भारतीय आणि प्रामुख्याने मराठी रंगभूमीला आधुनिक जाणिवांची समृद्ध देणगी देणाऱ्या ज्येष्ठ दिग्दर्शिका आणि अभिनेत्री विजया मेहता यांची एक्झिट साहित्य-कला आणि रंगभूमीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला चटका लावणारी आहे. विजया मेहता हे मराठी रंगभूमीचं प्रतिभाशाली विद्यापीठ होतं. मराठी रंगभूमी कसदार अभिनयानं गाजवणाऱ्या विविध व्यक्तिरेखा अजरामर करणाऱ्या अनेक सशक्त कलावंतांची जडणघडण या विद्यापीठात झाली. विजयाताईंनी या कलाकारांना दिलेलं अभिनयाचं बाळकडू त्यांच्यासाठी समुद्रमंथनातून मिळालेल्या अमृतासम ठरलं. काही व्यक्तिमत्त्वांची उंची पुरस्कार, मानसन्मान यांच्या कक्षेपेक्षा, निकषांपेक्षा कितीतरी व्यापक आणि विस्तृत असते. त्यांचं कार्य मोजण्यासाठी पठडीतील फुटपट्ट्या थिट्या ठरतात. विजया मेहता यापैकी एक होत्या. मराठी नाट्यविश्वात त्यांना अतिशय मायेनं आणि आदरानं 'बाई' म्हटलं जायचं. त्यांच्या जडणघडणीची सुरुवात मुंबईत झाली.
१९५३ मध्ये मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये शिकत असताना विजयाबाईंनी शेक्सपिअरच्या ’ऑथेल्लो’ या नाटकात साकारलेली ‘डेस्डेमोना’ ही भूमिका पाहून प्रसिद्ध रंगकर्मी इब्राहिम अल्काझी प्रचंड प्रभावित झाले. त्यांनी विजयाबाईंना मुंबईतील प्रसिद्ध ’थिएटर ग्रुप’मध्ये सामील होऊन अधिकृत प्रशिक्षण घेण्याचे आमंत्रण दिले. हा क्षण विजयाबाईंच्या आयुष्याला आणि पर्यायाने संपूर्ण भारतीय रंगभूमीला नवी दिशा देणारा ठरला. अल्काझी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दोन वर्षे रंगभूमीचे धडे गिरवले. त्यानंतर त्या पुन्हा मराठी व्यावसायिक आणि प्रायोगिक रंगभूमीकडे वळल्या; पण त्यांच्या मनातील नव्या, आधुनिक आणि प्रयोगशील संकल्पनांना मूर्त रूप देऊ शकेल असा दिग्दर्शक त्याकाळी नव्हता. मग, त्यांनी स्वतःच नाटकांच्या दिग्दर्शनाची धुरा हाती घेण्याचा निर्णय घेतला आणि मराठी नाटकांचा इतिहासच बदलला. १९५० च्या दशकात मराठी रंगभूमीवर प्रामुख्याने संगीत नाटके किंवा ठरावीक साच्यातील कौटुंबिक आणि जुन्या धाटणीची व्यावसायिक नाटके होत. वर्षातून एखाद-दुसरा नाट्यमहोत्सव सोडल्यास सातत्याने दर्जेदार प्रयोग होणारी हक्काची रंगभूमी उपलब्ध नव्हती.
पाश्चात्त्य जगतात नवनवीन प्रयोग होत होते. अशा काळात काहीतरी नवीन घडवण्याच्या ऊर्जेने आणि महाविद्यालयीन तरुणांच्या उत्साहातून 'रंगायन'चा जन्म झाला. त्यांनी तत्कालीन कवी आणि कादंबरीकारांना नाटके लिहिण्यासाठी प्रवृत्त केले. विजय तेंडुलकर, श्री. ना. पेंडसे, खानोलकर, अच्युत वझे आणि महेश एलकुंचवार यांसारख्या लेखकांनी या चळवळीत मोलाचे योगदान दिले. 'रंगायन'ने मराठी रंगभूमीला किमान ३० ते ४० दिग्गज अभिनेते, नवे नाटककार, अनोखी अभिनय शैली आणि एक उत्तम दृश्यभान दिले. मराठी नाटकाला व्यावसायिक चौकटीतून बाहेर काढून जागतिक वैचारिक भान दिले. विजयाबाईंच्या नेतृत्वाखाली 'रंगायन'ने जागतिक रंगभूमीवरील प्रयोगांचे मराठीकरण केले. 'बॅरिस्टर', 'शाकुंतलम', 'हमीदाबाईची कोठी' आणि 'मदर' यांसारख्या नाटकांतून त्यांनी दिग्दर्शनाचा एक वेगळाच वस्तुपाठ घालून दिला. १९६० च्या दशकाच्या अखेरीस संस्थेतील अंतर्गत मतभेद आणि वैचारिक मतप्रवाहांमुळे 'रंगायन'मध्ये फूट पडली आणि विजयाबाई व्यावसायिक आणि आंतरराष्ट्रीय प्रयोगांकडे वळल्या. 'रंगायन' ही एक विचार देणारी चळवळ होती; पण विजयाबाई म्हणत की, प्रत्येक जिवंत चळवळीला एक जन्म असतो, तिचा एक सर्वोच्च सुवर्णकाळ असतो आणि तिची गरज संपल्यावर तिचा अंतही ठरलेला असतो. त्यानुसार 'रंगायन'चा प्रवास घडला.
प्रयोगशीलता हे विजया मेहता यांचे समर्पक ओळखवैशिष्ट्य ठरेल. सातत्याने प्रेक्षकांना नवं, कसदार देण्यासाठीचा त्यांचा आग्रह विलक्षण होता. शबाना आझमी, नसिरुद्दीन शाह, तन्वी आझमी, नीना कुळकर्णी, नाना पाटेकर, भारती आचरेकर यांसारख्या दिग्गज कलाकारांमधील अभिनयगुण अचूकपणे ओळखून बाईंनी त्यांच्याकडून सर्वोत्तम काम करून घेतले. ‘बॅरिस्टर’ नाटकात कादंबरी वाचताना एका जागेवर बसून अर्धा तास मुंग्यांचे चालणे पाहणारा बॅरिस्टर दाखवण्यासाठी त्यांनी रंगमंचावर ’रॉकिंग चेअर’चा वापर केला. त्या खुर्चीची संथ गती प्रेक्षकाला वेगळ्या मनःस्थितीत घेऊन जाते. जर्मन नाटककार बर्टोल्ट ब्रेख्त यांच्या 'द गुड वुमन ऑफ सेझुआन' या नाटकावर आधारित 'देवाजीने करुणा केली' हा प्रयोग लोकप्रिय झाला, तरी विजयाबाई त्यावर समाधानी नव्हत्या. ब्रेख्त यांच्या संकल्पना मराठी लोककला आणि आधुनिक संदर्भाशी जोडताना त्यांना अपयश आल्यासारखे वाटत होते. यातूनच पुढे त्यांनी ब्रेख्त यांच्याच 'द कॉकेशियन चॉक सर्कल' या नाटकाचे 'अजब न्याय वर्तुळाचा' हे मराठी रूपांतर दिग्दर्शित केले. हा प्रयोग भारतीय नाट्यसृष्टीतील मैलाचा दगड ठरला. हे नाटक घेऊन त्या बर्लिनला गेल्या, तेव्हा तिथल्या बर्टोल्ट ब्रेख्त यांच्या मूळ थिएटरमधील जर्मन अभिनेतेही स्तीमित झाले. त्यांनी विजयाबाईंना ही रचना समजून घेण्यासाठी आणि त्यांच्यासोबत काम करण्यासाठी पाचारण केले, ज्यातून त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाची सुरुवात झाली.
विजयाबाईंनी दिग्दर्शित केलेले 'हमीदाबाईची कोठी' हे नाटक आणि त्याचे टेलिप्ले स्वरूप कमालीचे गाजले. शास्त्रीय संगीताच्या रेकॉर्डिंगच्या आगमनामुळे कोठा संस्कृतीचा झालेला ऱ्हास त्यांनी यात अत्यंत प्रभावीपणे मांडला. पारशी समुदायावर आधारित त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'पेस्तनजी' या चित्रपटात शबाना आझमी आणि नसिरुद्दीन शाह यांच्या मुख्य भूमिका होत्या. 'रावसाहेब' हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट १९८६ मध्ये प्रसिद्ध झाला. हा चित्रपट आणि त्यानंतरचा 'स्मृतिचित्रे' हे मनोरंजनविश्वात माईलस्टोन ठरले. गोविंद निहलानी यांच्या 'पार्टी' आणि श्याम बेनेगल यांच्या 'कलियुग' या चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयानेही प्रेक्षकांवर छाप पाडली.
विजयाबाईंनी मराठी रंगभूमीला नवी संवेदनशीलता, आधुनिक नेपथ्य रचना आणि संहितेची बांधणी दिली; पण हे सर्व करत असताना त्या कधीही केवळ नाटकापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत. एक सामान्य स्त्री, आई, पत्नी आणि सून या कौटुंबिक जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या. प्रसिद्धी, लोकप्रियतेचा लवलेशही त्यांच्या वागण्या-बोलण्यात दिसला नाही. एखादा प्रयोग यशस्वी झाला की, पुढे काय, या नव्या शोधात राहणे हीच त्यांची वृत्ती होती आणि हाच अखंड शोध मराठी नाट्यसृष्टीला समृद्ध करणारा ठरला. बाईंनी 'नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस्'च्या कार्यकारी संचालक म्हणूनही जबाबदारी सांभाळली. त्यांच्या सक्रिय उपस्थितीने या संस्थेच्या इतिहासात सुवर्णपर्व निर्माण केले. विजयाबाई या मराठी नाट्यसृष्टीत सतत तेवत राहून रंगभूमी प्रकाशमान करणारी समई होत्या. दैनिक 'पुढारी' परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!