अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सातार्यातील संमेलनाच्या व्यासपीठावरून केलेल्या अध्यक्षीय भाषणाचा संपादित भाग...
मी 1986 मध्ये जेव्हा मुंबईकडे विमानाने निघालो होतो, तेव्हा अभयसिंहराजे माझ्या शेजारच्या खुर्चीवर बसलेले होते. ‘पानिपत’ या विषयावर मी त्यांच्याशी चर्चा करत असताना शेवटी त्यांनी मला एकच सल्ला दिला होता, ‘विश्वासराव, असे काहीतरी लिहा की, पानिपत या शब्दाला एक दिवस पुण्यपथाचा दर्जा प्राप्त होईल.’ त्याच अभयसिंहराजेंच्या सुपुत्राच्या म्हणजेच शिवेंद्रराजेंच्या हातून इथे माझा सन्मान घडावा, हा मी दुग्धशर्करा योग मानतो. माझ्या साहित्यिक कारकिर्दीचा विचार करताना मला हाच प्रश्न पडतो, मी नेमका कोण आहे? ‘झाडाझडती’, ‘लस्ट फॉर मुंबई’, ‘नागकेशर’, ‘दुडिया’, ‘अण्णा भाऊंची दर्दभरी दास्तान’सारखी ग्रंथसंपदा लिहिणारा सामाजिक लेखक की ऐतिहासिक कादंबरीकार? उजवा की डावा? मी डावाही नाही आणि उजवाही नाही; मात्र माझ्या हाती मानवतेचे निशाण आहे. मित्रांनो, लेखक किंवा कवीला कोणतीही जात नसते; मात्र त्याला धर्म असतो. तो फक्त मानवता धर्म!
एका सर्कशीत अपघाताने 2,530 जनावरे मृत्युमुखी पावली म्हणून भारतातील सर्कशीमध्ये प्राणी वापरावर बंदीच आणली गेली. दर वर्षी मोटार अपघातामध्ये लाखो माणसे मृत्युमुखी पडतात म्हणून वाहतुकीसाठी रस्तेच बंद करायची तुमच्यामध्ये आहे का हिंमत? भारतीय सर्कशीची पाठराखण लोकमान्य टिळक, लाल बहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांनी केली. सर्कशीची जन्मभूमी पूर्वीच्या सातारा जिल्ह्यातील तासगाव आहे. तासगावात एकेकाळी राष्ट्रीय दर्जाच्या 15 सर्कशी होत्या. या पार्श्वभूमीवर मी बिबटे आणि रानटी हत्तींसारखे प्राणी मोकाट सुटण्याऐवजी सर्कशीमध्ये वापरायला पुन्हा परवानगी द्या, अशी समाजाला व शासनाला विनंती करतो. प्राणिमित्रांनी समाजास वेठीस धरण्याचा आगाऊपणा करू नये.
1995 ते 2022 म्हणजे 27 वर्षांत 96 हजार 246 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. 2024 मध्ये हा आकडा 2 हजार 635 वर गेला आहे. याचा दुसरा सरळ अर्थ दिवसाला सुमारे एक किंवा एकाहून अधिक शेतकरी महाराष्ट्र भूमीमध्ये जीवन संपवत असतात. हे विषारी पर्व म्हणजे सर्व राजकीय पक्षांचे, समाजाचे नव्हे तर आम्हा लेखक, कलावंतांचेसुद्धा अपयश आहे. गेल्या 44 वर्षांत अधिकारी, लोकप्रतिनिधी, त्यांच्या नातेवाईकांनी सुरू केलेला धंदा बुडाला आहे, असे दाखवून देता देईल का? मग, बिचार्या शेतकर्यांच्याच वाट्यास हे असे दुःखी जीवन का यावे?
डॉ. आंबेडकर आणि आचार्य अत्रे यांच्यानंतर यशवंतराव चव्हाणांंच्या तोडीचा ग्रंथप्रेमी या भूमीमध्ये झाला नाही. चव्हाण साहेबांनी स्वतः लक्ष घालून इथे ग्रंथालयांच्या चळवळीला विलक्षण गती दिली होती; पण तीस-पस्तीस वर्षांपासून आजपर्यंत ग्रंथ आणि ग्रंथालये या दोन्ही गोष्टींकडे आम्ही इतके अक्षम्य दुर्लक्ष करीत आहोत की, त्या चळवळीला अखेरची घरघर लागली आहे. आजकाल ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या एक हजारपेक्षा कमी असेल. तिथल्या ग्रंथपालांचे पद आपण काढून टाकतो; पण मुळात एक हजार विद्यार्थी संख्या असणार्या शाळा प्रत्येक तालुक्यात फक्त चार ते पाच टक्के आहेत. नवी ग्रंथ खरेदी पूर्णपणे थंडावली आहे. उलट नव्याने ग्रंथालये चालू करण्यासाठी प्रेरणा वगैरे द्यायचे सोडूनच द्या, ग्रंथालयांचे नवे प्रस्ताव पूर्णतः बंद करण्याचे फतवे आम्ही आधीच काढले आहेत.
