संपादकीय

Victims of Munirshahi: मुनीरशाहीचे बळी

पुढारी वृत्तसेवा

भारताचे शेजारी असलेले तीन देश हे एकापाठोपाठ एक गर्तेत चालले आहेत. नेपाळमध्ये उठाव होऊन, त्यात तेथील राजवट खाक झाली. बांगला देशात 2024 मध्ये झालेल्या विद्यार्थी उठावातील एक प्रमुख नेता मोतालेब सिकदर याची सोमवारी काही अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हत्या केली. त्यापूर्वी शेख हसीना सरकारविरोधात बंड करणाऱ्या शरीफ उस्मान हादी यालाही मारण्यात आले होते.

एका हिंदू व्यक्तीच्या मॉब लिंचिंगनंतर तिथे ठिकठिकाणी पेटवापेटवी सुरू झाली. तिकडे पाकिस्तानात माजी पंतप्रधान इमान खान हे ऑगस्ट 2023 पासून तुरुंगात आहेत. त्यांनी समर्थकांना देशव्यापी आंदोलनासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. तोशाखाना भष्टाचार प्रकरणात पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या (एफआयए) विशेष न्यायालयाने इमान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना प्रत्येकी 17 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. इमान यांचे राजकारण पूर्णतः संपुष्टात आणण्याचे तेथील लष्करशहा असीम मुनीर यांनी ठरवलेले दिसते. यापूर्वी जानेवारी 2025 मध्ये अल कादीर ट्रस्ट प्रकरणात इमान यांना 14 वर्षांची आणि बुशरा यांना सात वर्षांची शिक्षा सुनावली होती.

वास्तविक, एप्रिल 2024 मध्ये तोशाखाना प्रकरणात इस्लामाबाद उच्च न्यायालयाने शिक्षा देण्यास बंदी घातली होती. आता इमान यांच्या वकिलांनी या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याचे ठरवले आहे. तोशाखाना म्हणजे मराठीत कोषागार किंवा भांडार. हा पाकिस्तान सरकारचा विभाग. मंत्री, खासदार, अधिकारी किंवा इतर सरकारी पदावरील व्यक्तींना मिळालेल्या महागड्या भेटवस्तूंची जबाबदारी या विभागाकडे असते. यात प्रामुख्याने इतर देशांतील पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या भेटवस्तूंचा समावेश असतो. कायद्यानुसार कोणाला अशी भेटवस्तू मिळाली, तर ती तोशाखानात जमा करणे गरजेचे असते.

पंतप्रधान आणि राष्ट्रपती 30 हजार पाकिस्तानी रुपयांपेक्षा कमी किमतीच्या भेटवस्तू स्वतःसाठी ठेवू शकतात; पण त्यापेक्षा जास्त किमतीच्या वस्तू या तोशाखानात जमा कराव्या लागतात. यात एक पळवाटदेखील आहे. एखाद्या पदाधिकाऱ्याला मिळालेली किमती भेटवस्तू स्वतःसाठी ठेवायची असेल, तर त्या वस्तूच्या किमतीच्या काही टक्के पैसे मोजून तो ही वस्तू स्वतःसाठी ठेवू शकतो. गेल्या 21 वर्षांत सर्वच पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी काही ना काही भेटवस्तू अशी किंमत मोजून स्वतःसाठी विकत घेतल्या. यात साध्या वस्तूंपासून ते लॅपटॉप, आयफोन, सिगार बॉक्स, दागिने, महागडी घड्याळे, गाड्या आणि रायफल व बंदुकांसारख्या शस्त्रास्त्रांचाही समावेश आहे; परंतु इमान यांनी भेटवस्तू मिळालेल्या घड्याळ वगैरे वस्तूंची माहिती तोशाखानाला कळवली नाही आणि पाकिस्तान इन्फर्मेशन कौन्सिलने विचारणा केल्यावरही त्यांनी ही माहिती लपवली, असे आरोप त्यांच्यावर होते. हे आरोप अत्यंत किरकोळ असून, त्याबद्दल इतकी कठोर शिक्षा कोणत्याही देशात दिली गेलेली नसेल.

