Use of AI in Banking Sector
एआय आणि बँकिंग Pudhari File Photo
संपादकीय

एआय आणि बँकिंग

बँकिंग क्षेत्रात AI चा वापर

पुढारी वृत्तसेवा
शहाजी शिंदे, संगणकतज्ज्ञ

भारतभेटीच्या वेळी एनवीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सेन हुआंग यांनी भारताच्या क्षमतेबद्दल भाष्य केले. नव्या तंत्रज्ञानाच्या युगात एआयच्या जोरावर भारत मोठी झेप घेण्याची क्षमता राखून आहे, असे हुआंग यांनी मत मांडले. एआयमध्ये तंत्रज्ञानाचे सार्वत्रिकीकरण आणि लोकांना सशक्त करण्याची क्षमता आहे. या माध्यमातून अर्थव्यवस्थेलाही लाभ मिळू शकतात. प्रामुख्याने बँकिंग आणि आर्थिक क्षेत्रात त्याचे सकारात्मक परिणाम दिसू शकतात.

एआयचा उपयोग करत सर्वसामान्यांसाठी बँकिंग क्षेत्रात सुलभता आणता येऊ शकते आणि नवीन संधी निर्माण होऊ शकते; मात्र एखादी बँक एआयचा कितपत वापर करू शकते, यावर त्याचे परिणाम अवलंबून असतील, असेही अहवालात म्हटले आहे. एखाद्या बँकेत त्याच्या व्यवस्थापन मंडळाची व्यवस्था, आकार, आर्थिक स्थिती यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत. याप्रमाणे मोठी मालमत्ता आणि भांडवल तसेच जोखीम उचलण्याची क्षमता असणार्‍या बँका एआयचा स्वीकार करण्यात पुढे असल्याचे दिसून येते. वास्तविक व्यापक आणि अधिक भांडवल असलेल्या बँकांकडे राखीव भांडवल असते आणि या बँका तंत्रज्ञान आणि नव्या प्रकाराने तोडगा काढणार्‍या क्षेत्रात गुंतवणुकीची जोखीम उचलण्याच्या स्थितीत असतात. मालमत्तेचा आकार आणि अधिक स्रोत असलेल्या बँका व्यवस्थेत नावीन्यता आणण्यासाठी आणि एआयसारख्या आधुनिक तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्यास उत्सुक असतात. नवे तंत्रज्ञान आणि डेटा संकलनातून या बँकांना लाभ मिळण्याची शक्यता अधिक राहते. व्यवस्थापकीय मंडळाचा मुद्दा असेल, तर सरकारी बँकांच्या तुलनेत खासगी बँकांत एआयचा स्वीकार करण्याचे प्रमाण अधिक असते. 2015-16 पासून 2022-23 दरम्यान बँकांच्या वार्षिक अहवालाचे विश्लेषण केले, तर खासगी क्षेत्रातील बँकांत एआय संबंधित की वर्डचा वापर हा सहा पटीने अधिक आणि सरकारी बँकांत तीन पट अधिक वाढला आहे. विशेष म्हणजे, मालमत्तेवर मिळणारा परतावा, अडकलेल्या कर्जांची स्थिती आणि किरकोळ कर्जांचे प्रमाण हे एआय स्कोअरच्या आकलनासाठी महत्त्वाचे नाही, असे पत्रात म्हटले आहे. कदाचित सध्या सुरुवात असल्याने त्याचा विचार झालेला नसेल.

भारतीय बँका सातत्याने एआयच्या मदतीने ग्राहकांना चांगल्या रितीने वैयक्तिक अनुभव प्रदान करण्याचा प्रयत्न करत आहेत. उत्पादकतेत सुधारणा आणि व्यवस्थेचा फायदा कसा वाढविता येईल, याचा प्रयत्न करत आहेत. नियामकाच्या अंमलबजावणीसाठीही त्याचा वापर केला जात आहे. बँका डेटा अ‍ॅनालिटिक्स, क्लाऊड कॉम्प्युटिंग आणि आकड्यांच्या मदतीने गैरव्यवहाराचा तपास लावणे तसेच अंदाजाचे विश्लेषणाचे काम करत आहे. मॅकिंजीच्या एका अहवालानुसार, जागतिक बँकिंग व्यवस्थेत एआय तसेच संबंधित तंत्रज्ञानाच्या मदतीने सुमारे एक लाख कोटी डॉलरचे वार्षिक मूल्य निर्मिती होत आहे. एवढेच नाही, तर जनेरेटिव्ह एआय हे वार्षिक 200 ते 340 अब्ज डॉलरच्या मूल्याने वाढ करत आहेत. ढोबळ मानाने एआयमुळे बँकांची उत्पादक क्षमता वाढत आहे आणि त्याचा आर्थिक प्रभाव हा बँकेशी संलग्न क्षेत्रात पोहोचेल आणि त्यातही सर्वाधिक लाभ हा कार्पोरेट आणि ठोक क्षेत्राला होईल.

एविडेंट एआय इंडेक्सच्या मते, जगभरात जेपी मॉर्गन चेन ही 2024 मध्ये एआयला स्वीकारण्यात सर्वात आघाडीवर राहिल्याचे दिसून येते. एआयचा स्वीकार करत डेटा आणि आराखड्याच्या आधुनिकीकरणाला प्राधान्य देत एका योजनेनुसार वर्षाच्या शेवटपर्यंत 75 टक्के डेटा आणि 70 टक्के अ‍ॅप्लिकेशन्सला क्लाऊडवर स्थानांतरित करण्यात येईल. भारतीय बँकादेखील आकड्यांच्या चांगल्या व्यवस्थापनासाठी, चांगली सुरक्षा आणि सेवेतील सातत्य ठेवण्यासाठी अशा प्रकारची भूमिका अंगीकारू शकते. तंत्रज्ञानाला चांगल्या रितीने स्वीकार करत एआयचा योग्य रितीने वापर करत आर्थिक सुबत्ता वाढविता येऊ शकते. त्यामुळे कर्जासाठी पैसे राहतील अणि कर्जाचे निकष सर्वसमावेशक राहतील. एआयचा वापर हा केवळ अंडररायटिंग निकष चांगले करण्यासाठीच नाही, तर कर्जावरील देखरेख आणि संभाव्य धोके ओळखण्यासाठीदेखील फायद्याचा राहू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.