उमेश कुमार
उत्तर भारतात कृष्ण आणि सुदामाची मैत्री ही शतकानुशतके आदर्श म्हणून ओळखली जाते. द्वारकेचा राजा श्रीकृष्णाच्या महालात त्याचा बालपणीचा मित्र सुदामा मूठभर तांदूळ घेऊन पोहोचला, तेव्हा कृष्णाने ना आपली शान पाहिली, ना सुदामाची गरिबी. त्याने मित्राचे पाय धुतले, त्याला मिठी मारली आणि आपली सर्व संपत्ती त्याच्यावर उधळली. हे प्रतीक सामाजिक सलोखा आणि समानतेचा पाया घालते; पण आज त्याच उत्तर प्रदेशात हीच मैत्री जातीय भिंतींमध्ये विभागली जात आहे. इटावामधील एका घटनेने या पवित्र नात्याला केवळ धक्का दिला नाही, तर उत्तर प्रदेश-बिहारच्या राजकारणाला एका नव्या कसोटीवर उभे केले आहे.
इटावाच्या दादरपूर गावात 21 जून रोजी भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. कथावाचक मुकुटमणी यादव आणि त्यांचे सहकारी संत सिंह यादव कथा सांगण्यासाठी आले होते. गावातील लोक त्यांना ब्राह्मण समजून मंडपात बसले होते; पण जेव्हा ते ब्राह्मण नसून यादव असल्याचे उघड झाले, तेव्हा वातावरणच बदलले. कथावाचकावर जातीय भेदभावाचा आरोप करत जमावाने त्यांच्याशी अमानुष वर्तन केले. त्यांची शेंडी कापण्यात आली, मुंडण करण्यात आले आणि एका महिलेच्या पायावर नाक घासण्यास भाग पाडले गेले. गाव ‘अपवित्र’ केल्याचा आरोप लावून त्यांना अपमानित करून हाकलून देण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ 23 जून रोजी व्हायरल झाला आणि इटावाच्या या छोट्याशा गावाची कहाणी लखनौ राजकीय वर्तुळात पोहोचली.
ही घटना केवळ एका कथावाचकाच्या अपमानापुरती मर्यादित राहिली नाही. या घटनेने उत्तर भारताच्या राजकारणातील जातीय समीकरणांच्या त्या गुंतागुंतीच्या गाठीला पुन्हा उलगडले आहे, जो उत्तर प्रदेश आणि बिहारच्या राजकारणाचा कणा आहे. समाजवादी पक्षाचे (सप) प्रमुख अखिलेश यादव यांचा बालेकिल्ला असलेला इटावा, यावेळी अशा वादळाचे केंद्र बनला, ज्याने यादव-ब्राह्मण समीकरणाला नवे आव्हान दिले. अखिलेश यांच्यासाठी ही घटना केवळ सामाजिक अन्यायाची बाब नव्हती, तर एक असे राजकीय आव्हान होते, ज्याचा परिणाम 2027 च्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसोबतच यावर्षी होणार्या बिहारच्या निवडणुकीवरही होऊ शकतो. इटावा हा समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. अखिलेश यांचा हा गृह जिल्हा, त्यांच्या राजकीय ताकदीचे प्रतीक आहे.
सपाचा कणा यादव मतपेढी आहे, जी उत्तर प्रदेशच्या लोकसंख्येच्या 10-12 टक्के आहे; पण सत्तेचा मार्ग केवळ यादवांच्या जोरावर उघडत नाही. ब्राह्मण, जे लोकसंख्येच्या 8-10 टक्के आहेत आणि सुमारे 35 टक्के असलेले गैर-यादव ओबीसी, कोणत्याही पक्षासाठी सत्तेची चावी आहेत. इटावाच्या घटनेनंतर अखिलेश यांनी तातडीने पाऊल उचलले. त्यांनी पीडित कथावाचक मुकुटमणी आणि त्यांच्या सहकार्यांना लखनौला बोलावून त्यांचा सन्मान केला आणि प्रत्येकी 21 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. यासोबतच त्यांनी योगी सरकारवर निशाणा साधत याला मागासवर्गीय, दलित, अल्पसंख्याकविरोधातील (पीडीए) अत्याचाराचे प्रकरण म्हटले; पण अखिलेश यांचे आव्हान इथेच संपले नाही.
