Uttarkashi Cloudburst  (Pudhari File Photo)
संपादकीय

Uttarakhand Cloudburst | अस्मानी संकट!

उत्तराखंडमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे उत्तरकाशीतील गंगोत्रीच्या मार्गावरील धराली गाव वाहून गेले.

पुढारी वृत्तसेवा

उत्तराखंडमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे उत्तरकाशीतील गंगोत्रीच्या मार्गावरील धराली गाव वाहून गेले. चार जणांचा मृत्यू झाला असून, 50 पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत. या राज्यावर गेल्या काही वर्षांत वारंवार संकटे येत असून, दोन वर्षांपूर्वी जोशी मठ तीर्थक्षेत्राची प्रचंड हानी झाली होती. खीरगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या आताच्या ढगफुटीमुळे अचानक पूर येऊन अनेक घरे वाहून गेली. धराली हा चार धामांपैकी एक असलेल्या गंगोत्रीच्या मार्गावरील एक महत्त्वाचा टप्पा. तेथे अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि घरगुती निवासव्यवस्था आहे. पर्यटनावर अवलंबून असलेले हे स्थळ ढगफुटीत पुरते उद्ध्वस्त झाले. या विध्वंसाचे द़ृश्य भीतीदायक आणि धडकी भरवणारे होते. गंगोत्रीच्या मार्गावर जागोजागी पावसामुळे दगड-माती वाहून आल्याने त्याचे ढिगारे रस्त्यावर साचले. रस्ते मार्ग ठप्प झाले. अनेक भागांत मदत व बचाव पथकेच अडकून पडली. हर्षिल भागात हेलिपॅड वाहून गेले. लष्कराची छावणीही पाण्याखाली गेली. लष्कराचे 8 ते 10 जवान बेपत्ता असतानाही अन्य जवान बचावकार्य करण्यास सरसावले आहेत. निसर्गाचे संकट कधी सांगून येत नाही. मंगळवारी दुपारी अनेक लोक घरात विश्रांती घेत असताना ढगफुटीने दगड, पाणी, मातीचे प्रचंड लोट डोंगर दरीतून वेगाने खाली आले. काही कळायच्या आतच इमारती वाहून गेल्या. हे पाणी धरालीच्या दिशेने येत असल्याचे दिसताच दूरच्या ठिकाणी असलेल्या अन्य लोकांना सावध करण्यासाठी स्थानिकांनी इशारे दिले; पण निमिषार्धातच होत्याचे नव्हते झाले. याआधीच्या घटनांचा परामर्ष घेतला असता वारंवार अशा घटना घडल्या आहेत.

केदारनाथमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे 2013 मधील दुर्घटनेत मोठी जीवित आणि वित्तहानी झाली. अनेक गावे व वस्त्या, रस्ते, पूल आणि इमारतींची मोठी हानी झाली. यानंतर केदारनाथची यात्रा काही काळ थांबवली होती. केदारनाथ दुर्घटनेतून सावरायला आणि तेथे पुनर्बांधणी व्हायला बराच काळ लागला. या घटनेच्या आठवणी आजही तेथील लोकांच्या मनात जाग्या आहेत. उत्तराखंडमधील हवामान अचानक बिघडल्यामुळे 15 जून रोजी रुद्रप्रयाग जिल्ह्यात हेलिकॉप्टर कोसळून त्यात महाराष्ट्रातील तिघांचा मृत्यू झाला होता. ते केदारनाथ धाम येथून पर्यटकांना गुप्तकाशी तळावर परत आणत होते. मार्चमध्येच चमोली जिल्ह्यामधील बद्रीनाथ धामजवळ हिमकडा कोसळल्यामुळे 55 कामगार बर्फाच्या ढिगार्‍याखाली अडकले होते. यातील 50 कामगारांना बाहेर काढण्यात यश मिळाले.

