तारीख 15 म्हणजे जानेवारीची. वार गुरुवार. श्री दत्तगुरूंचा वार. गुरूविना कोण दाखवील वाट! ही वाट मतदान केंद्राकडे जाते. महापालिकांच्या मतदानाचा हा पवित्र दिवस. उठा उठा मतदानाची वेळ झाली. मी तर पहाटे उठून मोती साबणाने खसाखसा आंघोळ केली. देवाच्या पाया पडलो. पांढरीधोट कपडे घातली आपल्या एकनाथभाऊंच्या सारखी. गंधपण कपाळावर डिट्टो तसाच लावला. मनगटात रुद्राक्षाची माळ घातली उद्धवजींसारखी. गाळाला खळी पाडली देवेंद्रजीच्या सारखी. कपाळावर किंचित अठी उमटवली अजितरावांसारखी. फिलॉसॉफरसारखा चेहरा केला पृथ्वीराजजींसारखा. नाकाला नॅपकीन लावला राजसाहेबांसारखा... आणि सकाळी आठच्या सुमारास या देशाचा आदर्श नागरिक बनून माझ्या शहराच्या भवितव्यासाठी मतदान केंद्राच्या दिशेने हळुवार पावले उमटवीत गेलो.
गेल्या गेल्या मतदान केंद्राला डोके टेकून पाया पडलो. मतदान कक्षासमोरील रांगेत चोरासारखा नव्हे, तर मोरासारखा आनंदाने पिसारा फुलवीत उभा राहिलो. ‘आज का दिन है बडा महान.’ आजच्या दिवसापुरता मी राजा असतो. सुगीच्या टायमाला शेतकरी राजा असतो आणि निवडणुकीच्या टायमात मतदार राजा असतो. सगळे उमेदवार आज संध्याकाळपर्यंत मला मुजरा करणार. आज मी बहुमुल्य मताचे दान करतो. त्यामुळे मी कर्णासारखा दानशूर असतो.
रांगेमध्ये उभा असताना एकीकडे मला माझ्या प्रभागातील उखडलेले रस्ते दिसतात, तुंबलेली गटारे दिसू लागतात, बंद पडत असलेल्या महापालिकेच्या मराठी शाळा दिसतात, फुटपाथवरची अतिक्रमणे दिसतात, तर दुसरीकडे गेल्या आठ-दहा दिवसांत आमच्या घराच्या पायर्या झिजवणारे, सोन्याच्या भाराने विनम्र (वाकलेले) अतिशय निरागस आणि स्मित हास्याने फुललेले उमेदवारांचे चेहरे दिसू लागतात. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आशा-आकांक्षा दिसू लागतात. जणू महाभारताच्या रणांगणात उभ्या असलेल्या अर्जुनासारखीच माझी स्थिती होते. यांच्यापैकी कुणावर शिक्का मारू? किंवा बटण दाबू? एकावर मारला तर दुसरा नाराज, तर नाही ना होणार? मी तर यांच्यापैकी कुणाचे मीठ खाल्लेले नाही; पण निवडून आल्यानंतर हे काय काय खातील? शेवटी ‘उडदामाजी काळे-गोरे’ या न्यायाने त्यातल्या त्यात बर्या (म्हणजे दिसायला नव्हे) उमेदवारांच्या चिन्हांपुढे बटण दाबत जड अंतःकरणाने मी बाहेर पडतो.