डॉ. व्यंकटराव घोरपडे
पशुवैद्यकांचे अन्नसुरक्षा, सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरण संरक्षणातील योगदान महत्त्वपूर्ण आहे. आज जागतिक पशुवैद्यक दिन. त्यानिमित्त...
एप्रिल महिन्याच्या शेवटचा शनिवार हा ‘जागतिक पशुवैद्यक दिन’ म्हणून जगभरात साजरा केला जातो. जागतिक पशुवैद्यक संघटना या दिवसाचे औचित्य साधून एक संकल्पना किंवा मध्यवर्ती कल्पना जाहीर करत असते. यावर्षीची ‘थीम पशुवैद्यक - अन्न आणि आरोग्याचे रक्षक’ अशी आहे. हा एक खरं तर महत्त्वाचा संदेश आहे. पशुवैद्यक हे फक्त प्राण्यावर फक्त उपचार करणारे डॉक्टर नाहीत, तर ते मानवी आरोग्य, अन्नसुरक्षा व पर्यावरण संरक्षण यासह जैवसुरक्षा यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात.
प्राणीजन्य उत्पादने दूध, अंडी व मांस हे प्रथिनांचे मुख्य स्रोत आहेत. या सर्वांचे उत्पादन आणि गुणवत्ता ही पशू आरोग्यावर अवलंबून असते. देशातील पशू आरोग्य चांगले राखण्यासाठी उपचार, लसीकरण, पशू पोषण व्यवस्थापन, रोग नियंत्रण याद्वारे पशुवैद्यक हे नियमित आघाडीवर असतात. या सर्व प्रक्रियेतून दर्जेदार आणि सुरक्षित प्राणीजन्य उत्पादने सर्व जनतेपर्यंत पोहोचवत असतात. अशा अन्नाचे ते पडद्यामागचे खरे संरक्षक आहेत.
आज मानवामध्ये होणारे जवळजवळ 60 टक्के संसर्गजन्य रोग हे प्राण्यांपासून होत असतात. त्यांना आपण प्राणीजन्य आजार असे संबोधतो. ते जनावरांपासून मानवामध्ये संक्रमित होत असतात. जनावरात अशा रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास त्यांचे वेळेत निदान करणे, त्यावर नियंत्रण मिळवणे हे पशुवैद्यकाचे प्रमुख कर्तव्य आहे. अशा आजारांचा मोठा धोका पत्करून हे रोग नियंत्रणाचे काम पशुवैद्यक करत असतात. अनेक वेळा अशा रोगांना अनेक पशुवैद्यक बळीदेखील पडलेले आहेत. या सर्व बाबी विचारात घेऊन ‘वन हेल्थ’ ही संकल्पना जगभरात अस्तित्वात आली. प्राण्यांचा आजार हा फक्त प्राण्यांचा प्रश्न नाही, तो मानवी आरोग्याशी संबंधित ज्वलंत असा विषय आहे. रेबिज, स्वाईन फ्लू, मंकी फिवर, बर्ड फ्लू या अशा आजारांची नावे माहिती असतात. अशा आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पशुवैद्यक झटत असतात. वन हेल्थ संकल्पनेत आता पर्यावरण तज्ज्ञांचीदेखील मदत घेऊन प्राणिजन्य रोग नियंत्रण प्रभावी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरलॉजी या संस्था एकत्र येऊन ‘वन हेल्थ’ या संकल्पनेवर एक प्रयोगशाळा सध्या नागपूर येथे सुरू झाली आहे. त्यामुळे येणार्या काळात देशातील जैवविविधता आणि लोकसंख्या विचारात घेतली, तर प्राधान्याने प्राणिजन्य आजाराचा मुकाबला पशुवैद्यकांच्या वतीने करावा लागणार आहे, यात शंका नाही.
पशुवैद्यक केवळ औषध देणे, उपचार करणे इतकेच न करता पशुपालकांना नियमित मार्गदर्शन करत असतात. जनावरांच्या संगोपनातील बारकावे, व्यवस्थापन, आहार व्यवस्थापन, प्रतिबंधात्मक उपचार, उपाय याबाबतीत पशुपालकांत जागृती करत असतात. पशुसंवर्धन विभाग, पशुवैद्यकीय दवाखाने हे नियमित विस्तार कार्य, प्रबोधन याद्वारे प्रशिक्षित करत असल्यामुळे पशुपालकाच्या उत्पन्नात भर पडते. याद्वारे गुणवत्तापूर्ण उत्पादने पशुपालक घेतात. एकूणच पशुधनाच्या आरोग्यासह मानवी आरोग्यदेखील अबाधित ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. आजार, संसर्गजन्य रोगांबाबत पूर्ण सूचना मिळवण्यासाठी संगणक प्रणालीचा वापर वाढत आहे. अनेक आनुवंशिक रोगदेखील वेळेत ओळखण्याचे तंत्रज्ञान विकसित होत आहे. अनेक पशुपालक त्याचा वापरदेखील करत आहेत.
अन्नसुरक्षा, सार्वजनिक आरोग्यासमोरील आव्हाने वाढत आहेत. प्रतिजैवकांचा अतिरेकी वापर, नवनवीन संसर्गजन्य आजार, हवामान बदलामुळे पशुजन्य उत्पादन वाढीसाठी दबाव वाढत आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय सेवेचे महत्त्व वाढत जाणार आहे. अशा या सर्व स्थितीत आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेद्वारे पशुवैद्यक हे समाजासाठी महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. सुरक्षित अन्न, निरोगी पशुधन आणि सद़ृढ समाज यासाठी पशुवैद्यकीय सेवेचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. कोव्हिडनंतर पशुवैद्यकांचे महत्त्व सर्व समाजाला पटू लागले आहे. त्यासाठी यानिमित्ताने पशुवैद्यकाच्या योगदानाची कदर समाजाने निश्चित करावी. समाज म्हणून त्यांना पाठबळ द्यावे.(लेखक पशुसंवर्धन विभागाचे निवृत्त सहायक आयुक्त आहेत)