच का करण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. राजकीय दबावामुळे कारवाईला विलंब झाल्याची चर्चा आहे. मुख्य जलवाहिनीवरून घेतलेल्या अनधिकृत जोडण्या यापूर्वी दोन वेळा तोडल्या होत्या. तरीही काही ठिकाणी अनधिकृतपणे पाणी उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने पुन्हा कारवाई करावी लागली. यावरून प्रशासनाच्या कारवाईतील सातत्याचा अभाव स्पष्ट होतो.
पाण्याचा प्रत्येक थेंब जपणे ही नागरिकांचीही तितकीच महत्त्वाची जबाबदारी आहे. गळती रोखणे, अनधिकृत जोडण्या बंद करणे, पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आणि उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करणे या उपाययोजना तातडीने राबविण्याची गरज आहे. त्याचबरोबर नागरिकांनीही दैनंदिन वापरात पाण्याची बचत करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. दिवाळीच्या काळात दुष्काळाचे गांभीर्य जाणवले नसले, तरी येणारा उन्हाळा मराठवाड्यासाठी कठीण ठरू शकतो. पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि शेतीसाठी पाणी यांचा प्रश्न अधिक गंभीर होण्यापूर्वीच प्रशासनाने नियोजन करणे आवश्यक आहे. आज पाण्याची नासाडी रोखली नाही, तर उद्या पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी संघर्ष करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट उंबरठ्यावर असतानाच प्रशासन आणि नागरिकांनी जागे होणे ही काळाची गरज आहे.