7 फेब्रुवारी 2021 रोजी ज्योतिर्मठाच्या तपोवन क्षेत्रातील रैमी गावावर ढगफुटी झाल्याने हाहाकार माजला होता. ऋषीगंगा आणि धौलीगंगा नद्यांना पूर आले होते. या आपत्तीत ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्प आणि तपोवनमधील नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनचा प्रकल्प उद्ध्वस्त झाला होता. पावणेदोन वर्षांपूर्वी उत्तरकाशीत धरासू ते यमुनोत्रीपर्यंत नवा मार्ग उभारला जात होता. त्यावरील सिलक्यारा-बारकोट मार्गाचा काही भाग कोसळला होता. त्यावेळी बोगद्यात 41 कामगार अडकले होते. त्यांची सुटका करण्यास 17 दिवस लागले. हा प्रकल्प बद्रीनाथ, केदारनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री या पवित्र स्थळांना जोडणार्‍या चारधाम महामार्ग प्रकल्पाचा एक भाग आहे. या प्रकल्पाचे काम करणार्‍या कंपनीने आंतरराष्ट्रीय मानकांनुसार काम न केल्यामुळे बोगद्याचा भाग कोसळला. एवढ्या महत्त्वाच्या बोगद्याच्या बांधकामावेळी संकटकालीन मार्ग बनवला नव्हता, हे एक आश्चर्यच होते.

हिमस्खलन ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. त्यात बर्फ, डोंगर आणि मातीचा मोठा भाग वेगाने खाली घसरतो. अशा घटना बर्फ पडतो त्या डोंगराळ भागात होतात. एकाच भूभागावर भरपूर बर्फ साचतो, तेव्हा पावसाचे पाणी आत झिरपते. त्यातून भूभाग गुळगुळीत होतो आणि हिमस्खलनाला वेग येतो. मुळात हिमालय रांगांमधील प्रदेश भूकंपप्रवण असून, पर्वत भुसभुशीत आहे. तेव्हा रस्ते अथवा बोगदे या स्वरूपाची कामे हाती घेताना निसर्गाच्या समतोलास धक्का लावला जात असतो, हे लक्षात घेतले पाहिजे. हिमालयात डोंगर आडवे-उभे कापले जात आहेत. पर्वतरांगा आतून-बाहेरून पोखरल्या जात आहेत. पर्यटन विकासाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर नागरीकरण सुरू आहे. ते करताना पर्यावरणाचा विचार केला न गेल्याने नैसर्गिक प्रवाहांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे सुरू आहेत. त्यासाठी बेसुमार वृक्षतोड आणि एकूणच निसर्गाशी खेळ सुरू आहे, हे सारेच धोकादायक आहेच शिवाय मानवी विनाशास आमंत्रणही ठरते आहे. सिंधू नदीच्या उत्तरेस नंगापर्वतापासून अफगाणिस्तानपर्यंत काराकोरम पर्वताची रांग पसरली आहे. काराकोरममधील श्योक नदीचा प्रवाह एका हिमखंडाने रोखला आहे. यामुळे तेथे छोटे छोटे तलाव बनले आहेत.

पाण्याचा दबाव वाढला, तर तो हिमखंड तुटेल, असा इशारा शास्त्रज्ञांनी काही वर्षांपूर्वीच दिला होता. उत्तरकाशी हे समुद्रसपाटीपासून 800 ते 6,900 मीटर या दरम्यान वसलेले आहे. वर्षभर तेथील मोठा भाग बर्फाच्छादित असतो. या भागात अनेक ठिकाणी हिमनग आहेत. दरवर्षी सरासरी 1,289 मिलिमीटर पाऊस तेथे पडतो. 1969 मध्ये तर तेथे 2436 मि.मी. पाऊस पडला. हवामान बदलामुळे पावसाची तीव्रता वाढली आहे. त्याचा समतोलही बिघडत चालला आहे. हवामानबदलाची चर्चा हा आता केवळ जागतिक परिषदांमधील विषय राहिला नसून, त्याचा प्रत्यक्ष भयावह अनुभवही दिवसेंदिवस येत आहे. देशातील उत्तर व पूर्वेकडील राज्यांत तापमानात विलक्षण वाढ झाली आहेच शिवाय कमाल आणि किमान तापमानातील फरकही वाढतो आहे. तज्ज्ञांचा सल्ला धुडकावून लावून गंगा, भागीरथी, अलकनंदा आदी नद्यांच्या पट्ट्यात जलविद्युत प्रकल्प केंद्रे उभारली. रस्ते मोठे करण्यासाठी डोंगरांमधून बोगदे खणले. यामुळे नैसर्गिक संकटात सर्वजण भरच घालत आहोत. वैज्ञानिकांच्या इशार्‍याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे लोकांच्या जीवांशी खेळणे होय, हे ध्यानात ठेवावे. उत्तरकाशीमधील या ताज्या दुर्घटनेचा हाच अर्थ आहे. हिमालयीन पर्वतरांगांतील विकासाचे दीर्घकालीन नियोजन वेळीच झाले पाहिजे. तेे न केल्यास त्याचे काय, याचा हा इशाराही मानता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT