इतके पक्ष, इतक्या आघाड्या आणि इतक्या युती झाल्या आहेत की, मतदाराला कुणाला मतदान करावे, असा प्रश्न पडणार आहे, यात काही शंका नाही. ‘मतदारराजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’ हे म्हणायला सोपे असले, तरी मतदाराला गळाला लावण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. प्रलोभनांचा पाऊस पडत आहे आणि आमिषांची बरसात होत आहे. काही उमेदवारांनी अत्यंत कल्पक आयडिया मतदारांसमोर ठेवल्या आहेत. यावरून उमेदवार निवडणुकीसाठी किती पैसे खर्च करायला तयार आहेत, याचा अंदाज येऊ शकतो.
पिंपरी-चिंचवडमधील एका उमेदवाराने मतदारांसाठी चक्क 11 गुंठे जमीन देण्याचे प्रलोभन दाखविले आहे. निवडून आलो, तर अमुक इतक्या मतदारांना लॉटरी पद्धतीने चक्क 11 गुंठ्यांचा म्हणजे 11000 स्क्वेअर फुटांचा प्लॉट देण्याचे आश्वासन दिले आहे. यासाठी सर्वात प्रथम त्यांनी मतदारांची नोंदणी प्रक्रिया पण पूर्ण करून घेतली आहे. अर्थात, ज्या मतदारांनी नोंदणी केली आहे, त्यांना हा प्लॉट नशिबाने आपल्याला मिळेल, अशी आशा आहे. असे आशाळभूत मतदार सदरील उमेदवाराचे चिन्ह कोणतेही असले, तरी त्याला मतदान निश्चित करतील. कारण, हा उमेदवार निवडून आला, तर आपण एवढ्या मोठ्या प्लॉटचे मालक होऊ शकतो, ही लालूच दाखवण्यात आलेली आहे. आपण मर्त्य मानव आहोत आणि प्रत्येकाला मोहमाया असतेच.
याच शहरातील दुसर्या एका उमेदवाराने आपण निवडून आलो, तर लॉटरी पद्धतीने काही जोडप्यांना सहकुटुंब थायलंड टूर घडवून आणण्याचे आश्वासन दिले आहे. या ठिकाणीसुद्धा नोंदणी करण्यासाठी मतदारांची एकच झुंबड उडाली होती. अशाच आणखी एका कल्पक उमेदवाराने आपण निवडून आल्यास असंख्य लोकांना हेलिकॉप्टरमध्ये फिरवून आणण्याचे आश्वासन दिले आहे. कुठे पैठणी वाटल्या जात आहेत, कुठे महागड्या भेटवस्तू दिल्या जात आहेत आणि अर्थात हे सर्व आपले चिन्ह निश्चित होण्यापूर्वी केले जात आहे, हे यावर्षीचे वेगळेपण आहे. अद्याप फॉर्म भरणे सुरू असतानाच मतदारांची मात्र चंगळ सुरू आहे.
राजकारणाने समाज ढवळून निघत असतो हा आपला भारतीय लोकांचा नेहमीचा अनुभव आहे. कोणत्याही शहराच्या चौकात कोण निवडून येण्याची शक्यता आहे आणि महापौर कोण होईल आणि सत्ता कोणाची येईल, हीच चर्चा दिसून येईल. निकालाचे जे काय व्हायचे ते होईल; परंतु तूर्त जे काय मिळेल ते पदरात किंवा शर्टच्या खिशात घालून घ्या, असाच मतदारांचा पवित्रा आहे. तर... बंधू आणि भगिनींनो, तयार आहात ना सहकुटुंब थायलंड जायला किंवा हेलिकॉप्टर मधून फिरायला किंवा चक्क 11 गुंठ्यांच्या प्लॉटचे मालक व्हायला? घ्या लेको, मजा करून! मतदान होईपर्यंत तुम्हीच राजे आहात.