Social Media Trends | विनिशा उमाशंकर 
संपादकीय

Social Media Trends | विनिशा उमाशंकर

पुढारी वृत्तसेवा

अर्जुन नलवडे

सोशल मीडियावर सध्या विनिशा उमाशंकर या मुलीच्या प्रेरणादायी प्रवासाचे रील्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. एका १४ वर्षांच्या मुलीने रस्त्यावरील कोळशाच्या धुराचा प्रश्न पाहून त्यावर शोधातून उत्तर शोधून आपल्या कल्पकतेने जगाचे लक्ष वेधून घेतले होते. तीन वर्षांपूर्वी तामिळनाडूमधील तिरुवन्नमलाई या छोट्या मंदिर नगरीत एका रस्त्यावरून शाळेतून घरी परतताना १४ वर्षांची विनिशा वाटेत एका इस्त्रीवाल्याजवळ थांबली. इस्त्रीवाला जळलेला आणि हानिकारक कोळसा रस्त्याकडेला फेकून देत होता. विनिशाच्या मनात एका प्रश्नाने काहूर माजवले, ‘‘हे प्रदूषण किती दिवस होत राहणार? या समस्येवर मी स्वतः काय करू शकते?’’

विनिशाने त्या प्रश्नाकडे पाठ फिरवली नाही. घरी जाऊन तिने थेट हिशेब मांडायला सुरुवात केली. तिला समजले की, भारतात रस्त्यावर कोळशाचा वापर करून इस्त्री करणारे जवळपास १ कोटी लोक आहेत. जर प्रत्येकाने रोज पाच किलो कोळसा वापरला, तर किती भयंकर परिस्थिती निर्माण होत असेल? याचा अर्थ प्रचंड जंगलतोड, भयानक प्रदूषण आणि त्या धुरामुळे इस्त्रीवाल्यांना होणारे फुफ्फुसांचे गंभीर आजार. या धक्कादायक गणिताने विनिशाला हादरवून सोडले. तिने थेट या मोठ्या समस्येवर तोडगा काढण्याचा ठाम निश्चय केला.

पुढचे सहा महिने तिने स्वतःला अभ्यासात पूर्णपणे झोकून दिले. सोलर पॅनल्स कसे काम करतात, हे समजून घेण्यासाठी तिने चक्क कॉलेजस्तरावरील भौतिकशास्त्राची पुस्तके वाचून काढली. अभियांत्रिकीची तत्त्वे अभ्यासली. अभियंत्यांच्या मदतीने ‘आयर्न मॅक्स’ हे डिझाईन तयार केले. ही एक सौरऊर्जेवर चालणारी फिरती इस्त्रीची गाडी होती. ज्यात कोळशाची जागा सूर्याच्या स्वच्छ ऊर्जेने घेतली. ५ तासांच्या सूर्यप्रकाशात ६ तास चालणाऱ्या या गाडीला तिने मोबाईल चार्जिंग पोर्टही बसवले. यामुळे अतिरिक्त सोय निर्माण होऊन इस्त्रीवाल्यांचे मासिक उत्पन्न १२ हजारांवरून २० हजारांपर्यंत वाढण्याची क्षमता निर्माण झाली आणि वर्षाला तब्बल १.८ टन कार्बन उत्सर्जन टळू लागले.

तिच्या या प्रवासात पेशाने व्यावसायिक सल्लागार असलेले वडील आणि शिक्षिका असलेल्या आईने सर्वात मोठा आधार दिला. त्यांनी तिच्या कुतूहलाला चुकीची दिशा देण्याऐवजी, तिला हवी ती पुस्तके आणून दिली आणि तिची विज्ञानाची आवड खऱ्या अर्थाने जोपासली. तिच्या या अद्भु‌त शोधाने तिला ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम इग्नाईट पुरस्कार’ आणि ‘चिल्ड्रन्स क्लायमेट प्राईझ’ मिळवून दिले. एवढेच नाही, तर २०२१ च्या ‘अर्थशॉट प्राईझ’साठी ती जगातील सर्वात तरुण अंतिम स्पर्धक ठरली; पण खरा इतिहास रचला गेला तो २ नोव्हेंबर २०२१ रोजी, स्कॉटलंडमधील ‘COP26’ च्या जागतिक मंचावर! प्रिन्स विल्यम यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांसमोर विनिशा आत्मविश्वासाने म्हणाली, ‘‘मला कृती करायची आहे. मी केवळ भारतातील एक मुलगी नाही, तर मी पृथ्वीची कन्या आहे!’’ तिच्या या भाषणाने संपूर्ण सभागृह निःशब्द झाले आणि सर्व नेत्यांनी उभे राहून तिला मानवंदना दिली.

विनिशा जन्मतःच जीनियस नव्हती; ती फक्त एक जिज्ञासू मुलगी होती, जिने जगावेगळा विचार केला. रस्त्यावरील एक विक्रेता, कोळशाचा ढिगारा आणि एका लहान मुलीने विचारलेला ‘असं का?’ हा प्रश्न. जग बदलण्यासाठी कधीकधी हे एक कुतूहलच पुरेसे असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT