Vishwa Marathi Sammelan | अध्यात्म, साहित्य आणि आधुनिकतेचा संगम 
संपादकीय

Vishwa Marathi Sammelan | अध्यात्म, साहित्य आणि आधुनिकतेचा संगम

पुढारी वृत्तसेवा

अ‍ॅड. नितीन ठाकरे, स्वागताध्यक्ष, विश्व मराठी संमेलन, नाशिक

गोदावरीच्या पवित्र तीरावर वसलेले नाशिक शहर यंदा सांस्कृतिक इतिहासातील एक महत्त्वपूर्ण पर्व लिहिण्यास सज्ज आहे. विश्व मराठी संमेलन 26, 27, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च असे चार दिवस नाशिकनगरीत प्रथमच होत आहे. उत्तर महाराष्ट्रासाठी हे आयोजन केवळ साहित्यिक सोहळा नसून सांस्कृतिक स्वाभिमानाचा उत्सव ठरणार आहे.

मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा प्राप्त झाल्यानंतर राज्यभर आनंदाची लाट उसळलेली आहे. अनेक दशकांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर मिळालेल्या या सन्मानामुळे मराठी भाषिक समाजात नवचैतन्य संचारले आहे. अशा ऐतिहासिक पार्श्वभूमीवर विश्व मराठी संमेलनाचे आयोजन होणे ही केवळ योगायोगाची बाब नाही, तर मराठी अस्मितेच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे. भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसते. ती संस्कृती, इतिहास, परंपरा आणि विचारांचा वारसा जपणारी जीवनरेखा असते. या जाणिवेचा जागर संमेलनाच्या माध्यमातून घडणार आहे. नाशिकची ओळख केवळ धार्मिक नगरी म्हणून मर्यादित नाही. साहित्य, रंगभूमी, क्रीडा, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात या शहराने भरीव योगदान दिले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्तृत्व सिद्ध केलेल्या अनेक मान्यवरांचा वारसा या भूमीला लाभला आहे. विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या कार्याचा जागतिक पटलावर ठसा उमटविण्याची संधी नाशिकला आहे. स्थानिकतेपासून जागतिकतेकडे वाटचाल करताना नाशिकच्या सांस्कृतिक सामर्थ्याचे प्रभावी सादरीकरण यानिमित्ताने होणार आहे.

संमेलनाचे स्वरूप व्यापक आणि सर्वसमावेशक आहे. साहित्यापुरते मर्यादित न राहता कला, क्रीडा, उद्योग आणि संस्कृती हे विविध क्षेत्रांतील विश्वस्तरीय मराठी चेहरा यंदा संमेलनात दिसून येईल. कवी संमेलन, गझल कट्टा, बोली भाषांचा जागर विशेषतः अहिराणी साहित्यावरील परिसंवाद, तसेच उद्योगपती आणि उद्योजकांच्या संवाद सत्रांमुळे मराठी समाजातील विविध प्रवाह एका व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. परदेशातील मराठीतज्ज्ञांचा सहभाग संमेलनाला आंतरराष्ट्रीय आयाम देणार आहे. बोली भाषांचे जतन आणि संवर्धन हा सांस्कृतिक समृद्धीचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे अहिराणीसारख्या स्थानिक बोलींवर होणारी चर्चा ही उत्तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीला बळ देणारी ठरेल.

