सतीश डोंगरे
वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे हे प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेचे अभ्यासक, प्रेरणादायी वक्ते आणि शास्त्रसंवर्धनाची धुरा सांभाळणारे एक विद्वान व्यक्तिमत्त्व आहे. शांत, सौम्य, पण तितकीच तेजस्वी व्यक्तिरेखा असलेल्या देवव्रत यांनी वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी आपल्यातील अगाध बुद्धिमत्तेच्या जोरावर ‘वेदमूर्ती’ ही बहुमूल्य उपाधी प्राप्त केली.
ज्ञानाची साधना आणि समाजप्रबोधन हे त्यांचे जीवनध्येय असल्याचे त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येते. लहानपणापासूनच शास्त्रांबद्दलची ओढ, संस्कृत भाषेबद्दलचा प्रचंड आदर आणि अध्यात्माबद्दलची समज यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळी उजळणी मिळाली. देवव्रत यांना वैदिक अध्ययनाचा वारसा वडील महेश रेखे आणि आई स्व. मधुरा यांच्याकडून मिळाला. त्यांच्या आई मधुरा या मोठ्या वैदिक घराण्यातील होत्या. त्यांचे आजोबा शिवराम धायगुडे शास्त्री आणि दोन्ही मामा प्रकांड ऋग्वेदाचे घनपाटी आहेत.
वास्तविक, वडील महेश रेखे यांच्या घराण्यात वेदाची मोठी परंपरा नव्हती. मात्र, त्यांनी वेदाप्रति असलेली निष्ठा आपल्या अध्ययनातून दाखवून दिली. त्यासाठी त्यांनी प्रारंभी नाशिक येथे गोडसे गुरुजींकडे वेदाचे अध्ययन केले. त्यानंतर नाशिकच्या वेदमंदिरातील पाठशाळा बंद पडल्याने त्यांनी आळंदी येथील विश्वनाथ जोशी जे गोडसे गुरुजींचेच शिष्य होते, त्यांच्याकडे वेदाचे अध्ययन केले. त्यानंतर 23 वर्षांनी महेश रेखे यांनी वाराणसी येथे एकाकी घनपारायण करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. पुढे महेश रेखे यांचा मधुरा यांच्याशी विवाह झाला. त्यांना देवव्रत हे अपत्य प्राप्त झाले. देवव्रतचे मौजीबंधन करून वडील महेश रेखे यांनी घरीच त्यांचे अध्ययन परिपूर्ण केले. देवव्रत यांच्यातील विलक्षण बुद्धिमत्तेमुळे त्यांना वेदाचे अध्ययन सहजतेने पूर्ण करता आले.
वेदात संहिता शिकणे अत्यंत काठिण्य बाब आहे. मात्र, देवव्रत यांनी संहितेबरोबरच पद, क्रम, जटा, घन आणि दंडक्रम पारायण याचे सहजतेने अध्ययन केले. 2 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या काळात वाराणसी येथे हे दंडक्रम पारायण पार पडले. देवव्रत यांचे केवळ प्राथमिक शिक्षण झाले आहे. मात्र, वडील महेश रेखे यांच्याकडून त्यांनी वेदाचे अध्ययन सहजगत्या परिपूर्ण करून वेद विद्यापीठ असलेल्या काशी येथील वल्लभराम सांगवेद विद्यालयात दंडक्रम पारायण करून इतिहास घडविला.
देवव्रत यांची बुद्धिमत्ता इतकी विलक्षण आहे की, ते वेदातील पदे उलटेदेखील सहजगत्या म्हणतात. वेदमूर्ती देवव्रत रेखे हे फक्त विद्वान नाहीत तर मार्गदर्शक, शिक्षक आणि प्रेरणास्थान म्हणून उभे असलेले व्यक्तिमत्त्व आहे. परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत त्यांनी शास्त्राला समाजहितासाठी उपयोगी बनवले आहे. ते एक अभ्यासू, नम—, तत्त्वनिष्ठा आणि सेवाभाव यांचे अद्वितीय उदाहरण आहेत. या युवा वेदिक विद्वानामुळे राज्याचीही मान उंचावली आहे.