शशिकांत सावंत
मुंबई महानगर प्रदेशातील वाढती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी जलमेट्रो हा महत्त्वाकांक्षी आणि दूरद़ृष्टीचा प्रकल्प आकार घेत आहे. पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफोईल बोट मुंबईत दाखल झाल्याने महामुंबईतील 21 जलमार्गांच्या विकासाला गती मिळाली आहे.
मुंबईसह कोकणात जलमेट्रोमार्ग विकसित होत आहेत. यातील पहिली बोट मुंबईत दाखलही झाली. महामुंबईत एकूण 21 जलमार्ग विकसित होणार आहेत. यामध्ये पालघर, रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबई या विभागांचा सामावेश आहे. कॅडेला पी 12 इलेक्ट्रिक हायड्रोफोईल या प्रकरातील ही फेरीबोट असणार आहे. ही बोट जलविमान कंपनीच्या ताफ्यात दाखल झाली आहे. महामुंबईच्या वेगवान वाहतुकीच्या आराखड्यातील हा प्रकल्प आता प्रत्ययरूपात आला आहे. वाहतूक विस्ताराच्या द़ृष्टीने उचलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
पहिली बोट जेएनपीएमध्ये दाखल झाली असून मत्स्यविकासमंत्री नितेश राणे यांनीच याबाबतची घोषणा केली. मुंबई महानगर प्रदेशात जलमेट्रोचे जाळे विकसित होत आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही सेवा सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. कस्टम क्लियरन्सनंतर या नव्या बोटीची चाचणी होणार आहे. या जलमेट्रोतील प्रवास सुरक्षित आणि वेगवान असेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. मुंबईच्या जलमेट्रोसाठी 11 कॅडेला जातीच्या 12 बोटी मागविण्यात आल्या आहेत. ताशी 40 किलोमीटर वेगाने या बोटी पाण्यावरून धावतात. एकाचवेळी 30 प्रवासी क्षमता असलेल्या या बोटी वेगवान मुंबईच्या वेगवान प्रवासासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत.
सध्या महामुंबईमधील वाहतुकीची समस्या गंभीर रूप धारण करत आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते. अर्धा तासाच्या प्रवासाला दीड ते दोन तास लागतात, हा सार्वत्रिक अनुभव आहे. मुंबई शहरातून जाणारे मुंबई-अहमदाबाद, मुंबई-नाशिक, मुंबई-गोवा हे महामार्ग वाहतूक कोडींचे ठरत आहेत. महामुंबईची कक्षा आता रायगड जिल्ह्यातील रोहा, कर्जत, खोपोलीपर्यंत, तर ठाणे जिल्ह्यात कसारा, मुरबाड, भिवंडीपर्यंत विस्तारलेली आहे. वाढती लोकसंख्या आणि वाढती वाहने व याचा रस्ते वाहतुकीवर पडणारा मोठा ताण यामुळे कोंडीचे चित्र दिवसेंदिवस अधिक गडद होत आहे. खरे तर महामुंबईला सार्वजनिक वाहतूक सुविधेशिवाय पर्याय उरलेला नाही. यामुळेच अशा सुविधा नव्याने सुरू करणे ही या प्रदेशाची अनिवार्य अशी गरज होती. म्हणून या सेवेचे स्वागत करायला हवे.
वाढती लोकसंख्या हा प्रश्न सर्वच महानगरांचा आहे. मुंबईचे बोलायचे झाले, तर महामुंबईची लोकसंख्या आता 2 कोटींपेक्षा वाढली आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला तेवढ्याच मोठ्या प्रमाणात वाहतूक व्यवस्था निर्माण करणे अनिवार्य आहे. सध्याचा विकास हा शहरी भागापुरताच मर्यादित आहे. आज औद्योगिकीकरणही शहरांपुरतेच मर्यादित आहे. म्हणूनच शहरे हाऊसफुल्ल, तर खेडी रिकामी पडलेली पाहायला मिळतात. या अवस्थेमध्ये शहरांसाठी वाहतुकीचे नवे पर्याय निर्माण होणे अनिवार्यच आहे.
औद्योगिकीकरणाचा विस्तार शहरकेंद्रित आहे. यामुळेच महामुंबईचा विस्तार वेगाने होताना दिसतो. यावर उपाय म्हणून मेट्रो मार्ग 1 ते 16 याबरोबर जलमेट्रोमार्ग 11 विकसित केले जात आहेत. मुंबई, ठाणे शहरासाठी आणि एकूण कोकणसाठी जलमेट्रोमार्ग हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. महामुंबईच्या विस्तारात आता 74 गावांची नव्याने भर पडली आहे. या विस्तारासाठी हा 48 हजार कोटींचा मेगा प्लॅन तयार करण्यात आला आहे. तिसरी आणि चौथी मुंबई यातूनच तयार होणार आहे. पालघर जिल्ह्यात विकसित होणारे वाढवण बंदर आणि रायगड जिल्ह्यात विकसित झालेले आंतराष्ट्रीय विमानतळ हे प्रकल्प शहर विस्ताराचे गेमचेंजर ठरत आहेत. यामुळेच शहर विस्ताराबरोबर दळणवळणाच्या नव्या सुविधांची गरज तेवढीच महत्त्वाची आहे.