अनिल टाकळकर, वॉशिंग्टन डी. सी.
अमेरिकेत दर दोन वर्षांनी होणारी मध्यावधी निवडणूक येत्या ३ नोव्हेंबर रोजी होत आहे. ३० राज्यांचे गव्हर्नर्स आणि काही राज्य विधिमंडळाच्या निवडणुकाही याचवेळी होत असल्याने राजकीय वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत, हेही स्पष्ट होईल.
अमेरिकेतील नोव्हेंबरमधील मध्यावधी निवडणुकांची रंगत वाढत असून काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांवरील नियंत्रणासाठी डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षांमध्ये तीव्र चुरस आणि स्पर्धा सुरू झाली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या मध्यावर होणाऱ्या या निवडणुकीत अर्थव्यवस्था, महागाई, पेट्रोलच्या वाढत्या किमती, इराणमधील युद्ध, स्थलांतर धोरण आणि ट्रम्प यांचे नेतृत्व हे प्रमुख मुद्दे म्हणून पुढे येत आहेत. अलीकडच्या काही सर्वेक्षणांमुळे डेमोक्रॅटिक पक्षात आत्मविश्वास वाढला आहे; मात्र निवडणुकीला अजून काही आठवडे बाकी असून, रिपब्लिकन पक्षाकडे मोठा आर्थिक निधी, काही अनुकूल मतदारसंघ आणि ट्रम्प यांचा मजबूत राजकीय आधार आहे. त्यामुळे सध्याची राजकीय स्थिती ही दोन्ही पक्षांसाठी संधी आणि आव्हानांची आहे.
डेमोक्रॅट्ससाठी सकारात्मक संकेत
‘वॉशिंग्टन पोस्ट'च्या वृत्तानुसार, लेबर डेनंतरच्या सर्वेक्षणांमध्ये काही महत्त्वाच्या ‘बॅटलग्राऊंड’ राज्यांमध्ये डेमोक्रॅटिक उमेदवारांची स्थिती सुधारल्याचे दिसते. पारंपरिकरीत्या रिपब्लिकन पक्षाला अनुकूल असलेल्या काही भागांतही डेमोक्रॅट्सना स्पर्धा जाणवत आहे. जुलैमध्ये झालेल्या प्यू रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणात मतदारांमध्ये काँग्रेससाठी डेमोक्रॅटिक उमेदवारांना ४३ टक्के, तर रिपब्लिकन उमेदवारांना ३७ टक्के पसंती होती. त्याच सर्वेक्षणात डेमोक्रॅटिक मतदार निवडणुकीबाबत अधिक सक्रिय, उत्सुक आढळले; अर्थव्यवस्थेबाबत दोन्ही पक्षांना जवळपास समान समर्थन होते. ३७ टक्के मतदारांनी डेमोक्रॅटिक पक्षाला आणि ३६ टक्क्यांनी रिपब्लिकन पक्षाला आर्थिक धोरणांबाबत पसंती दिली. सप्टेंबरमधील रॉयटर्स/ईप्सॉस सर्वेक्षणातही काँग्रेसच्या मतदानाच्या पसंतीत डेमोक्रॅट्सना ४४ टक्के आणि रिपब्लिकनना ३७ टक्के समर्थन दिसले. त्याच सर्वेक्षणात ट्रम्प यांच्या कामकाजाला ३५ टक्के पसंती आणि ५८ टक्के नापसंती आढळली. यामुळे डेमोक्रॅट्स ट्रम्प यांच्या लोकप्रियतेतील घसरणीला प्रचाराचा मुद्दा बनवत आहेत.
अर्थव्यवस्था : दोन्ही पक्षांसाठी निर्णायक मुद्दा
वस्तूंच्या वाढत्या किमती, पेट्रोलचा वाढता खर्च आणि घरगुती अर्थसंकल्पावरील दबाव यामुळे मतदारांत अस्वस्थता आहे. प्यूच्या जुलै सर्वेक्षणानुसार, अर्थव्यवस्थेबाबत दोन्ही पक्षांमध्ये कोणालाही स्पष्ट आघाडी नसल्याचे दिसते. आरोग्य, पर्यावरण आणि शिक्षण या विषयांमध्ये डेमोक्रॅट्सना तुलनेने अधिक समर्थन आहे, तर गुन्हेगारी आणि स्थलांतराच्या मुद्द्यांवर रिपब्लिकनना अधिक समर्थन आहे. डेमोक्रॅट्ससाठी वाढत्या किमती हा सरकारच्या आर्थिक धोरणांवर प्रश्न उपस्थित करण्याचा मुद्दा आहे; पण महागाई आणि आर्थिक परिस्थितीत सुधारासाठी पक्षाकडे नेमका कोणता पर्याय आहे, याचे ठोस उत्तर देण्याचे आव्हानही आहे.
इराण युद्धाचा राजकीय परिणाम
इराणमधील युद्ध हा प्रचारातील एक महत्त्वाचा विषय आहे. या संघर्षामुळे पेट्रोलच्या किमती वाढल्या. कॅलिफोर्नियात तर पेट्रोल (गॅस) गॅलनला ८ डॉलरवर गेले आहे. त्यामुळे परराष्ट्र धोरणाचा थेट परिणाम अमेरिकन कुटुंबांच्या घरगुती अर्थसंकल्पावर होत असल्याची भावना आहे. डेमोक्रॅट्स या परिस्थितीचे भांडवल ट्रम्प प्रशासनाच्या परराष्ट्र आणि आर्थिक धोरणांवर टीका करण्यासाठी करत आहेत. रिपब्लिकन खासदारांनीही युद्धाच्या परिणामांबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे हा मुद्दा पक्षीय संघर्षापुरता मर्यादित राहिलेला नाही.
रिपब्लिकन पक्षाची बलस्थाने
रिपब्लिकन पक्षाकडे काही महत्त्वाची बलस्थाने आहेत. पहिले म्हणजे आर्थिक संसाधने. ॲडइम्पॅक्टच्या आकडेवारीनुसार २०२६ची निवडणूक मोहीम अमेरिकेच्या इतिहासातील सर्वाधिक खर्चिक निवडणूक ठरु शकते. एकूण राजकीय पक्षांचा जाहिरातींवरील खर्च सुमारे ११.६ अब्ज डॉलरवर जाऊ शकतो. रिपब्लिकनशी संबंधित सुपर पीएसी आणि इतर गट मोठ्या प्रमाणावर जाहिरातींवर खर्च करत आहेत. 'वॉशिंग्टन पोस्ट'च्या मते, अंतिम आठवड्यांतील नऊ सर्वाधिक चुरशीच्या शर्यतींमध्ये रिपब्लिकन पक्ष डेमोक्रॅट्सपेक्षा सुमारे १४ कोटी डॉलर्स अधिक रकमेचा जाहिरात खर्च करण्याच्या तयारीत आहे. दुसरे महत्त्वाचे बलस्थान म्हणजे मतदारसंघांची रचना. यंदा पुनर्रचनेमुळे काही मतदारसंघातील लढती कमी स्पर्धात्मक झाल्या आहेत. त्यामुळे सर्वेक्षणांपेक्षा प्रत्यक्ष मतदारसंघांचे गणित वेगळे असू शकते. तिसरे म्हणजे रिपब्लिकन पक्षाला गुन्हेगारी आणि स्थलांतर यांसारख्या मुद्द्यांवर मतदारांचा तुलनेने अधिक पाठिंबा दिसतो.
रिपब्लिकन पक्षासमोरील अडचणी
ट्रम्प यांच्या लोकप्रियतेतील घसरण हा रिपब्लिकन उमेदवारांसाठी महत्त्वाचा प्रश्न ठरू शकतो. प्यूच्या जुलै सर्वेक्षणात ६४ टक्के अमेरिकनांनी ट्रम्प यांच्या कामगिरीबाबत नापसंती दर्शविली. काही रिपब्लिकन उमेदवारांना ट्रम्प यांच्याशी किती जवळीक ठेवावी, हा प्रश्न पडला आहे. ट्रम्प यांचा समर्थकवर्ग पक्षासाठी महत्त्वाचा आहे; परंतु चुरशीच्या मतदारसंघात मध्यममार्गी किंवा असमाधानी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगळी भूमिका घ्यावी लागण्याची शक्यता काही उमेदवारांना वाटते. मीच निवडणुकीस उभा आहे, असे समजून मतदान करा, असे ट्रम्प यांनी आवाहन केले असून रिपब्लिकन पक्षाला विजयी केल्यास प्रत्येक अमेरिकन नागरिकाला ५ हजार डॉलर्स देण्याचे आमिषही दाखविले आहे. यामुळे रिपब्लिकन पक्षासमोर एकाच वेळी ट्रम्प यांचे कट्टर समर्थक आणि त्यांच्या धोरणांबाबत प्रश्न उपस्थित करणारे मतदार असे दोन प्रकारचे मतदार टिकविण्याचे आव्हान आहे.
डेमोक्रॅट्सपुढेही अनेक आव्हाने
डेमोक्रॅटिक पक्षासाठी सर्वेक्षण उत्साहवर्धक असले, तरी त्यातून निवडणुकीचा निकाल निश्चित होत नाही. सिनेटचे गणित गुंतागुंतीचे आहे. काही जागा अशा राज्यांमध्ये आहेत जिथे २०२४ मध्ये ट्रम्प यांना मोठा पाठिंबा मिळाला होता. तसेच डेमोक्रॅट्सना काही जागा जिंकण्यासाठी स्थानिक मजबूत उमेदवार आणि प्रभावी प्रचार यंत्रणा लागेल. बृकिंग्सच्या विश्लेषणानुसार, ट्रम्प यांच्या लोकप्रियतेबरोबरच उमेदवारांची गुणवत्ता आणि स्थानिक राजकीय परिस्थितीही सिनेटच्या शर्यतींमध्ये महत्त्वाची ठरू शकते. याशिवाय डेमोक्रॅट्सना आर्थिक प्रश्नांवर रिपब्लिकन सरकारवर टीका करून भागणार नाही. महागाई, घरांच्या किमती, आरोग्यसेवा आणि रोजगाराबाबत आपली ठोस धोरणे स्पष्ट करावी लागतील.
पैसा विरुद्ध राजकीय वातावरण
या निवडणुकीत एक मनोरंजक विरोधाभास दिसतो. एका बाजूला डेमोक्रॅट्सना काही राष्ट्रीय सर्वेक्षणांमध्ये वाढता पाठिंबा आणि मतदारांचा अधिक उत्साह दिसत आहे. दुसऱ्या बाजूला रिपब्लिकन पक्ष आणि त्याच्याशी संबंधित गटांकडे मोठ्या प्रमाणात प्रचारनिधी आहे; मात्र पैसा आणि जाहिराती हेच निवडणुकीचे एकमेव घटक नसतात. उमेदवारांची प्रतिमा, स्थानिक प्रश्न, मतदारांचा सहभाग, मतदानाची पद्धत आणि शेवटच्या काही आठवड्यांतील घटनाही महत्त्वाच्या ठरू शकतात.
एकूणच, २०२६ ची मध्यावधी निवडणूक ही केवळ ट्रम्प यांच्या अध्यक्षीय कारभारावरील जनमत चाचणी नाही. ती अर्थव्यवस्था, राष्ट्रीय सुरक्षा, स्थलांतर, गुन्हेगारी, आरोग्यसेवा आणि काँग्रेसच्या भविष्यातील भूमिकेबाबत मतदार काय विचार करतात, याचेही प्रतिबिंब ठरेल. सर्वेक्षणांमध्ये डेमोक्रॅट्सना काही आघाडीचे संकेत मिळत असले, तरी रिपब्लिकनकडे मजबूत संघटन, आर्थिक संसाधने, काही अनुकूल मतदारसंघ आणि ठराविक मुद्द्यांवर मतदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे नोव्हेंबरपर्यंतची राजकीय स्पर्धा अनेक स्थानिक आणि राष्ट्रीय घटकांवर अवलंबून राहणार आहे.