पाक लष्करशहा भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले असूनही त्यांना यापूर्वी कधीही शिक्षा झालेली नाही. या विरोधात इमान हे अपील करणार असले, तरीदेखील त्याचा निर्णय त्यांच्या बाजूने लागण्याची शक्यता कमी आहे. तेथील शहाबाझ शरीफ सरकार त्याचप्रमाणे न्यायव्यवस्था लष्कराच्या इशाऱ्यानुसार काम करते. तेथील तुरुंगदेखील सुरक्षित नाहीत. इमान यांचा तुरुंगात मानसिक छळ केला जात आहे. त्यांना पिण्यासाठी गढूळ पाणी दिले जात असल्याचा दावा त्यांच्या सुलेमान आणि कासिम या मुलांनी केला आहे. हे दोघे इमान व त्यांची पहिली पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांची मुले आहेत. जेमिमा यांनी काही दिवसांपूर्वीच एलॉन मस्क यांच्यासाठी एक पोस्ट केली होती. त्यात त्यांनी पाकिस्तानमध्ये त्यांचे ट्विट जास्त लोकांपर्यंत पोहोचत नसल्याचे म्हटले होते. आम्ही वडिलांना पुन्हा पाहू शकू की नाही, याबाबत शंका असल्याची त्यांच्या मुलांची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

इमान हे सध्या रावळपिंडीतील आदियाला तुरुंगातील अंधारकोठडीत आहेत. त्यांच्या आजूबाजूला असलेले कैदी हिपेटायटिसने दगावत आहेत. इमान यांना भेटू दिले जात नसल्याने त्यांच्या बहिणींनी काही दिवसांपूर्वीच जेलबाहेर आंदोलन केले होते आणि त्यात इमान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यावेळी या बहिणींना पोलिसांकडून धक्काबुक्की झाली होती. मुनीर हे इमान व त्यांच्या पक्षाला आणि समर्थकांना संपवण्याच्या मागे लागले आहेत. इमान यांच्या सत्ताकाळात आयएसआयचे प्रमुख असलेले फैझ हमीद हे इमान यांचे कट्टर समर्थक.

इमान यांची 2022 मध्ये सत्ता गेल्यानंतर हमीद यांनी निवृत्ती स्वीकारली; परंतु आता त्यांनाही पाकच्या लष्करी न्यायालयाने 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तानी लष्कराच्या दृष्टीने अतिमहत्त्वाच्या असलेल्या संस्थेच्या प्रमुखालाच अटक करून सजा ठोठावण्याची ही अपवादात्मक घटना आहे. विशेष म्हणजे, या सर्व खटल्याची माहिती दडवून ठेवली होती आणि शिक्षा सुनावल्यानंतरच ती उघड करण्यात आली. हमीद यांच्या विरोधातील कोर्ट मार्शलची कारवाई दि. 12 ऑगस्ट 2024 रोजी सुरू झाली आणि ती 15 महिने चालली. राजकीय हस्तक्षेप, राष्ट्रीय सुरक्षेसंबंधीची गुपिते फोडणे, अधिकारांचा गैरवापर आणि नागरिकांना हानी पोहोचवणे असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले.

दि. 9 मे 2023 रोजी इमान खान यांच्या अटकेनंतर उसळलेल्या आंदोलनास चिथावणी देण्याचा हमीद यांच्यावर आरोप आहे. त्यावेळी लष्करी आस्थापनांनाही लक्ष्य केले गेले होते. लष्कराच्या आशीर्वादानेच इमान सत्तेवर आले होते; परंतु लष्करी वर्चस्व सहन न झाल्यामुळे त्यांच्यातील मतभेद वाढले. भारताबरोबर सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा इमान यांनी व्यक्त केली होती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसाही केली होती. भारतद्वेष्ट्या पाक लष्कराला हे रुचणारे नव्हते. त्यामुळे इमान आणि त्यांच्या निकटवर्तीयांचा ‌‘परफेक्ट कार्यक्रम‌’ केला जात आहे. पीटीआय हा पक्ष देशातील सर्वात लोकप्रिय असून तो संपुष्टात आणण्याचा मुनीर यांचा डाव आहे. एकूण पाकिस्तानची घसरण काही थांबायला तयार नाही. जनतेने लष्कराविरुद्ध उठाव केला, तरच काही बदल होऊ शकेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT