प्राचार्य डॉ. राजेंद्र पोंदे
आजच्या युद्धग्रस्त जगात मानवासोबतच निसर्ग आणि वन्यजीवांनाही मोठी किंमत मोजावी लागत आहे. वाढती जंगलतोड, हवामान बदल आणि युद्धांमुळे पर्यावरणाचा समतोल धोक्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर वनसंपदेचा र्हास आणि त्याचे गंभीर परिणाम याविषयी गांभीर्याने विचार व्हायला हवा.
इराण-अमेरिका, इस्रायल युद्धात हजारो बॉम्ब, क्षेपणास्त्रे यांचा वापर झाला. रहिवासी इमारती, दवाखाने, कार्यालये, नागरी वस्त्या, शाळा उद्ध्वस्त झाल्या. लष्करी अधिकारी, सैनिकांबरोबरच नागरिक, लहान मुले, स्त्रिया, वृद्ध नागरिकांचा मृत्यू झाला. मानव वगळता पर्यावरण, वनक्षेत्र आणि युद्धाचा काही एक संबंध नसणार्या वन्यजीवांवरही युद्धाचे गंभीर आणि दूरगामी परिणाम होणार आहेत. माणसाकडून यापूर्वीच निसर्गाची अपरिमित हानी झाली आहे. गेल्या पन्नास वर्षांत पृथ्वीवरील वन क्षेत्रात मोठी घट झाली असून त्याचा परिणाम म्हणून तापमानवाढ व हवामान बदलाचे संकट गहिरे होत आहे. उष्ण कटिबंधीय वर्षावनांमध्ये जंगलतोड मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे अॅमेझॉनमध्ये सुमारे 17 टक्के जंगल नष्ट झाले.
भारतामध्ये वृक्षतोडीचा वेग कमालीचा वाढला आहे. त्यामुळे वन क्षेत्र घटले आहे. 2001 पासून देशातील 7.1 टक्के वन क्षेत्र घटले आहे आणि अर्थातच त्याचा परिणाम वन्यजीवांवर झाला आहे. नैसर्गिक वसतिस्थानांचा नाश झाल्यामुळे वन्यप्राणी संकटग्रस्त झाले आहेत. महाराष्ट्रात यावर्षी बिबट्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे, तर आसाम, झारखंड व केरळमध्ये जंगली हत्ती मानवी वसाहतींमध्ये येत आहेत. गुजरातमध्ये गीरच्या जंगलातील सिंह शहरांपर्यंत पोहोचले आहेत. संरक्षित जंगले, हरित आच्छादन कमी झाल्याने लहान-मोठ्या सर्वच वन्यप्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
जैवविविधतेच्या बाबतीत समृद्ध असलेल्या आफ्रिका खंडातील देश तसेच भारतासहीत पूर्व आशियातील वन्य जीवांनी समृद्ध असलेल्या देशांमध्ये वनसंपदेचा नैसर्गिक वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. जंगलांमध्ये खाण प्रकल्प, रेल्वेमार्ग, बोगदे व औद्योगिक प्रकल्पांमुळे वन्यप्राणी मृत्युमुखी पडत आहेत. आफ्रिकेतील सुदान, युगांडा, केनिया इ. देशातसुद्धा वेगाने शहरीकरण होत आहे. दक्षिण सुदानमध्ये शरणार्थीचे कॅम्प्स झाले आहेत. पूर्वी तेथे जंगल होते व हत्तींसह सर्व प्राण्यांचे वसतिस्थान होते. काँगोमधील वर्षावनांमध्ये सोन्याच्या खाणीसाठी मोठ्या प्रमाणात उत्खनन झाले व त्यामुळे तेथे प्रदूषण वाढले. या सर्वांचा परिणाम म्हणून गेल्या पन्नास वर्षांत आफ्रिकेतील सिहांची संख्या साडेचार लाखांहून फक्त वीस हजारांवर आली आहे, तर पश्चिम आफ्रिका खंडात हत्तींसाठी आता केवळ सात टक्के वन क्षेत्र शिल्लक राहिले आहे. परिणामी, पृथ्वीवरील सर्वांत विशाल आणि शक्तिमान प्राण्यालासुद्धा जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
भारतात गेल्या 25 वर्षांत 1200 हत्तींचा मृत्यू मानव-हत्ती संघर्षात झाला आहे. वनक्षेत्र घटल्यामुळे गेल्या चाळीस वर्षांत पन्नास टक्के वन्यजीव नष्ट झाले आहेत. आपल्या वैज्ञानिक व तांत्रिक विकासाबरोबर आपण वन्यजीवांचा हळूहळू व क्रमश: नाश होऊ दिला, तर आपले स्वत:चे अस्तित्वच संकटात येईल. आतापर्यंत पृथ्वीवरील एक तृतीयांश जंगले नष्ट झाली आहेत व त्यापैकी पन्नास टक्के मागील शतकात झाली आहेत. त्यामुळेच जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल या संकटांचा सामना आपल्याला करावा लागतो आहे. तापमानवाढीमुळे उत्तर व दक्षिण धु्रवावरील विशाल हिमनग वितळायला सुरुवात झाली आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमानात 4 अंशांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.