त्यांना ब्राह्मणांना हा विश्वासही द्यायचा होता की, सपा केवळ यादवांचा पक्ष नाही. यासाठी ते सपाच्या ब्राह्मण नेत्यांच्या घरी पोहोचले, जेणेकरून हा संदेश जाईल की, त्यांचा पक्ष सर्व जातींना सोबत घेऊन चालतो; पण प्रश्न असा आहे की, हा समतोल साधणे इतके सोपे आहे का? उत्तर प्रदेशच्या राजकारणाचा इतिहास सांगतो की, ब्राह्मण आणि यादव मतदार एकत्र येणे नेहमीच अवघड काम राहिले आहे. ब्राह्मणांचा एक मोठा वर्ग भाजपसोबत आहे, जो ठाकुरांच्या वर्चस्वानंतरही हिंदुत्वाच्या घोषणेत स्थान शोधतो. इटावाच्या घटनेकडे ब्राह्मणांविरुद्ध यादवांचे राजकारण म्हणून पाहिले गेल्यास सपाला मोठे नुकसान होऊ शकते.
दुसरीकडे, भाजपने ही घटना आपल्या बाजूने वळवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याला ‘जातीयवादी कट’ ठरवत अखिलेश यांच्यावर निशाणा साधला. त्यांची ‘बटोगे तो कटोगे, एक रहोगे तो नेक रहोगे’ ही घोषणा थेट ब्राह्मण आणि इतर सवर्ण जातींना संदेश देते की, भाजपच हिंदू एकतेचे प्रतीक आहे. योगी यांनी इटावा, कन्नौज आणि औरैयाच्या घटनांचा उल्लेख करत म्हटले की, काही राजकीय पक्ष समाजात फूट पाडून गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण करू इच्छित आहेत. हे विधान स्पष्टपणे सपाला लक्ष्य करते. मात्र, भाजपसमोरही आव्हाने कमी नाहीत. उत्तर प्रदेशमध्ये ठाकुरांचे वर्चस्व आहे. विशेषतः योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली ब्राह्मणांमध्ये असंतोष निर्माण होत आहे.
2022 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे 52 ब्राह्मण आणि 49 ठाकूर आमदार निवडून आले; पण ठाकुरांचे वर्चस्व स्पष्ट दिसते. सत्तेत आपला वाटा कमी होत असल्याचे ब्राह्मणांना वाटते. इटावाची घटना भाजपसाठी एक संधी आहे, ज्याचा उपयोग ते ब्राह्मणांना खात्री देण्यासाठी करू शकतात की, त्यांचा पक्षच त्यांच्या सन्मानाची आणि हिंदू एकतेची हमी आहे; पण भाजप हा ठाकुरांचा पक्ष बनून राहिला आहे, ही भावना ब्राह्मणांमध्ये बळावली, तर ती त्यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरेल. या संपूर्ण घडामोडीत बहुजन समाज पक्षाचे (बसपा) मौन लक्ष वेधून घेते. इटावातील घटना केवळ उत्तर प्रदेशपुरती मर्यादित नाही.
बिहारमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. तेथे यादव मतदार तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाचा (राजद) मजबूत आधार आहेत. भाजप इटावाच्या घटनेला बिहारमध्ये तेजस्वी यांच्या विरोधात शस्त्र म्हणून वापरू शकते. यादव राजकारण हे ब्राह्मण सन्मानाचे शत्रू आहेत आणि इटावातील घटना बिहारमधील ब्राह्मण मतदारांना एकत्र करू शकते; मात्र, बिहारमध्ये ब्राह्मण आणि इतर मागास जातींचे समीकरण उत्तर प्रदेशपेक्षा वेगळे आहे. त्यामुळे भाजपला तिथे नेहमीच जदयूचा आधार घ्यावा लागतो. भाजप-जदयू युतीने उत्तर प्रदेशातील मुद्द्याचा योग्य वापर केला, तर राजदसाठी आव्हान वाढू शकते. कृष्ण आणि सुदामाच्या मैत्रीचे प्रतीक उत्तर प्रदेश आणि बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा सामाजिक सलोख्याचे उदाहरण बनू शकते; पण यासाठी नेत्यांना जातीय भिंती तोडाव्या लागतील.