अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प पुन्हा येऊन एक वर्ष उलटले असून, या काळात जगात संघर्ष कमी होण्याऐवजी, तो ठिकठिकाणी वाढलाच आहे. रशिया-युक्रेन युद्ध मी चुटकीसरशी संपवेन, अशी घोषणा ट्रम्प यांनी केली होती. गाझापट्टीतील युद्ध थांबले तरी तेथील असंतोषाचे धुमारे पेटलेलेच आहेत. अमेरिकेने ठिकठिकाणी व्यापारी युद्ध छेडलेले आहे. आता अमेरिका आणि इराण वाद नव्या टप्प्यावर पोहोचल्याने नव्याने तणावाची चिन्हे आहेत. इराणवर दबाव वाढवण्यासाठी अमेरिकेने जगातील सर्वात विशाल आणि आधुनिक, अणुशक्तीवर चालणारी विमानवाहू युद्धनौका ‘यूएस जेराल्ड आर. फोर्ड’ मध्य पूर्वेच्या दिशेने धाडली. त्यामुळे आखाती देशांमध्ये युद्धाच्या छाया पुन्हा एकदा गडद झाल्या. इराणने आपला अण्वस्त्र कार्यक्रम गुंडाळावा, आसपासच्या देशांतील दहशतवादी गटांना पाठबळ थांबवावे, युरेनियमचे समृद्धीकरण रोखावे, अशा मागण्या ट्रम्प यांनी केल्या आहेत.
‘जर अल्लाहची इच्छा असेल, तर अमेरिकेची ही अरेरावी आणि त्याच्या कुरापतींचा अंत जवळ आला आहे,’ अशा शब्दांत इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खामेनेई यांनी ललकारल्यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली होती. जर अमेरिकेने युद्धाची ठिणगी टाकली, तर त्याचा भडका केवळ इराणपुरता मर्यादित राहणार नाही. त्याचे रूपांतर एका भीषण प्रादेशिक युद्धात होईल, अशी भाषा इराणने केली आहे. शत्रूने एखादी छोटी चूक केली, तरी ते स्वतःच्या आणि इस्रायलच्या विनाशाला आमंत्रण देतील, अशी गर्जना इराणचे लष्करप्रमुख आमीर हातामी यांनी केली आहे. ट्रम्प हे दुहेरी चाल खेळताना दिसतात. एका बाजूला ते इराणला लष्करी कारवाईचा धाक दाखवत आहेत, तर दुसरीकडे चर्चेचे दार उघडे आहे, असेही म्हणत आहेत. दुसरीकडे, अमेरिकेने आपल्या इराणमधील नागरिकांना तत्काळ देश सोडण्याचे आदेश दिले. तसेच, जर सुरक्षित असेल, तर इराणमधून आर्मेनिया किंवा तुर्कियेला जाण्याचा विचार करण्याचादेखील सल्ला दिला. काही महिन्यांपूर्वी इराण-इस्रायल युद्धात अमेरिकेनेही प्रवेश केला होता. तेव्हा 12 दिवस चाललेल्या या युद्धात अमेरिकाही उतरल्याने तणाव वाढला होता. त्यावेळी अमेरिकेने इराणच्या तीन अणुप्रकल्पांवर भीषण हवाई हल्ले केले.