एकोणिसाव्या शतकात वसाहतवादाच्या आणि साम—ाज्यवादाच्या काळामध्ये पृथ्वीवरील वनसंपदेचा खूप र्हास झाला. विशेषत: आफ्रिका आणि आशिया खंडातील देशांमध्ये जंगलतोड करण्यात आली. चहाचे आणि कॉफीचे मळे, रबर प्लँटेशन करण्यासाठी युरोपीय लोकांनी वृक्षतोड केली; परंतु विसाव्या शतकामध्ये निसर्गाचा, वनांचा त्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला. याचे कारण म्हणजे दोन महायुद्धे! पहिल्या महायुद्धातच विमानातून बाँबफेक करण्यास सुरुवात झाली होती. त्याच्यानंतर दुसरे महायुद्ध व पुढील काळात जगातील इतर देशांमध्ये झालेल्या युद्धांमध्ये आकाशातून बाँब वर्षाव करण्याबरोबरच भुसुरूंग, पाण्यातील सुरुंगांचा, क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापरामुळे किती ठिकाणची जंगले जळाली आणि माणसांबरोबरच किती वन्यजीव मृत्युमुखी पडले याची मोजदाद झालेली नाही. वन्यजीव व जैवविविधता नष्ट होण्याचे हे एक प्रमुख कारण असू शकते. अलीकडच्या काळात अमेरिका-व्हिएतनाम यांच्यातील युद्धानंतर 1980 च्या दशकातील दीर्घकाळ चाललेले इराक-इराणमधील युद्ध, 1990 मधील अमेरिका-इराकमधील संघर्ष आणि नंतर अफगाणिस्तानवरील अमेरिकेचे आक्रमण या युद्धांमुळे वायू प्रदूषण आणि पर्यावरणाची हानी निश्चितच झाली आहे.
वन क्षेत्र, वन्यजीव व त्यांची वसतिस्थाने, परिसंस्था यावर निश्चितच परिणाम झाला आहे. अमेरिकेने 2001 मध्ये अफगाणिस्तानवर लष्करी कारवाई केली होती. त्यानंतर प्रसिद्ध लेखक व पर्यावरणवादी जॉर्ज शेल्लर यांनी युद्धाचा तेथील वन्यजीवांवर झालेल्या परिणामाचा अभ्यास करण्यासाठी प्रकल्प हाती घेतला होता. भारतात 2022 मध्ये नामिबियातून चित्ते आणून कुनो अभयारण्यात ‘प्रोजेक्ट चित्ता’ सुरू करण्यात आला. कारण, 1947 मध्ये भारतीय जंगलातील शेवटचा चित्ता नष्ट झाला होता. आज इराण ही युद्धभूमी आहे; पण तेथेच आशियाई चित्त्यांचे शेवटचे नैसर्गिक वसतिस्थान आहे. साहजिकच या युद्धाचा परिणाम या वन्यप्राण्यांवर होणार आहे. सुदैवाने जैवविविधतेच्या बाबतीत व समृद्ध वन्यजीवांची विविधता असणार्या आफ्रिका खंडातील देशांमध्ये मोठी युद्धे झालेली नाहीत; परंतु तेथील कांगो, युगांडा, रवांडा, केनिया, इथिओपिया, नामिबिया इत्यादी देशांमध्ये सतत गृहयुद्धे सुरू आहेत. त्याचप्रमाणे राजकीय अस्थिरता आहे. त्यामुळे हत्ती, जिराफ, सिंह, गेंडे यासारखे वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात नष्ट झाले आहेत.
आज जगभरात युद्धे घडवून आणणार्या ‘युद्धखोर’ अमेरिकेतील ‘द लॉस्ट जनरेशन’ म्हणून ओळखल्या जाणार्या पहिल्या महायुद्धात सहभागी झालेल्या लेखकांच्या पिढीने युद्धातील नरसंहार आणि विध्वंस याचे यथोचित वर्णन आपल्या लेखनातून केले आहे. या लेखकांचे नेतृत्व करणार्या अर्नेस्ट हेमिंग्वे याच्या ‘अ फेअरवेल टू आर्म्स’ या कादंबरीचा नायक शेवटी हताश होऊन म्हणतो, ‘आय अॅम नॉट ब—ेव्ह एनीमोअर. आय अॅम ऑल ब्रोकन दे हॅव ब्रोकन मी.’ विवेक हरवून बसलेल्या नेत्यांवर केलेले हे भाष्य आजघडीला समर्पक आहे. मानवजातीबरोबरच मुक्या आणि निष्पाप वन्यजीवांनाही युद्धाचे भीषण परिणाम भोगावे लागतात, त्यांचा विचार कोण करेल काय?