मी समृद्धी महामार्गावर तीन ते चार वेळा प्रवास केला. त्या कामाचा प्रचंड आवाका बघून मी हादरून गेलो. हे अचाट स्वप्न पाहणार्या आणि प्रत्यक्षात राबवणार्या मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यापासून ते सर्व इंजिनिअर आणि मजुरापर्यंत मी सर्वांचे त्रिवार अभिनंदन करतो. आज एकीकडे आम्ही अभिजात भाषा म्हणत स्वतःच्याच कौतुकाचे ढोल वाजवत फिरत आहोत; पण आम्हा सर्वांचेच वर्तन मायमराठीच्या विकासासाठी तारक नव्हे तर मारक असल्याचे, मी नव्हे तर आमचे नियम, अधिनियम आणि कागदपत्रे सांगतात. केंद्र आणि राज्य शासनाने लेखक आणि प्रकाशक यांच्यावर जो 18 टक्के जीएसटी लावला आहे. तो तत्काळ रद्द करावा. कारण, मुळात प्रकाशन व्यवसायच आतबट्यातला आहे. घराघरामध्ये देव्हार्याचा विस्तार वाढला आहे; पण अनावश्यक धोंड म्हणून घराघरातली व्यक्तिगत छोटी ग्रंथालये नष्ट झाली.
2012 पासून राज्यातल्या मराठी शाळेच्या कोणत्याही नव्या तुकडीला शासकीय अनुदान मिळत नाही. गेल्या 13 वर्षांत एकही नवी मराठी शाळा सुरू झालेली नाही. 2025 मध्ये एका आकडेवारीनुसार एका वर्षात 65 नव्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मंजुरी मिळाली. मुंबईत या कालावधीत 106 मराठी शाळा बंद करण्याचा आम्ही पराक्रम घडवून आणला आहे. मुंबई आणि नागपूरसारख्या महापालिकांनी स्वतःच्या इंग्रजी शाळा सुरू करण्याचा आचरट उद्योग आरंभला आहे.
आमच्याकडे गेल्या 35 वर्षांपासून शासन आणि प्रशासन हेच मायमराठीचे खर्याअर्थी घरचे मारेकरी ठरले आहेत. चिंध्या पांघरलेल्या स्थितीत आम्ही मराठी भाषेलाच नव्हे, तर खुद्द तात्यासाहेब शिरवाडकरांना गलितगात्र स्थितीत मंत्रालयासमोर उभे केले आहे. मी जेव्हा सातवीत होतो, तेव्हा पट पाच होता. पटसंख्येचे जाचक नियम असते, तर आमची शाळाच झाली नसती. वीस वगैरे सोडा, वर्गात एखादा-दुसरा विद्यार्थी असला तरी मराठी शाळा चालायलाच हवी. कोणी सांगावे मराठी शिकणारा तो एक विद्यार्थी उद्याचा ज्ञानेश्वर होईल किंवा दुसरा तुकोबाही असेल. गेल्या 50 वर्षांत महाराष्ट्रातील जे शास्त्रज्ञ आंतराष्ट्रीय स्तरावर गाजले. त्यांपैकी 98 टक्के मराठीतूनच शिकले होते. मायमराठीच्या अस्तित्वाची लढाई प्रत्येकाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे.
संयुक्त महाराष्ट्रात आम्ही मुंबई मिळवली, तेव्हा आमची संख्या 50-52 टक्के होती. 2001 च्या जनगणनेनुसार ती आता 30 टक्क्यांवर आली. नंतर 2011 च्या आकड्यानुसार साधारण ती संख्या 35 टक्के झाली. आता तर ती त्याहून खूप खाली नीचांकावर जाऊन पोहोचली आहे. गिरगाव, दादर, पार्ला सारं खाली होत आहे; पण मलबार हिल इंद्रपुरी नावाच्या जागेच्या पुर्नवसनाचा प्रस्ताव कधी परमेश्वरालासुद्धा स्वप्नात बघायला मिळणार नाही.
तुमच्या खांद्यावर झेंडा कोणत्याही जातीचा, पक्षाचा वा धर्माचा असूदे. त्याचा दांडा हा मराठीच असायला हवा. तुमच्या खांद्यावर पालखी कोणाचीही असूदे. तिचा गोंडा मराठीच असायला हवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पाळणा हलवताना त्यांच्या मातोश्री भीमाबाईच्या मुखातून, तसेच महात्मा फुले यांच्या पाळण्याची दोरी ओढताना त्यांच्या माता चिमणाबाईच्या ओठातून आणि बाळ शिवरायांना जोजावताना जिजाऊसाहेबांच्या कंठातून बाहेर पडलेल्या महन्मंगल ओव्या फक्त मराठी भाषेतच होत्या, या गोष्टींचा अजिबात विसर पडू देऊ नका!