या ‘ऑपरेशन मिडनाईट हॅमर’नंतर इराणनेही अमेरिकेच्या मध्य पूर्वेतील लष्करी तळांवर हल्ले केले. परंतु, तो तणाव आणखी वाढला नाही. वाढती महागाई आणि तीव— आर्थिक संकटामुळे गेल्या डिसेंबर महिन्यात इराणमध्ये हजारो नागरिक रस्त्यावर आले आणि त्यात मध्यमवर्गीयांचा मोठा सहभाग होता. हुकूमशहाचा अंत व्हावा, खामेनेई यांना हाकलावे आणि सरकार बरखास्त करावे, अशा मागण्या लोक या मोर्चामध्ये करत होते. समाजमाध्यमांद्वारे तरुणांनी ही चळवळ देशाच्या कानाकोपर्यात पोहोचवली. 1979 मध्ये पदच्युत करण्यात आलेल्या इराणच्या शहांचे पुत्र रेझा पहलवी यांनी या आंदोलनाचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न केला. पहलवींनी अमेरिकेत निर्वासित असतानाच, इराणचे शहा म्हणून स्वतःच्या नावाची घोषणा केली. परंतु, इराणमध्ये पुन्हा राजेशाही यावी यासाठी नाही, तर देशातील धर्मसत्तेच्या विरोधात नेतृत्वाचा कोणता तरी पर्याय असावा, अशी नागरिकांची भावना आहे. हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करू नये. आंदोलकांना गोळ्या घातल्यास वा शिक्षा करण्याचा प्रयत्न केल्यास, याद राखा, असा इशारा अमेरिकेने यापूर्वीच इराणला दिला आहे. एवढेच नव्हे, तर सरकारी कार्यालयांवर बॉम्बफेक करू, अशी धमकीही दिली आहे. 2009 मध्ये निवडणुकीतील गैरप्रकाराच्या विरोधात झालेल्या निदर्शनांमध्ये लोकांनी ‘ओबामा, आमच्यासोबत का त्यांच्यासोबत?’ अशा घोषणा दिल्या होत्या. अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आंदोलकांना स्पष्ट पाठिंबा न दिल्यामुळे निराशाही पसरली होती. त्यावेळी इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी त्या चळवळीस इराणच्या शत्रूंचा पाठिंबा असल्याचा आरोप केला होता. मात्र, त्यानंतरच्या परिस्थितीत मोठा फरक पडला आहे.
इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांची राजकीय ताकद वाढली आहे. गाझापट्टीतून त्यांनी ‘हमास’ला नेस्तनाबूत केले. मध्यंतरी इराणने आगाऊपणा केल्याबरोबर तेहरानवरही बॉम्बहल्ले करण्यास मागेपुढे पाहिले नव्हते. लेबनॉनमधील ‘हेजबुल्लाह’वर हल्ले करून इस्रायलने त्यांचा सफाया करून टाकला आहे. त्यामुळे इराणने आपले महत्त्वाचे सहकारी गमावले आहेत. इराणवर आर्थिक निर्बंध असल्याकारणाने विविध जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीमुळे सर्वसामान्य माणसांना जगणे अशक्य झाले आहे. अमेरिका वा इस्रायलच्या हल्ल्यांमुळे जनतेच्या मनातून इस्लामिक रेव्होल्यूशनरी गार्ड कोअर, म्हणजेच ‘आयआरजीसी’ या लष्करी संघटनेबद्दलची दहशत कमी झाली आहे. अमेरिकेने इराणच्या दिशेने पाठवलेल्या ‘यूएस जेराल्ड आर. फोर्ड’ युद्धनौकेवर किमान 75 अत्याधुनिक विमाने तैनात केली जाऊ शकतात. त्यात एफ-18 सुपर हॉर्नेट आणि ई-2 हॉकआय यासारखी अद्ययावत लढाऊ विमाने समाविष्ट आहेत. शत्रूची साधी हालचालही टिपण्यासाठी यात हायटेक रडार यंत्रणा आहे.
ही युद्धनौका इराणच्या सीमेजवळ पोहोचण्यासाठी चार-पाच दिवस लागतील. अरबी समुद्रात अमेरिकेची ‘यूएस अब्राहम लिंकन’ ही युद्धनौका आधीच तैनात आहे. तेहरानसह इराणची प्रमुख शहरे, अणुप्रकल्प आणि लष्करी तळ आता थेट अमेरिकेच्या हल्ल्याच्या टप्प्यात आले आहेत. इराणने अणुकार्यक्रमाला लगाम घालावा आणि आमच्याबरोबर करार करावा; अन्यथा परिणामांना तयार राहा, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. यापूर्वी व्हेनेझुएलातील मोहिमेत हीच युद्धनौका तैनात केली गेली होती. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेऊन ट्रम्प यांनी अमेरिकेत आणले. वास्तविक, दुसर्या देशाच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करण्याचा अमेरिकेला कोणताही अधिकार नाही. परंतु, ट्रम्प हे कॅनडा, मेक्सिको आणि अन्य काही देशांनाही धमक्या देत सुटले आहेत. नेतान्याहू यांच्यासारख्या बेलगाम नेत्यास आवर घालण्याऐवजी ट्रम्प यांनी त्यांना प्रोत्साहनच दिले आहे. इराणमधील राजवट निर्घृण आहे, यात शंका नाही. परंतु, अण्वस्त्रे अथवा अन्य विषय असोत, त्यांचा न्यायनिवाडा करण्याचे काम हे संयुक्त राष्ट्रांचे आहे. तो अधिकार कोणीही अमेरिकेला दिलेला नाही!