याच वर्षी नाशिकमध्ये पवित्र सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे. जगातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक मानल्या जाणार्‍या या महापर्वामुळे देश-विदेशातील लाखो भाविक नाशिकमध्ये दाखल होतात. विश्व मराठी संमेलन आणि सिंहस्थ हे दोन भव्य सोहळे एकाच वर्षात होत असल्याने नाशिकसाठी ही ‘ब—ॅडिंग’ची सुवर्णसंधी आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक अशा दोन्ही स्तरांवर शहराचे महत्त्व अधोरेखित होणार आहे. आध्यात्मिक परंपरा आणि बौद्धिक संवाद यांची सांगड घालत नाशिक जागतिक व्यासपीठावर स्वतःची वेगळी छाप पाडणार आहे. ‘आध्यात्मिक ते आधुनिक’ ही संकल्पना संमेलनाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणार्‍या युगात मराठी समाजाने कोणती दिशा घ्यावी, याचा विचार या निमित्ताने होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल माध्यमांचा प्रभाव, बदलती वाचन संस्कृती, ई-पुस्तके, ऑडिओ बुक आणि ऑनलाईन व्यासपीठांचा वाढता वापर या विषयांवर सखोल मंथन अपेक्षित आहे. परंपरेचा आदर राखत आधुनिकतेचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे. मराठी साहित्य आणि कला क्षेत्राने तंत्रज्ञानाशी स्पर्धा करण्याऐवजी त्याचा सक्षम वापर करून नव्या संधी निर्माण केल्या पाहिजेत. नव्या पिढीला कौशल्य विकासाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनविण्याचा संदेश या संमेलनातून दिला जाणे आवश्यक आहे.

या भव्य आयोजनामागे उभा आहे एक भक्कम संस्थात्मक पाया. 1914 मध्ये स्थापन झालेला मराठा विद्या प्रसारक समाज हा राज्यातील सर्वात मोठ्या शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे. शेकडो शाळा-महाविद्यालये, लाखो विद्यार्थी, हजारो शिक्षक आणि सक्षम मनुष्यबळ या संस्थेच्या कार्याचा आवाका दर्शवितात. यापूर्वी अखिल भारतीय साहित्य संमेलन यशस्वीपणे पार पाडण्याचा अनुभव संस्थेकडे आहे. त्यामुळे विश्व मराठी संमेलनाचे आयोजनही शिस्तबद्ध आणि दर्जेदार पद्धतीने पार पडेल, असा विश्वास आहे. या सोहळ्यात नाशिकमधील विविध संस्था, संघटना आणि सामाजिक घटकांचा सहभाग आहे. त्यामुळे हा कार्यक्रम एखाद्या संस्थेपुरता मर्यादित न राहता संपूर्ण शहराचा उत्सव ठरेल. सांस्कृतिक समन्वय, सामाजिक ऐक्य आणि बौद्धिक देवाणघेवाण यांचे द्योतक म्हणून हे संमेलन ओळखले जाईल.

विश्व मराठी संमेलन हे मराठी अस्मिता, परंपरा आणि आधुनिकतेचा संगम साधणारा व्यापक सांस्कृतिक उपक्रम आहे. गोदाकाठची ही नगरी आता अध्यात्म, साहित्य आणि आधुनिक विचारांच्या त्रिवेणी संगमातून जागतिक पटलावर ठसा उमटविण्यास सज्ज झाली आहे. या ऐतिहासिक संधीचा उपयोग करून मराठीची पताका अधिक उंचावणे, हीच काळाची आणि समाजाची अपेक्षा आहे.

या संमेलनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘जागतिक मराठी कुटुंब’ या संकल्पनेची पुनर्स्थापना. जगाच्या कानाकोपर्‍यात स्थायिक झालेला मराठी माणूस आपल्या मातृभाषेशी आणि संस्कृतीशी घट्ट नाळ जपून आहे. उद्योग, तंत्रज्ञान, शिक्षण, कला आणि प्रशासन अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या प्रवासी मराठी बांधवांना या व्यासपीठावर एकत्र आणणे, ही काळाची गरज आहे. या संवादातून अनुभवांची देवाणघेवाण होईल, नवे सहकार्याचे मार्ग खुलतील आणि मराठीच्या जागतिक विस्ताराला चालना मिळेल. तसेच युवकांचा सक्रिय सहभाग हे संमेलनाचे खरे यश ठरेल. नव्या पिढीने मराठी भाषेला केवळ परंपरेचा वारसा म्हणून नव्हे, तर आधुनिक संधींचे दालन म्हणून स्वीकारले पाहिजे. सर्जनशीलता, नवोन्मेष आणि जागतिक द़ृष्टी या त्रिसूत्रीच्या आधारावर मराठीचा भविष्यकाळ अधिक उज्ज्वल करण्याचा निर्धार या संमेलनातून व्यक्त व्हावा, हीच अपेक्षा!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT