US, Israel Strikes | इराणी अण्वस्त्रांच्या भीतीतून अमेरिका, इस्रायलचे हल्ले 
संपादकीय

US, Israel Strikes | इराणी अण्वस्त्रांच्या भीतीतून अमेरिका, इस्रायलचे हल्ले

पुढारी वृत्तसेवा

राज वर्तक

अण्वस्त्रनिर्मितीपासून इराणला रोखण्यासाठी अमेरिका-इस्रायलने सुरू केलेल्या हल्ल्यांमागे दीर्घ ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. विशेष म्हणजे 1950 च्या दशकात इराणच्या अणुकार्यक्रमाला सुरुवात करण्यासाठी अमेरिकेनेच प्रोत्साहन दिले होते. इस्लामी क्रांतीनंतर संबंध बिघडले आणि इराणच्या अणुकार्यक्रमामुळे पुन्हा तणाव वाढला. नतान्झ, इस्फहान आणि फोर्डो या महत्त्वाच्या अणुप्रकल्पांभोवतीच आजचा संघर्ष केंद्रित झाला आहे.

इराणला अण्वस्त्र निर्मितीपासून दूर हटवण्यासाठीच अमेरिकेने इस्रायलच्या आग्रहातून इराणवर हल्ले सुरू केले असले, तरी एकोणीसशे पन्नासच्या दशकात अमेरिकेने इराणला अणुप्रकल्प उभारण्यासाठी प्रोत्साहित केले, ही वस्तुस्थितीच आहे. तत्कालीन इराणी पंतप्रधान मुसादेक यांना हटवून अमेरिकेच्या सीआयएने इराणचे शहा महंमद रेझा पहलवी यांना सत्तेत आणले. इराणमधील तेल उद्योगावर अमेरिका आणि ब्रिटनचा संपूर्ण ताबा होता. त्याविरोधात मुसादेक यांनी पावले उचलली तेव्हा सीआयएने कारस्थान रचून त्यांना पायउतार व्हायला लावले. शहांची राजवट सुरू झाली. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष आयसेन होअर यांनीच इराणला अणुप्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने उत्तेजन दिले आणि नागरी उपयोगासाठी अणुऊर्जा विकसित करण्यासाठी आवश्यक ते सहकार्यही केले. 1957 पासून इराणच्या अणुप्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली.

1979 मध्ये झालेल्या इस्लामी क्रांतीत अयातुल्लाह खोमेनी यांची सत्ता स्थापन झाली आणि इराणमधील अमेरिकेची सद्दी संपली. इराण हे शिया मुस्लिम राष्ट्र. इस्रायलभोवती असलेली अरब राष्ट्रे ही सुन्नी मुस्लिम राष्ट्रे. इराण आणि अरब देशांत या धार्मिक कारणाने सख्य नाही. प्रारंभी इस्रायलने त्याचा लाभ घेतला. खोमेनी यांची इस्लामी सत्ता आल्यानंतरही इराण-इराक युद्धावेळी इस्रायलने इराणला गुप्तपणे शस्त्रपुरवठाही केला. नंतर मात्र खोमेनी यांची इस्लामी राजवट अधिक कडवट होत गेली आणि इस्रायल, अमेरिकेबरोबरचे इराणचे याआधी असलेले संबंध संपुष्टात आले. अयातुल्लाह खोमेनी कट्टर इस्लामी. इस्लामी दृष्टिकोनातून त्यांचा अण्वस्त्रनिर्मितीला विरोध. पण इराण-इराक युद्धामुळे त्यांचा विचार बदलला. निर्णायक शक्ती म्हणून अण्वस्त्रांची गरज त्यांनी मान्य केली आणि ठप्प झालेल्या इराणी अणुप्रकल्पाला गती मिळाली.

नतान्झ, इस्फहान आणि फोर्डो हे इराणचे तीन महत्त्वाचे अणुप्रकल्प. नतान्झ प्रकल्प राजधानी तेहरानच्या दक्षिणेला 250 कि.मी. अंतरावर आहे. इराणचे युरेनियम संवर्धन करणारे हे सर्वात मोठे केंद्र आहे. युरेनियमचे अणुइंधनात रूपांतर करण्याची प्रक्रिया येथे कार्यरत आहे. जमिनीवर तीन मजले आणि जमिनीखाली तीन मजले, अशी या केंद्राची रचना आहे. तेहरानपासून 423 कि. मी. अंतरावर असलेले इस्फहान हे इराणमधील महत्त्वाचे शहर. चीनच्या मदतीने इथला अणुप्रकल्प साकार झाला आहे. इराणच्या अणु कार्यक्रमाचा केंद्रबिंदू अशी या प्रकल्पाची ओळख आहे. तेहरानपासून सुमारे 160 कि.मी. अंतरावर असलेल्या फोर्डो शहरात इराणचा तिसरा अणुप्रकल्प आहे. हे अतिशय गुप्त आणि सुरक्षित केंद्र म्हटले जाते. या केंद्राचा गुप्त भाग सुमारे 300 फूट खोल खाली जमिनीत आहे. तो अभेद्य म्हटला जातो. तो भेदण्याची क्षमता अमेरिकेखेरीज अन्य कोणाकडेही नाही.

या तिन्ही ठिकाणी हजारो अणुशास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि कर्मचारी कामकाजात आहेत आणि तिन्ही ठिकाणी कडक सुरक्षा आहे. तरीही अमेरिकेने तिन्ही केंद्रांवर हल्ले केले आहेत. त्यात किती नुकसान झाले, ते स्पष्ट झालेले नाही. गतवर्षीच्या मे महिन्यापर्यंत इराणकडे 9247 किलोग्रॅम एवढा संवर्धित युरेनियम साठा होता. तो 2015 साली झालेल्या करारातील अटीपेक्षा 45 पट अधिक आहे. त्यापैकी 408 किलोग्रॅम युरेनियम 60 टक्के एवढे संवर्धित आहे. अणुबॉम्बसाठी 90 टक्के संवर्धित युरेनियम लागते. याचा अर्थ इराण अणुबॉम्ब निर्मितीच्या अंतिम टप्प्यात आहे, असे मानले जाते. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊनच अमेरिकेने गतवर्षी जून महिन्यात या तिन्ही केंद्रांवर बॉम्बहल्ले केले होते. तरीही इराणने धोरण बदलले नाही आणि त्यातूनच आता अमेरिका, इस्रायलने इराणवर संयुक्त हल्ला केला आहे. इराणने अणुबॉम्ब बनवला, तर त्याचा सर्वाधिक धोका इस्रायलला आहे आणि मध्य पूर्व आशियातील सत्ता समतोलही बदलण्याची भीती आहे. त्यातून इस्रायलच्या आग्रहातून अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे.

इराण-काँट्रा प्रकरण

सन 2026 मध्ये इराणवर हल्ला करणार्‍या इस्रायलचे 1980 मध्ये इराणशी चांगले संबंध होते, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. पण ही वस्तुस्थिती आहे. इराणमध्ये 1979 मध्ये अयातुल्लाह खोमेनी यांनी इस्लामी क्रांती केली. शहा रेझा पहलवी यांची सत्ता उलथली. त्यानंतर वर्षभरातच इराण-इराक युद्ध उद्भवले. इस्लामी क्रांतीच्या काळात एकेकाळच्या बलाढ्य इराणी लष्कराची ताकद कमी झाली होती. इराकशी संघर्ष करताना इराणी लष्कराची दमछाक होत होती आणि युद्ध साहित्याचा तुटवडा जाणवत होता. अशावेळी इराणी प्रशासनाने इस्रायली राजवटीशी गुप्तपणे संधान बांधले. लष्करी साहित्यासाठी विनवणी केली. इस्रायलने ती पुरी केली. शस्त्रास्त्रे, दारूगोळा, शस्त्रास्त्रांचे, विमानांचे लष्करी इंजिनिअरिंग प्रणालीचे सुटे भाग इस्रायलने इराणला पुरवले. तब्बल दोन वर्षे हा पुरवठा सुरू होता. इराणशी संबंध वाढले, तर अन्य अरब राष्ट्रांशी लढताना आपल्याला मदत होईल, हा इस्रायलचा हेतू. मात्र, इराणी प्रशासनाने इस्रायलशी थंडे संबंध ठेवायला सुरुवात केली. इस्रायलने मग काढता पाय घेतला. हा पडद्याआडचा शस्त्र पुरवठा इराण-काँट्रा प्रकरण या नावाने पुढे अनेक वर्षे गाजला. अमेरिकन प्रशासनाचाही या पुरवठ्याला हातभार लागला होता. आता परिस्थिती बदलली आणि इराणकडे अण्वस्त्रे असल्याच्या संशयाने अमेरिका, इस्रायलने इराणवर हल्ले चढविले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT