राजेंद्र जोशी
युद्धाच्या मॉकड्रिलमध्ये भारतीय नागरिक नापास झाले आहेत का? पुरेसा पुरवठा असूनही हवालदिल नागरिक गॅस-पेट्रोलच्या रांगेत उभे असलेले दिसतात. विरोधी पक्षांकडून समस्येचे राजकारण सुरू आहे.
युद्ध जसे पुढे सरकते, तसे त्याचे युद्धामध्ये सहभागी नसलेल्या अन्य देशांवरही अप्रत्यक्ष परिणाम जाणवू लागतात. भारतात हे परिणाम जाणवू लागले आहेत. युद्धामुळे निर्माण झालेल्या तेल, गॅस व अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईवर मात करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नांची शिकस्त करत आहे. पुरेसा साठा उपलब्ध झाल्यामुळे पंतप्रधानांपासून ते थेट जिल्हाधिकार्यांपर्यंत सर्व जनतेला पुरवठ्याविषयी दिलासा देत आहेत. तरीही भारतीय जनमानस मात्र टंचाईची पार्श्वभूमी समजून कृती करण्याच्या मानसिकतेत नाही. सर्वजण संयमाने वागण्याऐवजी वर्तनातून अगतिकता दाखवितो आहे. युद्धात सहभागी नसताना आणि अप्रत्यक्ष संकटाचा मुकाबला करताना ही स्थिती जर असेल, तर आपण युद्धकाळात परिस्थितीचा मुकाबला कसा करणार आहोत. खरे तर आखातातील युद्धातून देशवासीयांनी आपली मानसिकता तयार करण्याची गरज होती.
इराणने होर्मुझ सामुद्रधुनीत नाकेबंदी केल्यामुळे जगाचा 40 टक्के तेल पुरवठा अडचणीत सापडला. कतारमधील नैसर्गिक वायूचे प्रकल्प बेचिराख झाल्याने गॅसपुरवठा विस्कळीत झाला. होर्मुझ सामुद्रधुनीत इराणची क्षेपणास्त्रे तेलवाहू जहाजांना लक्ष्य करीत असताना भारतीय तिरंगा असणार्या जहाजांचा मार्ग सुकर झाला. रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल आयात झाले. भारतात पुरेसा साठा उपलब्ध होतो आहे. पण नागरिक मात्र सैरभैर झाले आहेत. सर्वांना समान उपलब्धता व्हावी, यापेक्षा माझ्या पदरात अधिक कसे पडेल, यासाठी नागरिकांचा आटापिटा सुरू आहे. पेट्रोल पंपावर, गॅस एजन्सीसमोर, जीवनावश्यक वस्तू विक्री करणारे मॉल्स, दुकाने यांच्यासमोर गर्दी होते आहे. काही ठिकाणी या संधीचा लाभ उठविला जातो आहे.
2022 पासून निरनिराळ्या युद्धांमध्ये हजारो निष्पाप मृत्युमुखी पडले. कोट्यवधी संसार रस्त्यावर आले. सुबत्तेत जगणार्यांना बंकरच्या आश्रयाला जावे लागले. नागरिक अन्नाला मोताद आहेत. समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करणार्या प्रकल्पांना उद्ध्वस्त केल्यामुळे आखातात कोट्यवधी जनता पिण्याच्या पाण्यासाठी तडफडते आहे. तरीही या नागरिकांतील देशभक्ती तसूभरही कमी झालेली नाही. इराणमध्ये युद्धाचा सेनापती मारला गेला, तरी जनता देशाच्या रक्षणाला प्राधान्य देते आहे. इस्रायलमध्ये 16 वर्षांच्या मुली लष्करी गणवेश घालून युद्धासाठी सज्ज झाल्या आहेत. या युद्धांचे समर्थन करण्याचा प्रश्न नाही. भारताने शांतीचा रस्ता दाखविणारी भूमिका घेतली आहे. पण वेळ आली की, देशासाठी समर्पण करण्याकरिता नागरिक भौतिक गोष्टींना विसरून तळहातावर शीर कसे ठेवतात, याचे उदाहरण म्हणून त्याकडे पाहावयास आणि अनुकरणासही कोणाची हरकत नसावी. आखातातील युद्ध भडकले, तर ते भारताच्या हद्दीपर्यंत येणार नाही, अशी आज कोणीच खात्री देत नाही.
कारण कंगाल पाकिस्तान यामध्ये हात धुऊन घेण्याची भाषा करतो आहे. एकूणच भारतातील सध्याची परिस्थिती ही युद्धपूर्व मॉकड्रिलसारखी आहे. पण या स्थितीत आपण कसोटीला उतरत नाही, हे दुर्दैव आहे. जेव्हा युद्ध भडकते, राष्ट्रावर संकटाचे ढग पसरतात, तेव्हा राजकारण बाजूला ठेवावे लागते. युद्धस्थितीत तेल आणि गॅस पुरवठ्याची जागतिक समस्या निर्माण होते, तेव्हा हे राष्ट्रीय संकट समजून त्याला सामोरे जाण्यासाठी संयुक्त संसदीय समितीने पुढाकार घेऊन देशाला एकत्रित आवाहन करण्याची गरज असते. आपल्याकडे या प्रश्नाचे विरोधी पक्षांकडून राजकीय भांडवल सुरू आहे. रस्त्यावर नागरिकांचे मोर्चे काढून विरोधी पक्ष अपरिपक्वतेचे दर्शन घडवत आहेत. भारतासारख्या समृद्ध लोकशाहीसाठी जशी सुजाण राष्ट्रप्रेमी नागरिक घडविण्याची गरज आहे, तसे परिपक्व विरोधी पक्ष निर्माण होणे ही काळाची गरज आहे. अन्यथा भारत जगाची तिसरी महासत्ता होईल, मोठी बाजारपेठ म्हणून जग त्याच्याकडे पाहील, जागतिक गुंतवणूकदार आकर्षित होतील. पण जेव्हा युद्धाचे संकट येईल, तेव्हा मात्र आपण बलवान असूच, असे छातीवर हात ठेवून ठामपणे सांगता आले पाहिजे.