Vadim Lietonov 
संपादकीय

Vadim Lietonov: बंकरमध्ये राहून शत्रूला जिंकले

ज्या सैनिकाला त्याच्या युनिटने शहीद घोषित केले होते, तोच सैनिक तब्बल दोन आठवड्यांनी एका रशियन कैद्याला सोबत घेऊन सुखरूप परतला

पुढारी वृत्तसेवा
सचिन पाटील

युद्धभूमीवर शत्रू समोर दिसला की, समोरच्या सैनिकाचे बोट थेट बंदुकीच्या ट्रिगरवर जाते; पण युक्रेनच्या रणांगणावर एक अशी घटना घडली, जी कोणत्याही चित्रपटालाही मागे टाकेल. युक्रेनमधील ओडेसा शहराचा 34 वर्षीय कॉर्पोरल (छोट्या सैन्याच्या तुकडीचा प्रमुख) वदिम लिएतोनोव याचा अनुभव असाच काहीसा आहे. ज्या सैनिकाला त्याच्या युनिटने शहीद घोषित केले होते, तोच सैनिक तब्बल दोन आठवड्यांनी एका रशियन कैद्याला सोबत घेऊन सुखरूप परतला. रशियन ड्रोनने वदिम यांच्या तळावर भीषण हल्ला केला. त्यामध्ये आपला सहकारी साशा याचा मृत्यू डोळ्यांदेखत पाहिल्यानंतर वदिम आपला जीव वाचवण्यासाठी अनवाणी जंगलाच्या दिशेने धावला. समोर एक बंकर दिसला. आपल्याच सैनिकांचे ठिकाण समजून तो आत शिरला; पण समोर रशियन गणवेशातील सैनिक रायफल रोखून उभा होता.

पुढील दोन आठवडे वदिम त्या रशियन सैनिक निकिताच्या ताब्यात होता. निकिता हा एक गुन्हेगार होता, ज्याला तुरुंगातून थेट युद्धभूमीवर पाठवण्यात आले होते. तो अंमली पदार्थांच्या आहारी गेलेला आणि प्रचंड मानसिक अस्थिरता असलेला तरुण होता. वदिम नि:शस्त्र असल्याचे पाहून निकिताने गोळी न झाडण्याचा निर्णय घेतला.

वदिमने मानसशास्त्राच्या जोरावर निकिताचा विश्वास संपादन केला. निकिताला वाटायचे की, युक्रेनियन सैनिक अमली पदार्थ वेडे आहेत. वदिमने स्वतःला त्याच्यासमोर मूर्ख भासवले जेणेकरून निकिताच्या मनातली भीती कमी होईल. वदिम त्याच्याबरोबर गोड बोलून राहू लागला. दोघांकडेही अन्न आणि पाणी संपत आले होते. वदिमच्या पायाचे बोट गँगरीनमुळे काळे पडले होते. निकिता कधी वदिमच्या कपाळाला बंदूक लावून त्याला मारायची धमकी द्यायचा, तर कधी रशियन सैन्याच्या दुरवस्थेबद्दल रडायचा. दुसरीकडे रशियन आणि युक्रेनियन अशा दोन्ही बाजूंकडून भीषण गोळीबार सुरू होता.

त्याने निकिताला युक्रेनमधील युद्धकैद्यांच्या चांगल्या वागणुकीबद्दल आणि जेवणाबद्दल सांगायला सुरुवात केली. अनेकवेळा चर्चा झाल्यावर अखेर निकिताचे मन वळले. दरम्यान, युक्रेनियन सैन्याने त्या भागावर पुन्हा ताबा मिळवला. एका सकाळी, जेव्हा युक्रेनियन ड्रोन वरून फिरत होते, तेव्हा वदिमने गुडघ्यावर बसून आपली ओळख पटवून दिली. सुरुवातीला युक्रेनियन सैन्याला वाटले की, ते दोघेही रशियन आहेत; पण वदिमने आपल्या हातातील आपल्या नावाचा निकनेम असलेला बॅज दाखवला आणि स्वतःच्या सैन्याला ओळख पटवून दिली.

अखेर युक्रेनियन सैन्याचे एक चिलखती वाहन आले आणि वदिमने निकिताला आपल्या सोबत येण्यास राजी केले. ज्याने वदिमला कैद केले होते, तो निकिता आता स्वतः युक्रेनचा कैदी म्हणून शरण आला होता. वदिम सध्या ओडेसामध्ये पुनर्वसन केंद्रात उपचार घेत आहे. त्याचे एक बोट कापले गेले आहे. तो आपल्या 5 वर्षांच्या मुलाला आणि पत्नीला भेटू शकला, हाच त्याच्यासाठी मोठा चमत्कार आहे. सध्या तो कुबड्यांच्या साहाय्याने चालत आहे. निकिताला युक्रेनच्या सुरक्षा दलाने ताब्यात घेतले असून, भविष्यात कैद्यांच्या अदलाबदलीसाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT